मराठी भाषा दिन २०१७: आमुशा (हुबळी, शिकारपूर, मैसूर बोलीभाषा)

1
.
‘ना नीन्न बिडलारे’ फिलम बगासाटी तना सुरेश टाकीजमंदी जारलता. सैतानचे फिलम बगुवा मसून लई रोजने तचे मनात होते. जारले टायमात गरचे “भिशील बे” मसून मसून धांदला करून सोडले व्हते. बगिटले तर तना सा वाजताचेनाच टाकीजला जाऊन सोडनार ओता. गरचे तला मस्कीरीमदी “रात्रीचे १२ वाजताचे बरूबर ओते शो” मसून मटलेसनीच तंना हायकी मनाला लागून घून सोडून १२ ला निगाला ओता.

रात्री ते रस्त्याला गाड्या-घोडे कायबी नवते तसटी तंना चालून घेत जाताय. बगिटले तरं रस्त्यावर कोनीबी नईसारके होते. तंना घाबरून घेतंच जारलाय. कसीतरी टाकीजला घाबरत पोंचून तना बगताय तर लोकांचे कायबी गलाटा नई तित्ते, खाली एक पंदरा ईस लोके. गरंला जावं तरं तनी अनिंदा बी मस्कीरी करतात मसून तना तिकीट काडूनं फिलम बगायला बसून सोडला.

फिलम मटले तर खाली न्हवीन लगीन झारलेलेंचे जिंदगीतं सैतान येते दाखूले व्हते. ते बाईचे अंगात सैतान येते तवा नवरा तीला वाचूं घालतेलेसटी लई संगर्ष करता असी कहाणी होते. पष्ट हाप परंतर सुरेश कसीतरीकी करून फिलम बगताय. दुसरे हापमदी तीचे अंगात सैतान येते ते अवतार बगूनच तना अर्धातने उटून गरी जायसाटी टाकीजचे भाएर पडताय.

उगीच फिलम बगासाटी आलो, लई भ्याले असी विचार करूंन घेतच तना पटापटा चालरलाय. ते रस्ता लई खराब हाय असी लोके म्हटले रहते नई. दोपारी ऑटो मारणारेंना तंचे पाटीमागूटने आईनात बाईचे मुंडी दिसते असी लोके म्हणरलात. तसे इचार सुरेशला मनामंदी येतोते. लोके कायबी लटके सांगूटलात असी तना स्वतालाच म्हणून घेत अजून जलदी चालत येरलाय.

कसीतरकी करून तना एकदाचेलाबी गराजवळ पोंचला. तला कायबी सुचेनासारके होले. सगळे घरं तला सारकेच दिसून ऱ्हायले. तंना घाबरूनं तिगडेस्काळाचं चक्कर येऊन पडून सोडला.

नस्कतला तंला जागे होले. तंचा अण्णा तंला उठून घालरलाय. “रात्रीपासून हुडकूरलोय बा तुला, तरी सांगिटलो हुतो आमुशाला जांऊ नको मसून”, अण्णा मटला. काल रात्री अंदार लई कसटी होता ते सुरेशला आठुले. तंला आमुशाचे चंगलेवनी हाथ पडले होते.
.
1