मराठीतला पहिला पॉडकास्ट: विश्वसंवाद

"विश्वसंवाद" या पहिल्या मराठी पॉडकास्टचे एपिसोडस "मिसळपाव"वर प्रसिद्ध करण्याची संधी मला मिळते आहे, ही आनंदाची बाब आहे.

मराठीतला हा पहिला पॉडकास्ट. नव्यानं ओळख झालेल्या या माध्यामानं गेली काही वर्षं अगदी झपाटून गेल्यासारखं झालंय. इंग्रजीतले अनेक, वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्टस ऐकल्यानंतर, मराठीत हा प्रकार आणायलाच हवा असं वाटत होतं. जवळजवळ वर्षभराच्या तयारीनंतर १ जानेवारी २०१७ पासून मी हा पॉडकास्ट प्रसिद्ध करतोय.

या मराठी पॉडकास्टचं स्वरूप आहे मुलाखतीचं. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांशी गप्पा मारत त्यांना समजून घेण्याचं कुतूहल आणि पॉडकास्टींग हा नवीनच सापडलेला छंद या दोन गोष्टींना एकत्र आणण्याचा हा उपक्रम. शीर्षक आहे: विश्वसंवाद. वेब-साईट: www.vishwasamwaad.com आणि फेसबुकवर: www.facebook.com/vishwasamwaad

आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या एपिसोडसमधले पाहुणे आहेत:
- ज्येष्ठ मराठी लेखक/समीक्षक विजय पाडळकर
- अंतराळात झेप घेण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या Scientist-astronaut candidate अनिमा पाटील-साबळे
- Friends of Anandwan या संस्थेच्या चंदा आठले

आणि काही आगामी पाहुणे असे:

- भारतीय तालवाद्यांच्या सिंथेसायझरचे जनक जयवंत उत्पात
- खगोल-संशोधक / शास्त्रज्ञ आशिष महाबळ
- मराठी कीर्तन परंपरेचे फ्रेंच अभ्यासक एरिक फेरिए
- बहुभाषिक डिजिटल डिक्शनरीचे जनक सुनील खांडबहाले

हे सगळे एपिसोडस यथावकाश "मिसळपाव"वर येतीलच. या सुरुवातीच्या पोस्टबरोबर या पॉडकास्टची आरंभ-धून देतो आहे. "मिसळपाव"च्या रसिक आणि चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया, सूचना समजून घ्यायला नक्कीच आवडेल.

* * पॉडकास्ट या माध्यामाशी परिचित नसणाऱ्या वाचकांसाठी:

पॉडकास्ट म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा (on demand) ऐकता येईल असा ऑडिओ (किंवा विडिओ) कार्यक्रम. सर्वसाधारणपणे पॉडकास्ट हे अगदी फुकट ऐकता येतात. जगभरात पॉडकास्ट हे बहुतेक वेळा मोबाइल फोनवरून ऐकले जातात पण वेब-साईटवरूनही ऐकणं सहज शक्य असतं. काही लोकप्रिय पॉडकास्टना जाहिरातदारांचं पाठबळ असतं पण बाकी पॉडकास्ट हा स्वान्त-सुखाय आणि हौसेचाच मामला असतो.

* * कसा ऐकाल "विश्वसंवाद" पॉडकास्ट?

- पॉडकास्टच्या वेब-साईटवरून (www.vishwasamwaad.com)
- Google Play Music वरून (www.bit.ly/mandar-vs-gplay)
- iPhone वर Podcasts नावाचं App आहे, ते वापरा.
- Stitcher नावाचं App कोणत्याही मोबाईल फोनवर (iPhone, Android, Windows) चालतं. यापैकी कोणत्याही App मध्ये जाऊन "vishwasamwaad" असं नाव शोधा. Subscribe केलंत तर नवे एपिसोडस आपोआप डाऊनलोड होतील आणि नवीन एपिसोडस आल्याचंही कळेल.