
माझा जन्मच डोंगराळ भाग आणि समुद्र याच्या आसपास झाल्याने लहानपणी टेकडी चढणे मला काही नवीन नव्हते. आमची शेती आणि माझे आजोळ हे अगदीच डोंगरालगत होते. त्यामुळे लहानपणी आजोळी गेले की जवळची टेकडी चढणे नेहमीचेच असे. त्या टेकडीचीही खासियत अशी की थोड्या अंतरावर अरुणा इराणीचे फार्म हाउस असल्याने कोणे एके काळी तिथे जुन्या सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. त्या काळी गॅस गावात पोहोचले नसल्याने चुलीसाठी लागणारे सरपण गोळा करण्यासाठी बायका लांबवर मोठ्या डोंगरावर जात असत. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही भावंडेही आजी अन् माम्यांबरोबर जाऊन लाकूडफाटा जमा करायचो व छोटी मोळी बनवून डोक्यावर घेऊन यायचो. विरारच्या जीवदानीचा डोंगर तर लहानपणी कितीतरी वेळा चढले असेन. चढताना पायवाटेने चढायचे आणि उतरताना पायर्यांवरून उतरायचे हे ठरलेले असे. लहान असल्याने भरभर चढता यायचे, तेव्हा असे वाटायचे की ही मोठी माणसे इतकी कशी थकतात बरे!!! आमची कुलदेवता कार्ल्याची एकविरा देवी असल्याने लहानपणी तिथेही जाणे व्हायचेच. एकदा हाजी मलंगगडला रात्री चढलो होतो, पण अंधार असल्याने आणि लहान असल्याने कसे चढलो, ते आठवत नाही. तर अशी माझी नाळ डोंगरांशी घट्ट जुळली गेली होती. पण जसजशी मोठी होत गेले, तसतसे शिक्षण आणि नोकरी यामुळे डोंगर चढणे हे जवळजवळ बंदच झाले. तरीही प्रत्येक ठिकाणी डोंगर साथ द्यायला उभेच असत. खूप वर्षांनी 'जीवदानी' डोंगर चढण्याचा मोह झाला आणि अचानक लहानपणी आपण भराभर चढलो तरी मोठी माणसे दमून, थकून हळूहळू का चढतात, याचे उत्तर मिळाले. थोडे अंतर असूनही इतकी दमछाक झाली की आता असे धाडस पुन्हा होईल की नाही याची शाश्वती नव्हती. डोंगर उतरल्यावर पाय आहेत याची जाणीवही होईना. पण धाडस करून नंतर १ वर्षाच्या अंतरावर अशा २-३ फेर्या केल्या. २००९पासून मी शिर्डी पदयात्रेला जायला लागले. सुरुवातीच्या ५ दिवसांचा रस्ता हा डोंगरातूनच असल्याने घर जवळच आहे असे वाटते. जव्हारचे घाट, मोरचोंडी घाट सगळे आपलेच वाटतात. पण एकदा का नाशिक आले की घरापासून लांब आल्याची जाणीव होते.
८ मार्च २०१५च्या जागतिक महिला दिनानिमित्त सह्याद्री ग्रूपतर्फे आजोबागडला महिला विशेष ट्रेक जाणार आहे, असे माझी मैत्रीण कविता नवरे हिने कळवले. मी लगेचच माझे नाव नोंदवले. आजोबागडला जाण्यासाठी आसनगाव स्टेशनच्या बाहेर सकाळी ८ वाजता भेटायचे ठरले होते. मला त्यासाठी बोईसरहून आदल्या दिवशीच निघावे लागले. ८ तारखेला एकूण ५३ महिलांनी ट्रेकला हजेरी लावली. गडावर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यँत जाऊन परतायचे होते. तिथे पोहोचल्यावर सह्याद्री ग्रूपच्या मॅनेजमेंट टीमने समाधी, वीरगळ याबद्दल माहिती सांगितली. नंतर विरंगुळा म्हणून छोटे खेळ घेतले गेले. जेवून परतायला सुरुवात झाली. निसर्गाच्या सान्निध्यात दिवस खूपच छान गेला. ट्रेक मॅनेजमेंट टीमने ट्रेक खूप छान अरेंज केला होता. मुख्य म्हणजे ही टीम 'नो प्राॅफिट नो लाॅस' बेसिसवर ट्रेक अरेंज करते, हे या ग्रूपचे वैशिष्ट्य आहे. परतताना संपूर्ण खर्चाचा हिशेब करून उरलेले पैसे प्रत्येकीला परत दिले गेले. टीमचा प्रत्येक सदस्य सर्वाँची अगदी व्यवस्थित काळजी घेत होता. हे सर्व पाहून आता सर्व ट्रेक मी याच ग्रूपबरोबर करायचे ठरवले. पण हा ग्रूप दर महिन्याला ट्रेक अरेंज करतो हे माहीत नसल्याने मी पुढल्या महिला दिनाची आतुरतेने वाट पाहू लागले. ८ मार्च २०१६ला सोमवार असल्याने ७ मार्चला महिला विशेष ट्रेक 'वन ट्री हिल पाॅईंट माथेरान'ला जाणार असे कळले. या वेळी मिपाकर अजयालाही येण्याचे सुचवले. अजयाला जास्त चालण्याची सवय नसल्याने ती घाबरतच हो म्हणाली, पण शेवटच्या दिवसापर्यंत तिचे हो-नाही चालले होते. ट्रेकला जायचे म्हणजे मला नेहमीप्रमाणे बोईसरहून आदल्या दिवशी निघावे लागले. कविता नवरे हिच्या घरी ६ तारखेला मुक्काम करून ७ मार्चला ट्रेकला निघाले. मजल-दरमजल करत आणि अजयाला जोडीला घेऊन हा ट्रेक पूर्ण केला. वर चढल्यावर अजयाला जो काही आनंद झाला, त्याने सर्व शीण निवळला.

त्या ट्रेकमध्ये कळले की हा ग्रूप नाइट ट्रेकही अरेंज करतो. दरम्यान एप्रिलमध्ये माझी शिर्डी पदयात्रा झाली. २१ मेला पनवेलपासून काही अंतरावर असलेल्या दोढणी या गावातून ट्रेक सुरू होऊन माथेरानच्या सनसेट पॉईंटपर्यंत पोहोचायचे आहे. मी अगदी उत्साहात तयारी सुरू केली. रात्री १०ला पनवेल स्टेशनला पोहोचलो. तिथून जीपने दोढणी या गावी येऊन रात्री १ वाजता चढायला सुरुवात केली. अतिशय उन्हाळा असल्याने चढतानाही त्रास जाणवत होता. पण चांदण्या रात्रीत ट्रेकिंगची मजा काही औरच. वर आसमंतात विखुरलेले चांदणे आणि तसाच काहीसा नजारा पनवेल नगरीचा - खाली दूरवर चांदणे विखुरणारे चमचमते दिवे. रात्र असल्याने किती उंचावर चढलो आहोत हे समजत नव्हते. मजल-दरमजल करत आमचा शेवटचा ग्रूप पहाटे ४ला सनसेट पॉईंटला पोहोचला. तिथेच सर्व जण झोपलो. थोड्या दिवसांत जूनमध्ये मृगगडची घोषणा झाली. पुन्हा मिपाकर अजयाशी संगनमत करून ट्रेकला जायची तयारी केली. नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी प्रवास करून दादरला पोहोचून ट्रेकच्या दिवशी दादरहून सेंट्रल रेल्वेने कर्जत स्टेशनला पोहोचून तिथून खोपोली ट्रेन पकडली. लाउजे स्टेशनला उतरून चहापाणी करून मग गड चढायला सुरुवात केली. नेहमीच्या मानाने मृगगड थोडा कठीण वाटला चढायला. वर जाऊन सर्व पाहून खाली उतरायची वेळ आली, तेव्हा कळले - जिथून वर चढलो होतो, तिथूनच खाली उतरायचे आहे. आता झाली ना पंचाईत! माथेरानच्या दोन्ही ट्रेकना फक्त एका वेळी चढायचे होते आणि दुसर्या बाजूने गाडीने खाली यायचे होते. पण मृगगडला तसे नव्हते. मला जास्त उंचावरून खाली उतरताना भीती वाटते. मृगगडावरचा सर्वात उंचावरचा पॅच मला कठीण वाटत होता. सर्व जण एकेक करून उतरत होते आणि माझी धडधड वाढत चालली होती. तेवढ्यात पाऊसही सुरू झाला आणि मला उतरणे कठीण वाटू लागले. ग्रूपचे व्हॉलेंटियर्स सर्वांना उतरायला मदत करत होते. सर्वांच्या मदतीने कसाबसा तो कठीण पॅच उतरले आणि जी काही सुसाट पळत सुटले ती खाली उतरेपर्यंत काही थांबले नाही. पुन्हा दुसर्या ट्रेकची वाट पाहू लागले. जुलैमध्ये आडोशी धबधबा घोषित झाला आणि ग्रूपचे मुख्य - ज्यांना आम्ही कॅप्टन म्हणतो, त्यांनी मला आडोशी धबधब्याच्या अरेंजमेंट्स पाहण्यास सांगितले. पण नेमकी तापाने आजारी झाल्याने मला काहीही करता आले नाही आणि जाताही आले नाही, म्हणून ती संधी हुकली. त्यानंतर ऑगस्ट... वडाप धबधबा घोषित झाला, त्या वेळीही वडिलांच्या मोठ्या आजाराच्या धावपळीमुळे मला वडाप धबधब्याला जाता आले नाही.


त्यानंतर ऑक्टोबर २०१६मध्ये उंबरखिंडची घोषणा झाली. ग्रूपचे मुख्य कॅप्टन यांनी मला पुन्हा फोन करून ट्रेकच्या अरेंजमेंटस पाहण्यास सांगितले आणि ही संधी मात्र मला सोडायची नव्हती. कॅप्टन थोड्या दिवसांकरता हिमाचल प्रदेशला जाणार होते, त्यामुळे त्यांना अरेंजमेंट्स पाहणे जमण्यासारखे नव्हते. सगळ्या ट्रेकर्सकडून खर्चाचे पैसे घेणे, हिशेब ठेवणे वगैरे. ट्रेक लोणावळ्याच्या कुरवंडे गावापासून सुरू होऊन खाली चावणी गावात संपणार होता. सकाळचा नाश्ता, लोणावळ्यापासून कुरवंडे गावापर्यंत जीपची व्यवस्था, दुपारचे जेवण, चावणी गाव ते कर्जत रेल्वे स्टेशनपर्यंतची बस अशी सर्व व्यवस्था केली व लोणावळ्याला पोहोचून कुरवंडे गावापासुन ट्रेक सुरू केला. पावसाळ्यातले मनमोहक वातावरण, रिप रिप पाऊस, आजूबाजूला उतरलेले ढग पाहत पाहत डिसेंडिंग ट्रेकला सुरुवात केली. खाली चावणी गावात पोहोचायचे होते. या जागेवर शिवाजीराजे आणि त्यांचे मावळे थांबले होते या कल्पनेनेच अगदी भारावून गेलो होतो. सह्याद्रीवर ८ वर्षांनी कारवी फुलली होती. सर्व नजाराच अदभुत वाटत होता. सर्व जण अगदी भारावल्यासारखे चालत होते. पावसामुळे काही ठिकाणी निसरडे झाले होते. साधारण २ तास चालल्यानंतर एका निसरड्या जागेवर पाय घसरला आणि मी आदळलेच. फ्रॅक्चर नव्हते म्हणून हायसे वाटले, पण गुडघ्याला दुखापत झाली होती आणि चालताना लंगडू लागले. बर्याच ठिकाणी खाली उतरताना एक पाय खाली टाकून दुसरा दुखरा पाय हाताने उचलून खाली ठेव असा पुढचा प्रवास सुरू झाला. रमतगमत साधारण ५ तासांत चावणी गावी पोहोचलो. गावाच्या थोड्या आधी एक ओढा लागला आणि आपला शीण घालवायला सर्व पाण्यात भिजू लागले. कॅप्टनच्या मदतीने सर्व व्यवस्था अगदी चोख झाली होती. कर्जत स्टेशनला पोहोचेपर्यंत अगदीच लंगडत चालू लागले. नेहमीच्या ट्रेकर्सनी मला ट्रेनमध्ये चढायला आणि उतरायला मदत केली, तसेच कविता नवरेच्या घरी नेऊन पोहोचवले. पुढे १२ दिवस मी लंगडतच चालत होते. शेवटी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांच्या मते नी लॅटरल लिगामेंट स्प्रेन झाले होते. अॅलोपथी औषधे घ्यायचा कंटाळा, म्हणून मला जवळजवळ १ महिनाभर लंगडावे लागले.

पुढे नोव्हेंबरमध्ये बालदिन विशेष दोन दिवसीय लोहगड-विसापूर ट्रेक घोषित झाला. लहान मुलांना घेऊन लोहगड-विसापूर केले. तंबूत राहण्याची मज्जा अनुभवली. थोडा आत्मविश्वास वाढला, तसा मी या ग्रूपसाठी लोहगड लेडीज ट्रेक घोषित केला. पहिल्यांदा मॅनेजमेंटचे स्वयंसेवक घेऊन न जाता एकटीने ५५ बायकांना सुखरूप नेऊन सुखरूप आणण्याचे आव्हान मी पेलले. या ट्रेकमध्ये मला बरेच काही शिकायला मिळाले. अनुभवांची खाणच जणू. त्यानंतरचा मी अरेंज केलेला ट्रेक म्हणजे २९ जानेवारी २०१७चा कळसूबाई. कळसूबाई हे महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर. ३५ जण गेलो होतो या ग्रूपमध्ये. खूपच छान झाला हा ट्रेक. आत्मविश्वासही वाढला, कारण मला स्वतःला उंचावर गेल्यावर भीती वाटते आणि कळसूबाई म्हणजे उंचच उंच शिखर. आता कुठे प्रवासाला सुरुवात झालीये आणि माझ्यामागे खंबीरपणे उभी राहणारी आणि माझा आत्मविश्वास वाढवणारी माणसे म्हणजे आमच्या सह्याद्री ग्रूपचे कॅप्टन - मला माझ्याबद्दल जितका विश्वास नाही, तितका कॅप्टनचा माझ्यावर आहे, ते सदैव पाठीशी असतात; माझी मैत्रीण कविता नवरे - तिच्याकडे मी तिच्या घरातलीच एक या हक्काने राहते, कारण बोईसरसारख्या ठिकाणाहून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे, एका दिवसात तर शक्यच नाही; आणि माझ्या या हौसेला पाठिंबा देणारी माझी मैत्रीण मिपाकर अजया या सगळ्यांमुळे माझी ट्रेकची हौस पूर्ण करू शकले. मला 'ट्रेकहिता' ही आणखी नवी ओळख मिळाली आहे. सह्याद्री ग्रूपमध्ये सतत माझी ओळख वाढत चालली आहे.
