
बदली बदली दुनिया है मेरी।
जादू है ये क्या तेरे नैनन का?
आपलं जग बदलत जातं, हे अगदी खरं!! या बदलाचंं तरुण वयात असणारंं 'नैनका जादू' हे एक कारण भलतंच गोड!! बदलांसाठीची इतर कडू-गोड व्यावहारिक कारणं मात्र अनेक. वाढणारं वय व अनुभव हे या कारणांपैकीचे दोन मानकरी.
नवर्याच्या नोकरीत बदली चालू झाल्याने गेली १६ वर्षं घरं आणि गावंही बदलली. अशी एकूण ६ घरं बदलली. घर बदललं की परिसर बदलतो आणि शेजारही. प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुभव आणि शहाणपण मिळालं. याचंच एक उदाहरण म्हणजे माझी मुंबईतली एक शेजारीण. उत्तर भारतीयांविषयीचे काही पूर्वग्रह ह्या मुलीमुळे मावळले. हिच्या घरी अदबशीर हिंदी ऐकू यायचं. तेव्हा दुसरी आणि चौथीत असणार्या तिच्या दोन गोड लेकींनी भातुकली खेळता खेळता त्यांंना लागणार्या वस्तूंसाठी 'सामग्री' हा शब्द वापरलेला मला फारच आवडला होता. :) आमची संंवादभाषा हिंंदी होती. दोन प्रकारची हिंंदी!! मराठीची झणझणीत फोडणी दिलेलं माझं हिंदी आणि तिचं निर्भेळ हिंदी. मी वेळोवेळी तिची व्यावहारिक मराठीची शिकवणी पण घेत असे. शाळेतली पाचवी ते सातवीची तीन वर्षं आणि दूरदर्शन व हिंदी चित्रपट यातूनही मिळवलेल्या हिंदीचा तिच्याशी बोलताना चांगलाच कस लागे. पावसाळ्यात एकदा "माश्या फार झाल्यात!" असं म्हणायचं असताना 'मख्खियाँ'ऐवजी शब्द न आठवल्याने ऐन वेळी 'मच्छियाँ' असं म्हणाले होते. :D नंतर लक्षात आला गोंधळ, पण तोवर मी चुकीचा वापरलेला शब्द तिने बरोबर करून ऐकला होता आणि "आप गलत हो"च्या व्यत्ययाच्या पाटीविना बोलणं चालू होतं. मग मीपण झाकली मूठ सव्वा लाखाचीच ठेवली. अशा गमती उभय पक्षांकडून होत. व्यक्त होताना किरकोळ अडचणी येत, पण आम्ही तरीही बोलणं काही सोडलं नाही. अगदी व्यवस्थित कळायचं आम्हाला एकमेकींचं बोलणं!! :)
मुंबईत एका वर्षभरासाठी मला सौ. कुसुम हिचा शेजार लाभला. त्यानंतर अजिबात संपर्क नाही. हा असा विषय आला की गदिमांच्या गीतरामायणातल्या 'पराधीन आहे जगती' या गाण्यातल्या
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा ।।
या ओळी हटकून आठवतात आणि सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकूही येतात. ऐकू आल्या तरी सध्या डोळे काही वर्षांपूर्वीसारखे पाणावत नाहीत. हा बदल वय आणि अनुभव वाढल्यावर येतो त्या खंबीरपणामुळे की कोरडेपणामुळे, ते नक्की कळत नाही. :।
माहेर व सासर दोन्ही उत्तर भारतातल्या एका राज्याच्या राजधानीत असलेली ही मुलगी. एक भिंत सामाईक असलेली आमची जुळी घरं होती. थोडी ओळख वाढल्यावर कुसुम मोकळेपणे बोलायला लागली. नवर्याच्या बदलीमुळे मुंबईत आल्यावर तिने आयुष्यात पहिल्यांदा अगदी रोजच्या भाजीपाल्याइतकी छोटी वस्तूसुद्धा एकटीने जाऊन विकत आणली होती. याची कथा ती सांगत होती. "आमच्याकडे लग्नाआधी भाऊ व वडील व नंतर दीर व सासरे अशी पुरुषमाणसंच बाहेरची सगळी कामे करतात. बाई खरेदीला गेली तरी जाताना त्यांच्यापैकी कोणी सोबतीला हवेच. इथे मुंबईत नवरा नोकरीसाठी दूर अंतरावरून घरी फार उशिरा येतो. त्याला ही सगळी बाहेरची कामं करायला वेळ मिळत नाही. घरात दूध, भाजीपाला असं सगळं नाही आणलं, तर स्वयंपाक कसा करणार आणि घर कसं चालवणार? बाहेर एकटीने जाऊन सामान आणणं भागच पडलं. दोन्ही घरी, सासरी व माहेरी, लोक खूप काळजीत होते. मीसुद्धा घाबरले होते. पण कोपर्यावरून भाजी, किराणा आणणं जमवलं एकदाचं! आता वर्षभरानंतर मी कधीकधी लोकलने नवर्याच्या आॅफिसपर्यंत इतक्या लांब एकटी जाऊ लागले आहे." हे बोलताना मोठ्या अभिमानाची व आत्मविश्वासाची चमक तिच्या चेहर्यावर दिसत होती.
हे ऐकून मी आश्चर्याने पाहतच राहिले तिच्याकडे. नवीन असताना मुंबईत लोकलने एकटीनेच काय, कोणी सोबत असतानाचा प्रवास ही मोठी अवघड गोष्ट वाटते, ही अगदी सोळा आणे पटण्यासारखी बाब! पण दिवसाउजेडी काही खरेदीसारखी दैनंदिन कामं करायला जाणंं अवघड वाटावंं? हे काही गळी उतरेना. वयाने दहा-बारा वर्षांनी माझ्यापेक्षा लहान असलेली, काॅलेजात शिकलेली आणि एका राज्याच्या राजधानीत वाढलेली मुलगी असं बोलतेय??????
माझा चेहरा पाहून तिने आणखी भर घातली. "तिकडे माझी सासूही अजून अशी एकटी जात नाही. आताही माझ्या सासूला नवीन बांगड्या जरी भरायच्या असतील, तरी सासरा किंवा तिच्या दोन मुलग्यांपैकी कोणीतरी सोबत असायला लागतात. त्यांचं असं, तर आमचं काय? गावातच माहेरी जायचं असेल तर एक तर वडील/भाऊ किंवा या घरातला कोणी पुरुष सोबत हवा. असं घरचं पुरुषमाणूस सोबत नसताना जाऊ नाही शकत आम्ही कुठे! त्यांचंही बरोबर आहे. तशी पद्धत आहे आणि परिस्थितीपण." सासूबाईंना बांगड्या भरायला जाण्यासाठी पूर्ण करायला लागणारी अट कळल्यानंतर सूनबाईंचं आधीचं सगळं बोलणं अगदी नीटच कळलं.
त्रयस्थांना कितीही किरकोळ वाटलं, तरी या मुलीने तिच्या सवयीच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडल्यावर, बदलत्या स्थळकाळानुसार हे बदलाकडे नेणारं एक दमदार पाऊल उचललं होतं.
त्या एक वर्षाच्या काळात तिथल्या स्त्रीजीवनाविषयी बरीच नवीन माहिती मिळत गेली. उदाहरणार्थ, मुलाच्या हुद्द्याप्रमाणे हुंडा वाढत जातो. चांगल्या सरकारी नोकरीतल्या कारकून माणसाला तीन ते पाच, तर अधिकारी माणसाला आठ ते दहा मिळतो. (हे आकडे आहेत लाखातले आणि ही गोष्ट आहे २००२ सालातली! आजचे काय आकडे आहेत ते देवच जाणे.) या रोख रकमेशिवाय सोनं वेगळं. जेवणातला मेनू बर्याच अटींसह वरपक्ष ठरवणार आणि नंतर त्यात सतरा खोडी काढून दंगा घालणार, ही अगदी सवयीची घटना. फ्रीज, वाॅशिंग मशीनपासून सगळा संसार मुलीला लग्नात द्यायचा म्हणे. लग्नाआधी पंधरा दिवस घरची पाहुणेमंडळी जमतात. त्यांनी फक्त मौजमजा करायची. कपडे, दागिने, मेंदी ही महत्त्वाची कामं! आलेल्या बायकांनी हाताला मस्त मेंदी लावून बसायचं. जेवणाचं ताटही तुम्ही जिथे असाल तिथे आणून देण्यासाठी माणसं ठेवलेली असतात.
असं सगळं या पद्धतीचं ऐकल्यावर मग मी विचारलेल्या "इतक्या सगळ्या खर्चाचं कसं जमवतात?" या प्रश्नाचं "बेटी है तो पैसा पहलेसे जमा किया होता है, या थोडा खेती बेच देते हैं। और एक बात है, बेटेके शादीके समय मिला दहेज बेटीकी शादीपे दे देते है।" हे उत्तर मिळालं. "लेकिन जिसके पास बहुत जादा पैसा, बिकनेलायक खेती या बेटा दोनो न हो वो क्या करे?" यावर "कुछ तो होता ही है।" असंं सोप्पंं उत्तर आलंं.... असं काही बोलणं झालं की ते ऐकताना माझ्या चेहर्यावर कल्पनेपलीकडचं ऐकल्यावर येतात तसे भाव यायचे. पाठोपाठ "आजच्या काळातही असंच असेल, तर हे स्त्रीच्या बाजूने बदलायला आणखी किती वेळ लागणार आहे? की हे असंच राहणार आहे?" अशी निराशेचीही पावलं उमटायची. पण सर्वात शेवटी ही इथे येऊन बदलत्या परिस्थितीमुळे बदलते आहे, नवीन गोष्टी शिकते आहे हे लक्षात येऊन बरं वाटायचं. हे सगळं बोलताना ती शांंत व आशावादी असायची. काळाप्रमाणे हळूहळू तोही समाज बदलतो आहे असंही तिचं मत होतं. ती सांगते तर ते खरं असणारच. :)
हे वर झालं ते सगळे लांब चेहेरा करून गंभीरपणे बोलावं असे मुद्दे. पण आमच्या दैनंदिन जीवनात बाकीचेही हलकेफुलके असे काही बदल होत होते. एक उदाहरण म्हणजे आठवड्यातून निदान पाच-सात वेळा तरी घरी मृदुमुलायम पनीर बनवणार्या या उत्तर भारतातल्या मुलीकडून मी घरी चांंगलंं पनीर करायला शिकले. तिनेही माझ्याकडून अगदी आपली पुरणपोळी नाही, पण दाक्षिणात्य इडली-सांबार-चटणी शिकून घेतली आणि तिच्या नवर्याने तिच्यावर केलेला "तुला या जन्मी चांंगली इडली बनवायला येऊच शकत नाही" हा आरोप पुसून टाकला. :D

आज एका तपाहून जास्त काळ लोटूनही पनीरसाठी दूध उकळताना "पनीर बनाना बहुतही आसान है। हम सिखा देते है।" असं म्हणणारी कुसुम हटकून आठवते. :)
काही ना काही कारणांनी ते दिवस अधूनमधून आठवतात, तेव्हा तेव्हा गेल्या चौदा वर्षांत कुसुमसारख्या मुलींपासून सुरुवात होऊन आणखी असेच बदलाचे वारे तिकडेही वाहोत व मुलींंची परिस्थिती सबळ होवो, असं मनापासून म्हणते.
