मराठी दिन २०१७: हरसाल (झाडीबोली)

1
.

मंग असी गरमी वाहाडत जाते
मंग असा संध्याकाडी पाऊस पडते
मंग असे बत्तर बायेर पडतेत
मंग असे कावरल्यावानी करतेत
मंग असे सकारवरी मरून जातेत
मी तई घिवाऱ्या खात रायतो
मी तई आमरस पीत रायतो

मंग असा धुव्वाधार पानी पडते
मंग असा नाल्याइले लगीत पूर येते
मंग असा जगासीन संपर्क तुटते
मंग असे सबइचे बाप वसुदेव बनतेत
मंग असे सब पोट्टे किसन बनतेत
मी तई घरी कानोबा मांडत रायतो
मी तई लोकाइले बुजली वाटत रायतो

मंग असी फसल तयार होते
मंग असी एकाखट्टे विकाले जाते
मंग असा बाजारभाव धपकन पडते
मंग असा जबरदस्ती धान विका लागते
मंग असा किस्तवारी पैसा मिडत रायते
मी तई माया घरी देवपूजा कराले बसतो
मी तई गावागावात मंडई पावाले जातो

मंग असी तपन वाहाडात जाते
मंग असी हिईर आटत जाते
मंग असे हंडेगुंड्या एकाच हिईरीवर दिसू लागते
मंग असा इरभर पानी ओलत जावा लागते
मंग असा बुडबुड गंगा आंग धुवा लागते
मी तई पुरणाची पोडी बनवाले बसतो
मी तई होरीचा रंग खेलाले परतो

मंग असा हरसाल असाचा असाच होत रायते
मंग असी मानसाची उमर वाहाडातच रायते
मंग असा चयरा बदलते, मंग असा नाव बदलते,
तई नावाचेयर्‍यामंगाचा मानूस तसाचा तसाच रायते

-- स्वामी संकेतानंद

शब्दार्थ :-

बत्तर :- पंख फुटलेली वाळवी
कावरल्यावानी:- अधाशासारखे
घिवारी:- गव्हातांदळाच्या पिठाचे घावन( विशेषतः आमरसासोबत खातात)
कानोबा:- कृष्ण, जन्माष्टमीला दिड दिवसाचा कृष्ण बसतो आमच्याकडे
बुजली:- गव्हाचे कोवळे रोप. कृष्णविसर्जनानंतर एकमेकांना वाटतात. खास परडीत ही बुजली तयार केलेली असते
किस्तवारी:- हप्तेवारी
मंडई : जत्रा
तपन: ऊन
इरभर: दिवसभर
पानी ओलने : पाणी शेंदणे
.
1