घरात बनू शकणारी नैसर्गिक खते "जीवामृत आणि अमृतपाणी"

शेती करायचे ठरवल्या नंतर माहिती गोळा करायला सुरुवात केली.एक शेतकरी भगिनीने, "श्री.सुभाष पाळेकर" ह्यांचा उल्लेख केला.यु-ट्युब वरील त्यांचे व्हिडिओ पाहता पाहता, सहजच जीवामृत बघण्यात आले.

पुढे ज्यावेळी सी.आर.टी. तंत्रज्ञाचे जनक श्री. चंद्रशेखर भडसावळे ह्यांची गाठ त्यावेळी, त्यांनी सांगीतले की, ज्या शेतात बॅक्टेरिया जास्त त्या शेतात काहीही पिकवा.

जीवामृताचे व्हिडिओ बघतांना पण हेच जाणवले की, शेतात बॅक्टेरियांची उपज वाढवायला ह्याच उपयोग होतो आणि मग मी बघीतलेले व्हिडिओ आणि माझी संकल्पना ह्याची सांगड घालून माझे मी प्रमाण ठरवले. ते खालील प्रमाणे.

साहित्य.

१. एक ते दो मुठी वडाच्या झाडाच्या मुळाखालील माती. (सगळ्यात उत्तम बॅक्टेरिया वडाच्या झाडाच्या मुळाशी असतात, अशी ऐकिव माहिती मिळाली आणि वडाचे झाड कधीच मरत नाही, अशी पण माहिती मिळाली.) वडाचे झाड नसेल तर पिंपळ आणि पिंपळ पण नसेल तर आंबा किंवा जांभूळ. (फूकट)

२. ३-४ दिवस शिळे गोमुत्र.... साधारण १०-१२ लिटर. (दिवसाला ५ रु.)

३. गाईचे शेण १०-१२ किलो. (एक घमेले भरपुर होते.ताजे मिळाले तर फार उत्तम पण ते न मिळाल्यास २-३ दिवसांचे असेल तरी पण चालते, हा स्वानुभव.) (एका दिवसाला ५ रु.)

४. अर्धा किलो किंवा १ किलो गुळाचा खडा. दारूचा गूळ मिळाल्यास फार उत्तम. (दारूचा गूळ म्हणजे गुर्‍हाळातून निघालेला खराब गूळ.हा दारूची भट्टी लावणारे घेतात.मला हा गुळ मिळाला नाही.मी केमिकल विरहित गूळ वापरला.) (साधारण १०० रु.)

५. १०० ग्रॅम मध (३२ रु.)

६. गाईचे तूप ५० ग्रॅम (२० रु.)

७. चण्याच्या डाळीचे पीठ १ किलो. (हे महाग वाटले म्हणून चक्कीत खाली पडलेले पीठ वापरले. ते ६ रु. किलो ह्या दराने पडले.ते पावरून पण फायदा झाला. थोडक्यात वडाच्या झाडाखालचे बॅक्टेरिया चक्कीच्या पीठवर पण पोसल्या जातात.हा अनुभव) (१२ रु.)

८. १० ते २० लिटर पाणी. (फूकट)

९. २२० लिटरचा प्लॅस्टिकचा ड्रम. (ह्याचा खर्च पकडलेला नाही. कारण "सुरुवातीचा खर्च" ह्या लेखात ह्या खर्चाचा उल्लेख येईलच.)

१०. घरी बनवलेला दशपर्णी अर्क, १०० मिली. (हा प्रयोग मी अद्याप केलेला नाही.आणि त्यामुळे मी बनवलेल्या जीवामृतात मी ते टाकले पण नाही.)

११. आंबट ताक. (एक ते २ लिटर) (जवळ पास फूकट.)

१२. देशी दारू (१ ते २ पेग. मी हा प्रयोग केला नाही.)

कृती :

सकाळी सकाळी, ड्र्म मध्ये गोमूत्र ओता.

नंतर त्यात शेण टाका.

नंतर त्यात गूळ टाका.

नंतर त्यात पीठ टाका.

आता हे सगळे एकत्र करा.

आणि ड्रम वर झाकण ठेवा.

संध्याकाळी एका घमेल्यात, वडाखालची माती, मध आणि तूप एकत्र कालवा.

दुसर्‍या दिवशी सकाळी, घमेल्यातील हे सगळे साहित्य ड्रम मध्ये कालवा. घमेले पाण्याने धुवून ते पाणी पण ड्रममध्ये टाका.घलेल्याला अजून पण तुपाचा चिकटा असल्यास, मातीने ते साफ करून ती माती पण ड्रम मध्ये ओता. ड्रम वर झाकण ठेवा.

सुरुवातीचे २-३ दिवस, दररोज सकाळी आणि संध्याकाळी हे ड्रम मधील मिश्रण हलवा. ड्रम वर झाकण ठेवा.

४ थ्या दिवसापासून दर २ दिवसाआड ५० लिटर पाणी ड्रम मध्ये टाका.

८व्या किंवा १०व्या दिवशी ड्रम पाऊण भरेल.

आता पुढील ७ दिवस हे मिश्रण तसेच ठेवा.

पण दररोज सकाळ संध्याकाळ मिश्रण हलवणे आणि ड्रम वर झाकण ठेवणे, हे विसरू नका.

आता तुमचे जीवामृत तयार झाले.

शेतात फवारणी करतांनाचे प्रमाण...

१० लिटर जीवामृत २२० लिटर पाण्यात मिसळून. झारीने फवारणे. थोडे झाडावर आणि थोडे बुंध्याला.

फायदा : जीवामृतात असलेल्या गूळाने कीटक आकर्षित होतात.फुलांचे परागीकरण होते.जमिनीत गांडूळांची वाढ होते आणि पुढील पिकासाठी शेतात नांगर फिरवायला लागत नाही किंवा जमीन भाजायची गरज भासत नाही.अनावश्यक खर्च वाचतो. कीटकांना खायला बेडूक येतात आणि मग बेडकांना खायला साप.सापामुळे उंदीर येत नाहीत.त्यामुळे उंदीर मारायच्या औषधाचा पण खर्च वाचतो. हा स्वानुभव आहे. माझ्या शेतात पण साप फिरतात.२ वेळा मला दर्शन देवून गेले.(आपण काहीच हालचाल केली नाही, तर ते त्यांच्या मार्गाने निघून जाता. हा अनुभव घेतला. (ह्या माहिती बद्दल थँक्स टू जेडी आणि मिपा) )

इति जीवामृत्यं महात्यम समाप्तं

जास्तीत जास्त महिना ५००/- रुपये खर्च आला.

===============================

अमृत पाणी....

साहित्य आणि कृती....

पाव लिटर तूप आणि अर्धा लिटर मध एकत्र करा आणि ते भरपूर फेटा.

त्यात एक मूठ वडाच्या झाडाखालची माती टाका आणि परत फेटा.त्यात २-३ लिटर गोमुत्र आणि २-३ किलो गाईचे शेण मिसळा आणि एकजीव करा.

आता हे मिश्रण तुम्ही १० ते २० लिटर पाण्यात एकत्र करा. आणि बियांची रोपे करतांना किंवा रोपे तयार झाल्यावर किंवा रोपे जर सुकत असतील तर, वापरा.

जे जीवामृत करू शकत नाही, ते अमृतपाणी करू शकते.... हा स्वानुभव.

माझ्या रोपांना २१ दिवस पाणी मिळाले नाही तरी पण ती तग धरून होती.

एकूण खर्च महिना ५००/- रू.

==============================

जीवामृतामुळे आणि अमृतपाण्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पण वाढते.हा माझा स्वानुभव.

=========================

जास्तीत जास्त १०००/- रु दमदए (दर महा दर एकरी) खर्च येतो. आपण जर हॉटेल किंवा सिनेमा वर खर्च नाही केला तर त्या पैशात एक एकरभर खत नक्कीच तयार करू शकतो. हा स्वानुभव.