कोकणची धाकड गर्ल - अश्विनी वास्कर

.

आपल्या महाराष्ट्रात फार पूर्वीपासूनच कुस्ती आणि 'बॉडी बिल्डिंग' म्हणजेच 'शरीरसौष्ठव' या मर्दानी खेळांची परंपरा आहे. मुंबई श्री ते महाराष्ट्र श्री हा टप्पा पार पाडून सुहास खामकर, प्रशांत साळुंखे, संग्राम चौगुले यासारखे महाराष्ट्राचे अनेक सुपुत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर विजयाचा झेंडा फडकवत आहेत. आता त्यांच्या जोडीने कोकणातील एका छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुलगी पराक्रम गाजवू लागली आहे. ती आहे रायगड जिल्ह्यातील पेण येथील अश्विनी भालचंद्र वास्कर. मुंबईत ७ डिसेंबर १४ रोजी झालेल्या 'वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स' या स्पर्धेत अश्विनीने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या स्पर्धेत तिला अपेक्षित यश लाभलं नाही, पण अनेक अडचणींशी सामना देत तिने केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर परदेशी खेळाडूंना टक्कर दिली. आम्हां पेणकरांना तिचा सार्थ अभिमान वाटतो. ती कोकणातील आणि IBBFकडून (Indian Body Building Federationकडून) खेळणारी भारतातील पहिली महिला बॉडी बिल्डर आहे.

खालील फोटोत तिच्या महत्त्वाच्या स्पर्धांची माहिती दिली आहे -

.

मी तिच्याकडे मुलाखत घेण्यास गेले. मुलाखत घ्यायची माझी पहिलीच वेळ असल्याने थोडं दडपण आलं होत. पण तिथं गेल्यावर अश्विनीशी आणि तिच्या बाबांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्या गप्पांमधूनच तिचा साधेपणा, सच्चेपणा आणि आत्मविश्वास दिसू लागला.

. . .

प्रश्नः अश्विनी, बॉडी बिल्डिंगसारखं पुरुषप्रधान क्षेत्र कसं काय निवडलंस? या क्षेत्रात यायचं कधी आणि कसं ठरवलंस?

अश्विनी: या क्षेत्रात येणं हा केवळ योगायोगच ठरला.
रत्नागिरीला MSc in Fisheries Science पूर्ण केल्यावर मुंबईत Central Institute Of Fisheriesमध्ये नोकरी करत असताना, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिमला जायला सुरुवात केली. मी खूप लठ्ठ झाले होते आणि वजन कमी करणं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर होता. व्यायाम करता करता व्यायामाची आवड निर्माण झाली. एक वर्षात अनावश्यक वजन कमी झाल्यामुळे हुरूप वाढला आणि पुढे या क्षेत्रात अजून काहीतरी करावंसं वाटू लागलं. पण नेमकं काय करावं हे माहीत नव्हतं, म्हणून K11 या मुंबईस्थित संस्थेत 'फिटनेस ट्रेनर'चे कोर्स केले. तिथेच मला या क्षेत्रातील माझे मार्गदर्शक-गुरू कैझाद कपाडिया भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने पूर्ण वेळ 'फिटनेस ट्रेनर' व्हायचं ठरवलं. योग्य व्यायाम आणि आहार घेत होते, त्यामुळे शरीर आकार घेऊ लागलं, अगदी तेव्हाही स्पर्धेसाठी जायचं ठरवलं नव्हतं.

माझ्या पहिल्या स्पर्धेच्या फक्त १२ दिवस आधी माझे गुरू आणि सहकारी यांच्या प्रोत्साहमुळे मी स्पर्धेत उतरायचं ठरवलं आणि तिथूनच हा प्रवास सुरू झाला. हे सगळं घडलं व्यायामाला सुरुवात केल्यापासून फक्त दीड वर्षात.

.

प्रश्नः बॉडी बिल्डिंगसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुझा रोजचा सर्व आहार कसा असतो?

अश्विनी: दिवसातून मी दोनदा किंवा एकदा मिळून ३ ते ४ तास व्यायाम करते. यात वेट लिफ्टिंग, स्कॉट्स यावर जास्त भर असतो. स्पर्धा जवळ आली की व्यायाम आणि आहार वाढवला जातो. मी प्रथिनयुक्त आहार जास्त घेते. कर्बोदकं एकदम कमी प्रमाणात. नैसर्गिक रूपातील प्रथिनं घेण्यावर माझा जास्त भर असतो. दर ३ तासाने खावं लागतं.

प्रश्नः इतकी प्रचंड मेहनत करण्यासाठी तुला मानसिक बळ कसं मिळतं? आमचा तर दर वर्षी १ जानेवारीपासून व्यायामाला सुरुवात करण्याचा संकल्प थोड्याच दिवसात बारगळतो.
हल्लीच 'दंगल' पहिला, त्यात मेहनतीच्या जोडीला असणारा आहार-विहारावरील संयम पाहण्यात आला. पाणीपुरी वगैरे चमचमीत खायचं नसतं, हे खरं आहे का?

अश्विनी: कारण मी वर्षाच्या मधूनच व्यायाम सुरू केला. जस्ट जोकिंग हं. (आणि ती खूप मनमोकळं हसली.) व्यायाम आवडू लागला आणि मग त्याचं व्यसन बनलं. शिवाय बॉडी डेव्हलप होताना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया मानसिक बळ वाढवत होत्या. जिममधल्या सहकाऱ्यांचाही खूप मोलाचा वाट आहे. "तू कर! तू हे सहज करू शकशील." असा आत्मविश्वास त्यांनी दिला.
चटक-मटक खाण्यामुळे चयापचय संस्थेत बिघाड निर्माण होतो. आणि विशेषतः स्पर्धेची तयारी करत असतात त्या वेळचा व्यायाम आणि आहार यामुळे शरीरात जे बदल घडत असतात, त्यास अशा खाण्यामुळे अडथळा येतो आणि अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्या वेळेस अगदी थोडं जरी चटक-मटक खाल्लं तरी फरक पडतो. मग सगळीच मेहनत वाया जाते.

प्रश्नः आजही आपल्याकडे 'कमी कपड्यातील स्त्री'कडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे याची तुला जाणीव असेलच. पण तुझा खेळच शरीराचं 'सौष्ठव' दाखवण्याचा, त्याचा तुला संकोच वाटला होता का? स्वतःच्या संकोचावर कशी मात केलीस?

अश्विनी: पहिल्यांदा जेव्हा तसा पोषाख करून स्पर्धेला उतरणार होते, तेव्हा फारच संकोच वाटत होता. पण आजूबाजूला त्या पोषाखातल्या मुली पाहिल्यावर थोडी भीड चेपली. आणि तिथे जमलेल्या लोकांच्या नजरा मुळीच टोचत नव्हत्या. कारण खेळ म्हणून शरीराचं 'सौष्ठव' बघण्यातच रस होता आणि नजरेत कौतुक होतं, हे जेव्हा जाणवलं तेव्हा संकोच दूर होऊन आत्मविश्वास आला.

.

प्रश्नः शिवाय घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? त्यांचा विरोध झाला का?

अश्विनी: माझ्या पहिल्या स्पर्धेच्या फक्त १२ दिवस आधी स्पर्धेत उतरायचं असं ठरवलं. तेव्हा प्रथम वडिलांना फोन केला. त्यांना स्पर्धेविषयी सांगितलं आणि पोषाखाबाबत कल्पना दिली. त्यांनी सर्व म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि विचार करण्यासाठी दोन दिवस मागितले. मनात धाकधूक होती, कारण शाळेत असताना मी एक वनपीस आणला होता, तो त्यांनी घालू दिला नव्हता. पण दुसऱ्याच दिवशी त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की "तुझी इच्छा आहे ना, तर मग तू जरूर कर. तू एक खेळ खेळते आहेस, हे कुठलंही वाईट काम नाही. तू खूप मेहनत कर आणि जिद्दीने स्पर्धेत उतर. मला तुझा नेहमीच अभिमान वाटेल." वडिलांचा आणि माझ्या सर्व कुटुंबाचा भक्कम आधार आणि प्रोत्साहन यामुळेच मी इथवर मजल मारू शकले.

प्रश्नः तुला एक स्त्री म्हणून काही त्रासदायक अनुभव आले का? आंतरराष्ट्रीय स्पर्धेबाबत तुझा अनुभव कसा आहे?

अश्विनी: नाही, कधीच नाही. उलट नेहमी कौतुकाचा वर्षावच झाला. स्पर्धेला सोबत माझे वडील, मार्गदर्शक आणि स्पर्धेसाठी आलेले सहकारी असायचे, मी निर्धास्त होते.
मी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हा पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धा भारतात होत होत्या. त्यामुळे सर्वांना कौतुकमिश्रित कुतूहल फार होतं. आणि स्त्री स्पर्धक म्हणून मी त्या स्पर्धेत पहिल्यांदा भारतात प्रदर्शन करणार होते, याचा मला फार अभिमान वाटतो.

प्रश्नः या खेळात एकूण किती वर्षं कारकिर्द आहे?

अश्विनी: अमर्याद. मेहनत करण्याची तुमची तयारी आहे तिथपर्यंत! एर्नेस्टीन शेफर्ड या ८० वर्षे वयाच्या अमेरिकन महिला बॉडी बिल्डरने हे जगाला दाखवून दिलं आहे. आई झाल्यानंतरही अनेक जणी या क्षेत्रात कार्यरत आहेत.

प्रश्नः तुझ्यामुळे प्रेरित झालेल्या मुलींना तू मार्गदर्शन करतेस का? या क्षेत्रात कारकिर्द करायची असेल, तर कधीपासून सुरुवात करायला हवी?

अश्विनी: हो, अर्थातच! मला खूप समाधान मिळतं त्यात. मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात 'बॉडी बिल्डिंग'विषयी खूपच गैरसमज असतात, मी त्यांच्या मनात असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते.
खरं तर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर या क्षेत्रात येण्यासाठी कुठलीच वयोमर्यादा नाही. आधी उल्लेख केलेल्या एर्नेस्टीन शेफर्ड यांनी वयाच्या ५६व्या वर्षी आपली कारकिर्द सुरू केली होती. पण साधारण ८ वर्षानंतर या दृष्टीने व्यायाम सुरू करायला हरकत नाही.

प्रश्नः पुढे तुझ्या काय योजना आहेत? लग्नानंतर हे सुरू ठेवणार आहेस का?

अश्विनी: सध्या गुडघ्याला दुखापत झाली आहे, शिवाय प्रायोजक मिळत नसल्याने मी स्पर्धेमध्ये उतरत नाही आहे. पण त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत.
लग्नाचा विचार चालू आहे. लग्नानंतर नव्या दमाने मी यात उतरणार आहे.

प्रश्नः बॉडी बिल्डिंग हा खर्चीक खेळ आहे. तू तुझ्या खर्चाचा मेळ कसा घालतेस? स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रायोजक मिळणं खूप गरजेचं आहे का?

अश्विनी: स्पर्धेची तयारी ५ ते ६ महिने आधीपासून करावी लागते. त्यासाठी पूर्ण वेळ इथे द्यावा लागतो. त्यामुळे दुसरीकडे नोकरी करता येत नाही. शिवाय स्पर्धेसाठी आवश्यक असणारं नृत्य प्रशिक्षण घ्यावं लागतं.

माझा फक्त आहाराचा खर्च महिन्याला १५,००० ते २०,००० रुपये इतका आहे. स्पर्धेची तयारी करताना तोच खर्च दुप्पट होतो. शिवाय पोषाख वगैरे धरून प्रत्येक स्पर्धेचा खर्च लाखाच्या घरात जातो. माझ्या पहिल्या काही स्पर्धांसाठी माझ्या वडिलांना आईचे दागिने विकावे लागले होते. माझे वडील STमध्ये कंडक्टर होते. आम्हा तिन्ही भावंडांना त्यांनी मनाप्रमाणे शिकू दिलं. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत म्हणून आम्ही अ‍ॅक्वेरियम फिश टँकचा व्यवसाय पेणमध्ये सुरू केला आहे.

(याच प्रश्नावर तिच्या वडिलांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.)

तिला स्पर्धेसाठी प्रायोजक मिळत नाही, म्हणून ती स्पर्धेत उतरत नाही. पण पैशांची तरतूद करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. माझी मुलगी खूप मेहनती आहे. तिचे कष्ट वाया जाऊ नयेत असं वाटतं. हल्लीच्या काळात दहीहंडीलासुद्धा प्रायोजक मिळतात, पण गरजू गुणवंत खेळाडूंना मिळत नाहीत. मुबंईत आमचे कुणी नातेवाईक नसल्याने भाड्याच्या घरात राहून ती फिटनेस ट्रेनर म्हणून नोकरी करते. पण त्यातून तिचा स्पर्धेचा खर्च भागत नाही.

अश्विनीसारख्या गुणी खेळाडूच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि पुन्हा तिचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे, अशा शुभेच्छा देत मी तिचा निरोप घेतला.

सर्व फोटो आंतरजालावरून साभार.

. . .

.