
मी जिच्याशी सतत स्पर्धा करायचे, अशा एका मैत्रिणीकडून 'प्राइड अँड प्रिज्युडाइस'बद्दल ऐकलं, आणि त्या ईर्ष्येने तेव्हा ते वाचून काढलं होतं. ते वय ते कळण्याचं नव्हतंच, महान नाव असलेल्या अशा पुस्तकाबद्दल प्रामाणिक अभिप्राय देण्याचंही नव्हतं. तो देण्याइतपत शिंगं फुटली, तेव्हा हे बालपणीचंच इम्प्रेशन मनात कायम असल्याने 'जेन ऑस्टिन बकवासच' हे मांडायला सुरुवात झाली. काय ती रटाळ, कंटाळवाणी बॉलची वर्णनं, काय ते लग्न हे एकमेव ध्येय वगैरे वगैरे. अशीच कधीतरी हातात पडली ती बीबीसीची १९९५ची 'प्राइड अँड प्रिज्युडाइस'ची सिरीज. आणि मग सगळं सगळं बदललं (कॉलिन फर्थच्या डार्सीची किमया, दुसरं काय?) आणि जेन ऑस्टिन नव्याने भेटली. आणि मग जेवढी वाचेन तेवढी पुरेच ना. त्या पाठोपाठ एमा, मग मॅन्सफील्ड पार्क, मग सेन्स अँड सेन्सिबिलिटी, मग पर्सुएशन आणि मग परत आलेला कंटाळा. तिचं शेवटचं 'नॉर्थेंगर अॅबी' तेवढं वाचून पूर्ण कधीच केलं नाही. पण तिच्या नायिका मात्र विशेष आवडून गेल्या.
यातली एलिझाबेथ बेनेट फारच प्रसिद्ध. त्या पुस्तकातील तिचं वय ओलांडून काहीसं पुढे आल्यावरही मला कौतुक वाटतं तिच्या ठामपणाचं. आपल्या चक्क लाज आणणार्या कुटुंबावरही मनापासून प्रेम करणारी ही बया आपलं राहतं घरही वडिलांच्या मृत्यूनंतर दुसर्याकडे जाणार आहे, हे माहीत असून 'मी प्रेमासाठीच लग्न करेन' असं म्हणायचं धाडस दाखवते. आणि नुसतं दाखवत नाही, तर जेव्हा ते घर ज्याला मिळणार आहे तो मूर्ख माणूस हिला मागणी घालतो, तेव्हा त्याला स्पष्ट नकार देते. एका मोठ्या नावाच्या आणि त्या मोठ्या नावाला भरपूर मिरवणार्या, स्वतःची हांजी हांजी करणार्या लोकांना जमवणार्या, थोड्याशा भीतिदायकच असणार्या लेडी कॅथरीनसमोर बेधडक आपली मतं मांडते. इतकंच नाही, तर प्रेमासाठी लग्न करण्याच्या निश्चयावर एवढी ठाम राहते की अतिश्रीमंत डार्सीची मागणीही नाकारते. आपल्या लाडक्या, सुंदर आणि हळव्या बहिणीवर - जेनवर - नुसतं प्रेम करते असं नाही, तर मूर्खपणे वागणार्या, सगळ्यांवरच संकट आणणार्या लिडियाच्या काळजीनेही अस्वस्थ होते.
आणि खरोखर डार्सीच्या प्रेमात पडली आहे असा साक्षात्कार होतो, तेव्हा मोहरूनही जाते. प्रेमळ, मनमिळाऊ, पण ठाम मतं असणारी लिझी त्या काळाचा विचार करता स्वतंत्र व आधुनिकच म्हटली पाहिजे.
आणि तिच्यापेक्षा अगदीच वेगळी म्हणजे एमा. एमा ही म्हातार्या, सतत तब्येतीची कटकट करणार्या वडिलांसोबत राहून त्यांची श्रीमंत इस्टेट सांभाळणारी अतिशय स्वतंत्र विचारांची मुलगी. पण एमाला या स्वतंत्रपणाचा इतका अभिमान आहे की कधीकधी चक्क तिचा कान पिळावासा वाटतो. काहीशी अतिशहाणी एमा मुळात आहे प्रेमळ. पण स्वतंत्र मतं असण्याच्या तिच्या अट्टाहासात हा प्रेमळपणा लपून जातो. जगाचं भलं करायचे उपद्व्याप करण्याची तिची नसती हौस आणि त्यामुळे होत जाणारी गुंतागुंत ही काही वेळा तर मजेशीर वाटू लागते. यात भरकटत जाणार्या तिला सतत टोचून बोलत का होईना, पण प्रेमाने वाटेवर आणणार्या मि. नाईट्लीचं पात्र फार समजूतदार. तिच्या चुकांतून, मुळात भुसभुशीत पाया असल्याने फिसकटलेल्या कल्पनांतून सावरत ती शिकते, प्रगल्भ होते. हा तिचा नव्याने आलेला प्रगल्भपणा 'एमा' कादंबरीचा मला जीव वाटतो.
'मॅन्सफील्ड पार्क'मधली नायिका 'फॅनी' आणखीनच वेगळी. अतिशय गरीब घरातून श्रीमंत मावशीच्या घरी येऊन चार मावसभावंडांच्या छायेखाली आणि मावशीच्या उपकाराखाली दबून गेलेली ही बिचारी नायिका. नायिका म्हणण्यासारखं तसं हिच्यात काहीच नाही. चार भावंडांपैकी एकट्या एडमंडशीच काय ते तिचं जमतं. पण गावात सुट्टी घालवायला आलेल्या एका भावा-बहिणीची जोडी यांच्या घरात प्रवेश करते आणि फॅनी आणखी मिटू लागते. तिचा लाडका एडमंड त्या मुलीच्या प्रेमात पडतो, हे हिच्या हृदयाला झेपतच नाही. तिचे ठळकपणे दिसणारे दोष एडमंडला कसे दिसत नाहीत, याचा ती मनोमन आक्रोश करत राहते. फॅनी काही जीव लावणारी नायिका नव्हे. पण जेन ऑस्टिनच्या सर्व नायिकांमध्ये एखाद्या घटनेच्या विश्लेषणात न एकदाही चुकणारी अशी ही एकमेव नायिका.
'सेन्स अँड सेन्सिबिलिटी'मध्ये तर जोड-नायिका आहेत. प्राइड अँड प्रिज्युडाइसमध्ये जरी एलिझाबेथ आणि जेन या दोघींबद्दलही बरंच काही असलं (आणि शेवटी दोघींचीही लग्नं होऊन 'साठां उत्तरांची कहाणी' वगैरे होत असलं), तरी त्याची नायिका म्हणून निर्विवादपणे एलिझाबेथच कादंबरीभर वावरते. इथे मात्र परिस्थितीने गांजलेल्या एलिनॉर आणि मरियान सुरुवातीपासूनच अगदी विरुद्ध स्वभाव असणार्या नायिका म्हणून दिसू लागतात. मनात काहीही असलं तरी ते पटकन बोलून दाखवायचं नाही, कधीकधी अगदी वेळ उलटून गेली तरी, असा शांतपणा असणारी एलिनॉर; तर जे मनात असेल ते पटकन करून टाकणारी, सगळं काही उत्कटपणे करणारी मरियान. यांचे स्वभाव तर कधी फारसे बदलत नाहीत, पण त्यांच्यामुळे कादंबरी निरनिराळी वळणं घेत जाते. शेवटी लग्न आणि सुखी संसार या ऑस्टिनीय वळणावर येऊन संपते.
'पर्सुएशन'मधली अॅन ही एलिझाबेथसारखीच काहीशा विक्षिप्त कुटुंबात अडकलेली. पोकळ वाशांचासुद्धा अभिमान धरणार्या घरात घुसमटत राहणार्या अॅनला त्यांच्या प्रतिष्ठेला तिच्या घरच्यांच्या मते न शोभणार्या फ्रेडरिककडून आलेली मागणी स्वीकारायचं धार्ष्ट्य दाखवता येत नाही, पण ती त्याच्या आठवणीत कुढत राहते. जेनच्या नायिका कुणाच्यातरी प्रेमात पडतात, पटकन लग्न करतात आणि संसारात सुखी(च) होतात असं सरसकटीकरण होऊ नये, म्हणूनच अॅन जन्मलेली आहे. सात वर्षं काढते ती त्याच्या आठवणीत. आणि तो परत आल्यावरही लग्नाची अपेक्षा करत नाही. आशा सोडून दिलेलं प्रेम त्यांना कसं पुन्हा भेटत जातं, याची कथा या कादंबरीला वेगळ्या प्रकारे प्रगल्भ ठरवते. इतर नायिकांना एक सर्वसामान्य सामाजिक प्रतिष्ठा आणि बर्यापैकी पैसा असणारे नवरे जेन ऑस्टिनने शोधून दिले. अॅनला मात्र खरोखरचं निखळ सुख शोधून देऊन, मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या या कादंबरीला एक वेगळेपण दिलं.
जेन ऑस्टिनच्या नायिका या काही समाजाविरुद्ध बंड वगैरे करून उठणार्या नव्हेत. पण लग्न हे सुखाचं एकमेव परिमाण असताना त्यांच्या डोक्यातल्या विचारप्रक्रिया जेन अतिशय प्रभावीपणे मांडते. स्वतःच्या नायिकांवर तिचं काही फार आंधळं अपत्यप्रेम नाही. प्रत्येकीच्या गुण-दोषांची चिकित्सा ती कधी स्पष्टपणे, कधी उपहासात्मक, तर कधी किंचित जाणवून जावी इतपत प्रमाणात करते. तिची सहावी कादंबरी वाचण्यात इतका कंटाळा आला की ती मी चक्क सोडून दिली. पण या राहिलेल्या पाच कादंबर्यांमधल्या सहा नायिका कमी-अधिक प्रमाणात सख्या वाटाव्यात, इतकं माणूसपण जपून आहेत. अक्कल जागेवर ठेवून स्वप्नाळू होणार्या या नायिकांसाठी जेन ऑस्टिनची भुरळ पडली, हे एक माझ्यासाठी चांगलंच घडलं असं म्हणावं लागेल.
