
हरनी
नख्खी नख्खीतुन बोंड
कापसाचं फुललं
पराटीच्या वावरातं
जसं चांदनं सांडलं
हे बावरली हरनी
कोनं ऊभी वावरातं
टाके चान्नी वानी बोंड
पाठीवरं खंदाळीतं
बोंडा बोंडाच्या मंधात
गोलं मुखळा खुलला
आजूबाजूनं चांदन्या
मंदी चंद्र उजीळला
मोठ मोठाल्या डोयानं
कायं ईकळे पायते
जीवघेनी ते नजरं
घोरं जीवाले लावते
ठुलं बांधूनं गाठोळं
तुया येचल्या बोंडाचं
सांगं कुठीसा ठेवलं
बोंड माया हुर्दयाचं?
-ऊद्धव गावंडे
