मिपा वर बाकी बरेच लेख - पाककृती वगैरे दिसतात पण कला दालनात कधीच चहेल-पहेल दिसत नाही. इथे कुणी काही पोस्ट हि करत नाही आणि कुणी फारसे फिरकतच नाही असे वाटते. मी खरे तर कला क्षेत्रात बरेच काही करते पण इथे कुणीच काही करताना दिसत नाही म्हणून लोकांना फारसा इंटरेस्ट नसावा असे मानून आणि असे लिहिणे हे पण एक कामच आहे हे जाणून तुमच्यासोबत कधीच काही share केले नाही. तरीही हा एक पहिलाच प्रयत्न.
मधुबनी 1:
माझे अतिशय साधे सोपे तरीही कोणत्याही घराची शोभा वाढवणारे असे मधुबनी ड्रॉईंग !! खरे तर हा माझा प्रांत नाही पण १/२ - १ तासाच्या फावल्या वेळात , जेंव्हा जास्त काही करण्यासाठी लागणारी बैठक अशक्यपप्राय गोष्ट असते तेंव्हा आणि कोणत्याही वेळी सुरु करून वाट्टेल तेंव्हा त्यात रेखा, चित्रे , विविध आकार यांची हवी तशी जुळवणी करण्यासाठी मी कधी कधी मधुबनी चित्रे काढते. त्यातलेच हे एक.
मधुबनी - थोडक्यात माहिती : तुमच्या आग्रहाखातर
मधुबनी हि बिहार च्या मधुबनी आणि मिथिला जिल्ह्यामधील एक लोककला आहे. पूर्वी लग्न-कार्याच्या वेळी फक्त घरातल्या बायकाच असे काम घरे सजवायला , भिंती , जमीन रंगवायला करायच्या. यात प्रामुख्याने घरातल्याच हळद, पाने , सिंदूर, शाई इत्यादींचा रंग बनवण्यासाठी उपयोग केला जायचा आणि हि बारीक कलाकुसर काडेपेटी, ब्रश , पेन, काड्या, बोटे यांचा उपयौग करून केली जायची. हि कलाकुसर पारंपरिक सणांवर आधारित असायची, ज्यात होळी. कालीपूजा, रामायण, स्वयंवर, सूर्य, देव-देवता, चंद्र , सूर्य , तारे , तुलसी वृंदावन , पिंपळ , हत्ती , घोडे, फुले , पाने आणि वेगवेगळ्या आकृत्या यांचा समावेश केला जात असे. यात बॉर्डर साठी सुद्धा काही खास आकार वापरले जातात. मुख्य म्हणजे या कलाकृतीत कोणताही भाग मोकळा ठेवला जात नाही आणि सहसा खूप भडक / कॉन्ट्रास्ट रंगांचा वापर केला जातो. यात काही patterns परत परत वापरले जातात. पॅटर्न चुकला तरी तो तसाचा पुढे वापरणे शहाणपणाचे ठरते. मधुबनीचे ४-५ प्रकार हि आहेत- कातचनी , भरणी , कोहबार, तांत्रिक , गोडना हि त्यांची नावे. सुरुवातीला अशी पेंटिंग्स फक्त कायस्थ , ब्राम्हण बायका करत असत असे मानले जाते. कालांतराने या कलाकृतीचे रूपांतर सर्वांच्याच उपजीविकेचे साधन म्हणून करण्यात येऊ लागले आणि घरातील इतर पुरुषमंडळी हि त्यांना साथ देऊ लागली आणि हि कला पुढे चालत , वाढत, फुलत, बहरत आपल्यापर्यंत येऊन पोहोचली.
आज हि या सर्व गोष्टींचा समावेश आधुनिक पेंटिंग्स मध्ये केला जातो पण नवीन कलाकारांनी त्यातून जीवन आवश्यक वस्तू बनवायला सुरुवात केली. कार्ड्स, पेनस्टॅण्ड, टी कोस्टरस, दगडावर पेंट करून वेटहोल्डर, ड्रेसेस वरील डिझाईनस , लॅम्पशेड्स, काचेच्या डिश वर काम करणे अशी अनेक युक्त्या लढवून या कलेचा आपल्या जीवनात समावेश केला जाऊ शकतो. अर्थात त्यासाठी पूर्वकालीन झाडे , पाने , फुले याच्या रंगापेक्षा आम्ही acrylic रंग वापरतो. हॅण्डमेड पेपर वर तर आजची मधुबनी पेंटिंग्स खुलून दिसतात आणि एकदा का हात बसला कि ती करायला पण अतिशय सोपी तरीही सुंदर दिसतात. अर्थात खूप बारकाईने काम करावे लागते. पण अगदी ५-७ रंगांचा वापर नाही केला तरी २-३ रंगांमध्येही कलाकृतीला उठाव येतो. किंबहुना मला तर २-३ रंगाचा वापर केलेले पेंटिंग्स जास्त आवडतात, नजरेला सुखावह वाटत. ते बघणार्याच्या आवडीवर अवलंबून आहे.
तर अतिशय सोपे हे मधुबनी प्रकरण, काहीही अशक्यप्राय असे नाही यात, फक्त थोडी चिकाटी आणि बारीक नजर हवी. करून पहाच !!