सदाभाऊ

एकेकाळी शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करणारे सदाभाऊ आज स्वतः सत्ताधारी विशेष म्हणजे कृषिमंत्री झाल्यावर त्यांच्या भूमिकेत झालेला बदल कवी व वक्ते जगदिश ओहोळ यांनी त्यांच्या *सदाभाऊंचा ऊर* या कवितेतून नेमकेपणाने मांडला आहे.

शेतकऱ्याचा जीव घेतेय
त्यानेच पिकवलेली तूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

गोडी लागली सत्तेची
वारं लागलं AC चं
अन चळवळ झाली दूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

भावनिक बोलून
गाजवायचे सभा
अन अश्रूंचा त्यांच्या
सभेत वाहायचा पूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

मातीची नाळ तुटली
की माणूस माणसातनं उठतो
शेतकऱ्यांतला पांडुरंग त्याला
लाल दिव्यातच भेटतो
अन आयुष्यभर लागून राहते
स्वतः ला फसवल्याची हुरहूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

कधीकाळी कुणब्याचं बोलणार तुमी
आता TV वर सरकारवाणी बोलता
तुमचीच जुनी तत्व तुमी
इटी वानी कोलता
शोभत नाही तुमच्या तोंडी
सत्ताधाऱ्यांचा सूर...
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

या मातीशी गद्दारी करणारांना
माती करत नाही माफ
गद्दारांचं भविष्य
माती करते साफ
एका लाल दिव्या पायी
मातीमोल झाला चळवळीचा कोहिनूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर