जागतिक विक्रम आपल्या नावावर आणण्यासाठी प्रयत्नशील असणार्या देश-शहरांमध्ये दुबईचा फार वर... बहुदा पहिला... क्रमांक आहे. किंबहुना असे करून आपले नाव सतत चर्चेत रहावे आणि त्याचा आपल्या महत्वाचे उत्पन्न असणार्या पर्यटन व बांधकाम व्यवसायांना उपयोग व्हावा असा दुबई प्रशासनाचा सतत प्रयत्न असतो.
असे "गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड"ने दुबईच्या नावावर नोंदवलेले ४१७ जागतिक विक्रम इथे पहायला मिळतील. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे इथे विचारणा केल्यास अजून जास्त विक्रम सापडू शकतील.
अश्याच जागतिक विक्रम ठरू शकणार्या, ड्रोन (चालकविरहित, हवाई) टॅक्सी प्रकल्पामुळे, दुबईचे नाव परत एकदा जगासमोर आले आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये दुबईच्या Roads and Transport Authority ने ही व्यवस्था दुबईत लवकरच उपलब्ध होईल अशी घोषणा केल्यापासून स्थानिक आणि एकंदरीत जगातिल लोक या सेवेची उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहेत.
EHANG या चीनी कंपनीचे २४० किलोग्रॅम वजनाचे EHANG184 नावाचे मॉडेल या सेवेसाठी वापरले जाणार आहे. कंपनीच्या दाव्याप्रमाणे त्यांचे मॉडेल जगातले सर्वात जास्त सुरक्षित, हुशार (स्मार्टेस्ट) व पर्यावरणपूरक मॉडेल आहे. सुरक्षित असूनही वजन कमी ठेवण्यासाठी त्याच्या बांधणीत खास मटेरियल्स वापरलेली आहेत. Autonomous Aerial Vehicle (AAV) या नावाने या सेवेच्या अनेक चांचण्या पुर्या झाल्या आहेत. हवामानात अचानक मोठा बदल झाला किंवा उडत असताना इंजिनात बिघाड झाला तरी ड्रोनटॅक्सी प्रवाशासकट जवळच्या सुरक्षित स्थानापर्यंत अचूकपणे व सुरक्षितपणे पोचावी (Fail Safe system) यासाठी खास व्यवस्था आहेत आणि त्या व्यवस्था आधिक विश्वासू बनवण्यासाठीच्या चांचण्या सद्या चालू आहेत.
आरामदायक आसन व एअरकंडिशनिंगने परिपूर्ण असलेली आणि बॅटरीवर चालणारी ही हवाई टॅक्सी ३,५०० मीटर (११,५०० फूट) उंचीवरून ६० किमी प्रतितास दराने २५ मिनिटांपर्यंत ऊडत प्रवाशाला त्याच्या गंतव्यापर्यंत पोहोचवेल. तिची बॅटरी एका तासात परत पूर्णपणे चार्ज करता येईल. ड्रोनटॅक्सीतला टच-स्क्रीन वापरून नकाशावर आपले गंतव्यस्थान निवडणे आणि प्रवास सुरू करण्याचे बटण दाबणे, इतकेच प्रवाश्याने करणे अपेक्षित आहे. त्यानंतर सगळे ड्रोनटॅक्सीवर सोपवून आरामात प्रवासाची मजा उपभोगणे अपेक्षित आहे.
पुढच्या काही महिन्यांत दुबईला भेट देणार असलेल्या मिपाकरांनी या विक्रमी सेवेचा फायदा घेऊन इथे आपल्या अनुभवांवर एखादा लेख लिहिला तर आश्चर्य वाटायला नको.
ही सेवा सुरु होण्यापूर्वीच आपल्या घरात बसून तिचा व्हर्च्युअल अनुभव घेण्यासाठी ही चलतचित्रफीत पहा...
(युट्युबवरून साभार)