आपल्याकडे एक म्हण आहे,"मीठ-मिरचीला महाग नाही" किंवा "माझी मीठ-मिरची मी कशीही कमवीन."
मीठा नंतर आपल्या घरात "मिरची"ला स्थान आहे, हे त्रिकालाबाधित सत्य.
परंतू, मी जेंव्हा शेती हाच व्यवसाय म्हणून स्वीकाराचे ठरवले त्यावेळी "मिरची" डोळ्यासमोर न्हवती.
जालावर जास्त आत-बट्ट्याची न ठरणारी पिके कोणती? ह्याचा अंदाज घेत असतांना "मिरची" ह्या पिकाविषयी माहिती मिळाली.
जमीन : मिरचीला कुठलीही जमीन चालते.दगड आणि वीट, सोडून मिरची कुठेही येते.
पाणी : मिरचीला सुरुवातीला, म्हणजे रोपे तयार करतांना रोज संध्याकाळी पाणी द्यावे लागते. रोपे लागवडी नंतर रोज संध्याकाळी पाणी द्यावे लागते.
मिरचीला फुले आल्या नंतर पाण्याचे प्रमाण मुद्दाम कमी केले. सुरुवातीला २ दिवसा आड, मग ३ दिवसा आड. असे करता करता, ७ दिवसा आड एकदा पाणी देण्याचा प्रयोग केला. सर्वात शेवटी २१ दिवसांनी पाणी दिले. तोपर्यंत मिरचीचे रोप तग धरून होते.
खते आणि किटकनाशके : मिरचीलाच कशाला पण कुठल्याही पिकाला "खतांची किंवा किटकनाशकाची" आवश्यकता नाही, असे वाचनात आले होते. त्यामुळे मी पण "नैसर्गिक रित्या मिरची लागवड" हेच धोरण ठेवले होते. जीवामृत आधारीत मिरची लागवड केल्याने खतांचा आणि किटकनाशकांचा खर्च वाचला.
तोडणी : मी आणि माझ्या बायकोने मिळून तोडणी केली. अजिबात कठीण काम नाही.
बाजार : मिरची ३-४ प्रकारे विकता येते. हिरवी मिरची, सुकी मिरची, तिखट करून आणि लोणचे करून.
मिरची अजिबात नाशवंत नाही. बाजारभाव पडले तरी, एक वर्षभर घरात ठेवता येते.(अपवाद, हिरवी मिरची)
घरी रोपे तयार कराची पद्धत :
तुम्हाला जमेल तसे वाफे मेच्या अखेर पर्यंत करून घ्या. त्यात "जीवामृत" किंवा "अमृत-पाणी" टाका.
(जीवामृत आणि अमृतपाणी कसे तयार करावे? ह्या विषयी पण एक धागा तयार होवू शकतो. किंबहूना तो पण धागा आज टाकीन.कारण, "घरात बनू शकणारी, नैसर्गिक खते आणि किटकनाशके", हा खरोखरच एका धाग्याचा विषय आहे.)
पहिला पाऊस पडे पर्यंत त्या वाफ्यात फक्त "जीवामृताची" फवारणी करा.
पहिला पाऊस पडून गेला, की काही दिवस उघडीप मिळते.ती मिळाली की, त्याच संध्याकाळी त्यात मिरचीच्या बिया पेरा. नुसत्या टाकल्यात तरी चालेल आणि त्यावर थोडी माती टाका.साधारण पणे ३ बाय ३ फुटाच्या एका वाफ्यात ३०० बिया रुजतात किंवा ३०० रोपे तयार होवू शकतात.
दुसरा पाऊस सुरु होई पर्यंत, जेमतेम जमील भिजेल इतपत रोज संध्याकाळी पाणी द्या. आठवड्यातून एकदा जीवामृत द्या.
साधारण पणे १५ दिवसात बिया रुजतात.
बिया रुजायला सुरुवात झाली की, आठवड्यातून एकदा अमृत-पाणी द्या.
जून-जुलै-ऑगस्ट पर्यंत रोपे तयार होतात.
सप्टेंबर पासून रोपांची लागवड सुरु करायला हरकत नाही.
रोपे लागवड पद्धत :
एका खणतीने, २ फुटांवर खड्डे खणा. मी दिवसाला १०० असे खड्डे सहज खणू शकतो. हे काम साधारण पण जुलैच्या पहिल्या तारखेपासून पासून सुरु करावे. ऑगस्ट अखेर पर्यंत तुम्ही निदान ५,००० खड्डे खणू शकता.मी जर करू शकतो, तर तुम्ही पण नक्कीच करू शकता.
सप्टेंबर पासून रोपांच्या लागवडीला सुरुवात करा.शक्यतो मोठी रोपे निवडा.सुरुवातीला १००-२००च रोपे घ्या. ती रुजली की मग इतर रोपे लागवडीला घ्या.
शक्यतो दुपारी ३-४ वाजता रोपे लावायला घ्या. ५ वाजे पर्यंत जितकी रोपे लावू शकाल तितकीच लावा आणि ५ ते ६ वाजेपर्यंत रोपांना जीवामृताची फवारणी करा, अर्थात झारीने. एका तासात १०० रोपांना आरामात पाणी देवून होते. मी २ तासात ३०० रोपांना पाणी देत होतो आणि ते पण झारीने. (मला जर जमू शकते तर तुम्हाला पण नक्कीच जमेल....)
दुसर्या दिवशी पण असेच करा. ७-८ दिवसात रोपे रुजतात.
ती रुजली की आता आपल्या वाफ्यातील रोपे लागवडीला घ्या.झेपेल इतकेच काम केलेत तरी, १०-१५ दिवसात ५००० रोपे नक्कीच लावू शकाल.
एका गुंठ्यात साधारण पणे ४०० ते ४५० रोपे सहज लावता येतात आणि तुम्ही ही लागवड एका दिवसात सहज करू शकता, सकाळी २०० आणि दुपारी २०० रोपे आरामात लावू शकता.
रोपे जगवता-जगवता लागवड करणे अगदी उत्तम.नाहीतर सगळाच सावळा गोंधळ.कष्टात आणि वेळेत कमी पडत असाल तर. जितके जमत असेल तितकेच काम करा."शरीरं आद्यं."
जीवामृताच्या बरोबर अधून-मधून अमृतपाण्याची फवारणी करा.
डिसेंबर-जानेवारी पासून फुले येतात आणि फेब्रुवारी पासून मिरच्या येतात.
मी, रोपे विकत आणून "मिरची" लागवडीचा यशस्वी प्रयोग पण केला. (किती किलो मिरची मिळाली? ही मोजमापाची पट्टी न ठेवता, पहिलाच प्रयोग आहे, एक मिरची जरी मिळाली तरी पण प्रयोग यशस्वी झाला, हेच धोरण होते. २ किलो मिरची मिळाली.)
ह्या वर्षा पासून घरी रोपे तयार करून शेतात रुजवणार.
डिस्क्लेमर : लेख फार घाईत लिहिला असल्याने, काही माहिती देणे राहून गेले असणार. त्यामुळे प्रतिसादात ती चूक दुरुस्त करण्यात येईल.