पेंट बाप्पा मोरया २०१७

नमस्कार मंडळी.
गणेशलेखमालेचे सूतोवाच झालेले आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणेशोत्सवातल्या या उत्सवी वातावरणाला अजून एक सोनेरी झालर असते ती म्हणजे आपल्या मिपाचा वर्धापनदिन गणेशचतुर्थीचाच. प्रत्येक वर्धापन दिनासोबतच प्रगतीचे नवनवे टप्पे पार करणारे मिपा आगामी वर्षात खूप काही घेउन येणारे. गणेश हा जसा विद्यांचा स्वामी तसाच तो कलांचाही. नानाविध कला गणेशस्तुतीत अत्यंत कलात्मक रित्या प्रकट होतात.
गतसाली आयोजित गणेशचित्रमालेला मिळालेल्या ऊत्स्फुर्त प्रतिसादानंतर यंदाची गणेशचित्रमाला सादर करण्यास अत्यंत आनंद होत आहे.
मिपाकरांच्या अंगात किती कला आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. त्या निरनिराळे लेख, काव्ये, भटकंत्या, पाककृती आणि जोरदार काथ्याकूटातून रोजच प्रकट होत असतात. आता मात्र जरा आपल्या मिपाबाप्पाचा विचार करुयात. यंदाच्या मिपागणेशोत्सवास आपणास नेहमीप्रमाणेच रंगदार आणि ढंगदार बनवायचे आहे आणि तेही सर्वांच्या सहकार्याने. चला तर मग. भरपूर वेळ आहे आपल्याला.
हे पाहा इतकेसे काम आहे फक्तः
आपण सर्वच जण एमएस पेंट हे सोपे अ‍ॅप्लिकेशन बर्‍याच कामांसाठी वापरतो. तर यंदा ह्या अ‍ॅप्लिकेशनात रेखाटायचाय आपला मनातला बाप्पा. पेंटमधील कोणतेही टूल वापरा. कसाही रंगवा. फक्त फोटोशॉप वगैरे अ‍ॅडव्हान्स प्रकार नकोत. ह्या चित्रमालेत फक्त एमएस पेंटमधीलच बाप्पा स्वीकारले जातील. तुमच्या घरातील छोट्या कलाकारांनी हे रेखाटले असतील तरीही तसे त्यांच्या नावा अन वयासहित नोंदवून पाठवा. ही चिमुकली मंडळीही एकप्रकारे मिपापरिवाराचे सदस्यच आहेत. त्यांच्या कलाकृतींचे कौतुक आपण करणार आहोत.

आता हे कशासाठी?
तर गणेशोत्सव रंगदार करण्यासाठी रंगभुषा मंडळ सज्ज झालेले आहे. गणेशोत्सवात मिपाची बॅनर्स ही सार्‍या मिपाकरांकडून सांगून सवरुन, त्यांच्या कलाकृतींची बनवून लावायची आहेत. इथून बर्‍याच नवीन उपक्रमांचा श्रीगणेशा होणार आहे, तेंव्हा ह्या स्पर्धेत म्हणा की आपल्या घरच्या कामात म्हणा, सार्‍याच सदस्यांचे भरीव योगदान आवश्यक आहे.
तर मग चला. लागा कामाला. बच्चे कंपनी असेल तर त्यांनाही हे सांगून करुन घ्या अन पाठवा आम्हाला खूप सारे बाप्पा.
काही अडचणी असतील तर मी आहे सांगायला, बाकी इतरही बरीच तज्ञ मंडळी असतील.
आपण पाठवणार असलेली गणेशचित्रे, जेपीइजी फाइल्स, बिटमॅप फाइल्स दि. २० ऑगस्ट २०१७ पर्यंत कृपया rangbhusha.mipa@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवाव्यात. त्यानंतर पाठवलेल्या चित्रांचा ह्या चित्रमालेत सहभाग असणार नाहीये.
धन्यवाद.