मराठी भाषा दिन २०१७: पुणेरी कसे बनाल? (पुणेरी)

1
पुणेरी कसे बनाल?
पुणेरी मराठी भाषा, पुणेरी माणसांचे स्वभाव, पुण्याचे रस्ते, पुण्याची रहदारी, पुण्यातील दुचाकी आणि दुचाकी चालक, पुणेरी दुकानदार आणि गिर्‍हाइक अशा अनेक विषयांवर मिटक्या मारत, कुत्सितपणे चर्चा केली जाते. पुण्याला, पुणेरी माणसांना आणि तत्सम पुणेरी गोष्टींना नावं ठेवायचं काम पुण्याबाहेरील मंडळीच करतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे - न्यूनगंड! स्वतःला 'पुणेरी' बनता न आल्याने निर्माण झालेली कमीपणाची भावना! म्हणतात ना - कोल्ह्याला द्राक्षं आंबट, तसंच काहीसं. अर्थात यात त्यांचीही काही चूक नाही म्हणा. 'पुणेरी' कसं व्हायचं, याविषयी ना कसला मार्गदर्शन वर्ग, ना कसले पुस्तक. गुरुवर्य पु.ल.नी पन्नास वर्षांपूर्वी ह्या विषयावर मार्गदर्शनपर काही लिखाण केलं. पण कालौघात ते सगळे नियम तंतोतंत लागू होत नाहीत. म्हणूनच आम्ही हे बनवायचं काम मनावर घेऊन एक नवीन पुस्तक लिहिलं आहे- 'पुणेरी कसे बनाल?' आता पुणेरी होण्याची सगळी काळजी झटकून टाका. आम्ही आपल्याला बनवू. मराठी दिनाच्या निमित्ताने ह्या पुस्तकातील काही मजकूर आम्ही प्रकाशनपूर्व येथे देत आहोत. त्यावरून वाचकांना ह्या पुस्तकाचा आवाका लक्षात येण्यास मदत होईल.

पुणेरी होण्यासाठी अंगी कोणत्याही गोष्टीबद्दल 'जाज्वल्य अभिमान' असावा लागतो. पण हा जुना नियम झाला. आजकालच्या काळात जाज्वल्य अभिमानाबरॊबरच अंगी 'माज' असावा लागतो. माज नुसता असून चालत नाही, तर जिथे संधी मिळेल तिथे तो दाखवत राहणं अत्यावश्यक आहे. 'माज' आणि 'जाज्वल्य अभिमान' यांतील सीमारेषा अतिशय पुसट असते. हा अतिसूक्ष्म फरक लक्षात येण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू-

1

पुणेरी पाटी ही पुणेकरांसाठी जाज्वल्य अभिमानाची बाब आहे. आता वरील पाटीवरील मजकुरातील शेवटच्या दोन ओळी लक्षात घेऊ. टेनिस शूजची व्याख्या ठरविण्याचा अधिकार क्रीडा समितीने राखून ठेवला आहे ह्या ओळीत जे प्रतीत होते, त्याला 'माज' म्हणतात.

पुणेरी बनण्यासाठी आणखी एक महत्त्वाची पायरी म्हणजे पुणेरी रहदारीत अतिशय आत्मविश्वासाने वाहन - विशेषतः दुचाकी चालवणं. ह्या पुण्यभूमीचं हे वैशिष्ट्यच आहे. उगीच नाही मावळे सैन्यातून वाट काढत सहज निशाणापर्यंत पोहोचत असत. आपलं ध्येय कितीही अवघड असो, अडचणींमधून मार्ग काढत ते कसं गाठायचं ह्याचं शिक्षण पुण्याच्या रहदारीतून दररोज मिळतं. त्यासाठी साधे सरळ सोपे नियम आहेत.

१) सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहतुकीचे नियम, लेनची शिस्त वगैरे सगळं थोतांड आहे व हे सगळं केवळ वाहन परवाना देताना सरकारी अधिकाऱ्यांना काहीतरी काम केल्यासारखं वाटावं म्हणून निर्माण केलं गेलेलं आहे, हे मनावर बिंबवून घेणं.

२) वाहन चालवताना आपण व्हिडिओ गेम खेळत असल्याची समजूत करून घेऊन त्या प्रकारेच वाहन चालवणं.

३) वाहनाचे बाजूचे आरसे मागचं दिसेल अशा तऱ्हेने कधीही लावायचे नसतात. जी व्यक्ती आरसे नीट लावून वाहन चालवते, तिला भ्याड समजलं जातं.

४) वाहन चालवताना, 'ओ काका चला', 'काय घरात हिंडताय काय?', 'बागेत फिरताय काय?', 'अहो हा रस्ता आहे बाग नाही', 'ए चल चल', 'माकड कुठला', अशा प्रकारे मोठमोठ्याने टिप्पणी करावी.

५) सिग्नलच्या वेळेच्या प्रणालीत काही तरी गडबड आहे असं गृहीत धरून सिग्नल संपायला ५-६ सेकंद असतानाच गाडी सुसाट वेगाने दामटवावी.

'पाण्यात पडल्यावर पोहता येतं', तसंच गाडी घेऊन एकदा का रस्त्यावर आलं की आपोआप वरील नियम अंगवळणी पडतात. कुणीतरी म्हटलेलंच आहे की एकदा का पुण्यात गाडी चालवली की माणूस जगात कुठेही गाडी चालवू शकतो.

1

'पत्ता सांगणं' ही क्रियाही पुणेरी होण्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सर्वसामान्यपणे जेव्हा पत्ता माहीत नसतो किंवा सापडत नसतो तेव्हाच विचारला जातो, हे लक्षात घेऊन शक्यतो सोप्या भाषेत सांगणं अपेक्षित असतं. पण पुणेरी पद्धत जरा वेगळी आहे. पत्ता सांगताना, 'डावीकडे', 'उजवीकडे' ह्या सर्वमान्य संकेतांना इथे काहीच अर्थ नसतो. पुण्यात पत्ता सांगताना दोन मुख्य दिशांचा उपयोग केला जातो, 'वर' आणि 'खाली'. ह्या दोहोंच्या खालोखाल, 'आग्नेय','नैऋत्य'... ह्या उपदिशांचा उपयोग होतो आणि सर्वांत शेवटी, पूर्व, पश्चिम,.... ह्या आपल्या चार मुख्य दिशा. तसंच पत्ता सांगताना कोणालाही सहज माहीत असलेली रस्त्यांची नावं किंवा ठिकाणं न सांगता सहसा माहीत नसलेली नावं सांगणं. त्यातून पत्ता जर पेठांमधील असेल, तर मग सोन्याहून पिवळं! नमुन्यादाखल एक उदाहरण पाहू या - समजा आपल्या उत्तर भारतीय शेजाऱ्याला बायकोसाठी सिल्कची साडी विकत घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला कोठून घ्यावी असं विचारलंय. आपण त्याला सांगावं की जर उत्तम प्रतीचं सिल्क हवं असेल, तर 'पल्लोड'सारखं दुकान नाही. वास्तविक ह्या दुकानात १५ हजाराखाली साडी येत नाही याची आपल्याला कल्पना आहे, तसंच शेजाऱ्याच्या आर्थिक परिस्थितीचीही कल्पना आहे. पल्लोडचा पत्ता सांगताना 'रंगोली' हॉटेलवरून सरळ खाली जा असं सांगावं. हे रंगोली हॉटेल कधीचंच बंद झालंय. मग साहजिकच तो शेजारी फुकटची खेप घालून परत येऊन विचारेल. मग आपण म्हणावं की बजेटमध्ये हवी असेल, तर रविवारातच जावं. आता रविवारात जाण्यासाठी रस्ता सांगताना पुण्यातील तमाम गल्ल्या, पासोड्या, भांग्या वगैरे नावं धारण करणाऱ्या देवांची देवळं, अशा विविध स्थळांचं दर्शन शेजाऱ्याला घडेल असं पाहावं. म्हणजे, "मोदी गणपतीपासून सरळ वर जा. तेथून पत्र्या मारुतीवरून पुढे ईशान्येला जाऊन वर जा आणि रामचंद्र बुचडे पथवरून सरळ खाली जा, तिथे समोरच अचानक तरुण मंडळ दिसेल, तिथून वायव्येला सरळ वर जा" अशा प्रकारे दिशा सांगाव्यात. शगुन, नटराज सिनेमा, चित्रशाळा अशा सध्या अस्तित्वात नसलेल्या स्थळांची नावं आवर्जून सांगावीत. म्हणजे समोरचा पुरता गांगरून जातो.

1

गुरुवर्य सांगूनच गेले आहेत की 'खाजगी पुणेरी' आणि 'सार्वजनिक पुणेरी' हे पुणेरी होण्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. पण पन्नास वर्षांनंतर हे टप्पे पार करण्यासाठी कमी मेहनत घ्यावी लागते. काळाचा महिमा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची किमया! पूर्वी सार्वजनिक पुणेरी होण्यासाठी वेगवेगळ्या चर्चासत्रांना, व्याख्यानमालांना हजेरी लावणं गरजेचं होतं. तसंच वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहावं लागायचं. पण सध्याच्या काळात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या मराठी संस्थळांनी ह्या सर्व गोष्टी अत्यंत सोप्या करून ठेवल्या आहेत. त्यामुळे 'बाजरीवरील कीड'च काय, त्यापेक्षाही फालतू विषयावर आपले मत आपण ठणकावून लिहू शकतो. शिवाय इथे टोपणनावाचीसुद्धा सोय असते. सगळाच 'आभासी' मामला! एकाच वेळी दोन-तीन टोपणनावं घेऊन ठेवावीत, म्हणजे एकाच विषयावर आपण वेगवेगळी मतं व्यक्त करू शकतो. ह्या संस्थळांवर लिहिताना, कोणत्याही विषयावरची मतं आणि विचार हे व्यक्तिसापेक्ष असतात हा नियम विसरून जायचं असतं. आपले विचार आणि मतं समोरचा मान्य करेपर्यंत वाद घालत राहायचं, अगदी हमरीतुमरी झाली तरी चालेल.

आपल्याला जर वाद घालायचा नसेल तर दुसरा कोणी वाद घालताना किमान, 'व्यक्तिगत टीका टाळा', 'मुद्द्याला धरून लिहा', असा उपदेश करण्याचा आव आणून आगीत तेल ओतात राहायचं. समोरच्याशी वाद घालायला मुद्दा सापडत नसेल, तर 'अभ्यास वाढवा' असा शेरा मारावा किंवा समोरच्याच्या सदस्यकाळावरून त्याची मापं काढावीत. दुसऱ्यांच्या लेखांवर प्रतिसाद देताना, आपण ज्येष्ठ समीक्षक असल्याचा आव आणून नेहमी टीकात्मकच प्रतिसाद द्यावा. एखाद्या लेखावर कोणताच प्रतिसाद सुचत नसेल, तर 'पॉपकॉर्न घेऊन बसलोय' किंवा 'अच्चं झालं तर' अशी नाहक हिणकस शेरेबाजी करावी. नवीन लिहायला विषय सुचत नसेल, तर बायकांचा कजागपणा, विवाहोत्सुक मुलांकडून विवाहोत्सुक मुलींच्या अवास्तव अपेक्षा, भ्रष्टाचार, भारतात हिंदूंवर, मुसलमानांवर की सगळ्यांवर अन्याय होतोय, अशा सदाहरित विषयांवर लिखाण करून खुशाल काथ्या कुटावा. मात्र सुरुवातीला संस्थळांवर जाऊन नुसतं निरीक्षण करावं आणि संस्थळांची विशिष्ट भाषा शिकून घ्यावी. 'व्यनि', 'खफ', 'चेपू', 'रच्याकने' यासारखे शब्द शिकून घ्यावे. ही भाषाशैली भाषिक वैशिष्ट्याचा नमुना म्हणून मान्यताप्राप्त आहे. अशा प्रकारे मराठी संस्थळांवर वावरल्याने एकाच वेळी आपण 'खाजगी' आणि 'सार्वजनिक' पुणेरी बनतो.

'पुणेरीपणा' एखाद्या स्थळापुरता मर्यादित नसून हा मानवी स्वभाववैशिष्ट्यं आणि वृत्ती यांचा अजब मिलाफ आहे. त्यामुळेच कोणत्याही पुणेकराव्यतिरिक्त मुंबईकर, नागपूरकर किंवा आणखी कोणीही 'पुणेरी' बनू शकतो. अतिशय कष्टाचं काम असलं, तरीही एकदा का साध्य झालं की मग त्याचा काही वेगळाच कैफ असतो.

'पुणेरी कसे बनाल?' ह्या आमच्या आगामी मार्गदर्शक पुस्तकातील हे काही उतारे. मौजमजा प्रकाशन हे पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित करत आहे. सुज्ञ मिपा वाचकांच्या अभिप्रायांसाठी आम्ही हे उतारे प्रकाशनपूर्व येथे दिले आहेत. 'पुणेरी' होण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांना हे पुस्तक वाट दाखवण्याचे काम करेल, यात शंकाच नाही. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती.
------------------------------------------------
(चित्रे आंतरजालावरून साभार)

1