मन सुद्ध तुझं गोस्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची, पर्वा बी कुनाची
अंकाची संकल्पना मांडली, तेव्हा हे गीत डोक्यात सतत रुंजी घालत होतं. एकंदरीत आरक्षण, आजची सामाजिक परिस्थिती, शिक्षण, नोकरी मिळवतानाच्या अडचणी या सगळ्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा वाचायला मिळत होत्या. त्या वेळी डोक्यात आलं की या सगळ्या बाबी जर आपण ठरवलं तर किती गौण आहेत! आपल्यासारखेच सर्वसामान्य आयुष्य जगणारे आपल्या आजूबाजूचे लोक काहीतरी वेगळं करतात. सामान्य आणि असामान्य यांच्यामध्ये हाच एक फरक नाही का? सामान्य फक्त विचार करत राहतो आणि असामान्य तो विचार सर्व संकटं पार करत कृतीत उतरवतो. अशा जगावेगळ्या व्यक्तींची वाचकांना ओळख करून द्यायची, हा अंकाचा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर स्त्री-पुरुष अशा सीमांपलीकडे जाऊन, सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक अशी व्यक्तिमत्त्वं आपल्या भेटीला येत आहेत. या निमित्ताने त्यांचं कार्य आणि कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचावं, वाचकांकडून मिळालेल्या कौतुकाने आणि प्रोत्साहनाने त्यांची जिद्द आणखी वाढीस लागावी, हाही हेतू यामागे आहेच.
'दीपस्तंभ' म्हणाव्या अशा या व्यक्तींमध्ये समाजाने उपेक्षिलेल्या स्त्रियांची मायेने काळजी घेणारं डॉक्टर दांपत्य आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी जाऊन पिचलेल्या समाजातील लोकांसाठी कार्य करणाऱ्या समाजसेविका आहेत. आपल्या कामाच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या दंतवैद्य आहेत, तर सहकारातून आर्थिक विकास घडवणाऱ्या स्वयंसिद्धादेखील आहेत. अगदी हटके आणि धाडसी निर्णय घेऊन बॉडी बिल्डिंगमध्ये करियर करणारी ते स्वतः यशस्वी उद्योजिका असताना समर्थपणे मुलीला होम स्कूलिंग करणारी अशा बहुआयामी व्यक्तींना आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या कलागुणांना फुलवून त्याचा स्वत:बरोबरच दुसऱ्यांना आनंद देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांबद्दल यात तुम्ही वाचाल. हौशी फूड ब्लॉगर, एकपात्री प्रयोगातून लोकजागृती करणाऱ्या ताई, जुन्या मूर्तींच्या संवर्धनातून त्यांचं गतवैभव परत आणणारी, रंजक लेखिका आणि कविताकार ही सारी जणू रत्नंच. या भारदस्त व्यक्तिमत्त्वांबद्दल जाणून घेताना, आजच्या बदलत्या विश्वातल्या उपलब्ध संधी समोर येणार आहेत, आपल्या छुप्या कलागुणांपासून आर्थिक स्वावलंबनाच्या नव्या वाटा खुल्या होणार आहेत, तर काळानुरूप बदललेल्या किंवा नव्या रूपात आलेल्या गोष्टींबद्दलही वाचायला मिळणार आहे. हा अभिनव खजिना उघडताना काही जिव्हाळ्याच्या कथा सोबतीला आहेत. आपलं भावविश्व मांडणारे ललित लेख आहेत. मनोरंजनासाठी खुसखुशीत, हलकीफुलकी चित्रंही आहेत.
तेज हे रुजे अंतरी जगण्याचे फूल होते,
शब्दशः हीच ओळख असलेल्या अशा या व्यक्तिमत्त्वांच्या अनेकविध पैलूंचं दर्शन घडवण्यास अंकाचं माध्यम मिळालं. मनातल्या संकल्पना मांडण्यापासून ते शब्दस्वरूप देईपर्यंतचा हा प्रवास म्हणजे एक मोठी जबाबदारीच होती. विषय मांडणीपासून ते प्रकाशनापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर अनाहितांनी हा अंक यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली आहे. घर-संसार, नोकरी, मुलंबाळं ही सगळी व्यवधानं सांभाळत दर्जेदार असे लेख अनाहितांनी दिले आहेत. शिवाय मिसळपाववरच्या जाणत्या आणि अनुभवी हितचिंतक मिपाकरांचीही अनाहितांना साथ लाभली आहे.
अंकासाठी नीलकांत यांनी मिपावर संकलनासाठी दालन खुलं केलं, त्यामुळे बर्याच गोष्टी सहज घडून आल्या. सुरुवातीपासून अंक प्रकाशित होईपर्यंत त्यांची सगळी मदत अतिशय अतिशय महत्त्वाची आहे. नूलकरकाकांनी सगळ्या लेखांचं मुद्रितशोधन करून दिलंच, शिवाय लेख आणखी उठावदार होण्यासाठी काही लेखांमध्ये बदलसुद्धा सुचवले. किलमाऊस्की यांच्या आई श्रीमती हर्षदा राणे यांनी सुरुवातीच्या काही प्राथमिक लेखनाचं शुद्धलेखन तपासलं. सगळ्या अनहितांनी वेळोवेळी अंकाच्या वाटचालीबद्दल चौकशी करून आणि मदतीचा हात पुढे करून आमचा हुरूप वाढवला. सायली भगली या मूनशाईनच्या मैत्रिणीने अंकात तिची काही चित्रं वापरायची परवानगी दिली. श्री. अरुण म्हात्रे यांनी त्यांच्या 'उंच माझा झोका' या कवितेतील ओळी वापरण्यासाठी अनुमोदन तर दिलंच आणि कवितेचं अभिवाचन करा असंही सुचवलं. कंजूसकाकांनी अभिवाचनाच्या संकलनासाठी तांत्रिक मदत केली. या सगळ्यांचे आभार मानून आम्हाला त्यांना परकं करायचं नाही, पण त्यांनी दिलेल्या योगदानासाठी आम्ही कृतज्ञ नक्कीच आहोत.
असा हा अंक वाचकांच्या हाती सुपुर्द करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. जे स्वप्न तीन महिन्यांपूर्वी बघितलं, ते सगळ्यांच्या सहकार्याने आज पूर्णत्वास आलं, याचं समाधान आहे. अंक अमच्यासाठी प्रेरणादायी आहेच, वाचकही अंकातून प्रेरणा घेऊन आपल्या ध्येयाच्या, स्वप्नांच्या वाटेवर पुढे मार्गक्रमण करण्यास प्रेरित होवोत आणि प्रत्येकाला मनोमन वाटो..... येई कवेत आकाश, झुले उंच माझा झोका!
- इडली डोसा, मूनशाईन
*************************
(अंकातील हेडर-फूटरसाठीची चित्रे आंतरजालावरून साभार. एकत्रीकरण श्रेय - मूनशाईन)