*/
नमस्कार!
'गोष्ट तशी छोटी'चा आज समारोपाचा दिवस. विंगेत गलबलामध्ये लागलेला हा शेवटचा खेळ!
आजची मुलाखत ही अनेक गोष्टींसाठी खास आहे. हा उपक्रम करायचं ठरवलं, तेव्हा अगदी चित्रकथीसारख्या पारंपरिक सुरुवातीपासून ते वेबसिरीजसारख्या आधुनिक कथाकथनापर्यंत सगळं काही ह्यात यायला हवं, हा आम्हा दोघींचाही आग्रह होता. मराठीत वेबसिरीज म्हटलं की एकच नाव ठळकपणे समोर येतं.. 'भारतीय डिजिटल पार्टी!' आणि भाडिपा = कास्टींग काउच = अमेय आणि निपुण हेही पक्कं डोक्यात होतं. त्यात निपुणच्या नाटक कंपनीबद्दलही बरंच ऐकलेलं असल्याने त्याला मेसेज करून ठेवला. तो आमचा एखाद्या सेलेब्रेटीला केलेला पहिला मेसेज! आणि निपुणचं त्यावर आलेलं उत्तर ही विंगेत गलबलाची सुरुवात..
निपुणने नाटक कंपनीबद्दल बोलायला होकार दिलाच, त्याचबरोबर भाडिपाबद्दल बोलायचं असेल तर सारंगला भेटा हेही कळवलं. सारंग साठे.. नाव तर ओळखीचं होतं. पण कुठे पाहिलंय हे समजेना. गुगल करून पाहिलं, तर अरेच्चा!!! हा तर मार्को पोलो!!
ट्रिपलिंग ह्या गाजलेल्या वेबसिरिजमध्ये आलेल्या ह्या 'मार्को पोलो'ने तो एपिसोड गाजवला होता!! तो नेमका कसा, ह्यासाठी टिपलिंगचा चौथा भाग नक्की बघा. हा माणूस दिग्दर्शक आहे?? कास्टिंग काउचचा?? खरंच वाटेना.. मग माहिती काढायला लागल्यावर लक्षात आलं की हे प्रकरण दिसतं तितकं साधं नाही. वरकरणी अगदी साधा दिसणारा हा माणूस, खरं तर 'शांतीत क्रांती' आहे! तसा फारसा न बोलणारा, शाब्दिक फुलबाज्या न उडवणारा आणि मुलाखतीच्या शेवटी "माझी कुणी फार मुलाखत घेत नाही ना, म्हणून मी खूप बोललो!" असंही प्रांजळपणे सांगणारा हा एकदम सज्जन मनुष्य आहे. "मी काही विशेष केलेलं नाही हो.." म्हणत आपल्याला थक्क करणारा चतुरस्र कलावंत!
ही मुलाखत व्हिडिओवरच व्हायला पाहिजे हे तर नक्की झालं होतं. पण सारंग मुंबईमध्ये. पुण्यात असता तर दहा जण शोधले असते. नेमकं मुंबईत कुणी मिळेना. पण अचानक लक्षात आलं, मुलाखत घ्यायला समोर कुणी हवंच हा नियम कुठंय?! मारू या की व्हिडिओ गप्पा. त्यातूनच तयार झाली ही ८००० मैलांवरून झालेली स्काईप मुलाखत!
भौगोलिक सीमारेषा ओलांडून, आपल्याला जे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे ते मांडण्यासाठी आंतरजालाचा प्रभावी वापर करून घेणार्या सारंगची मुलाखतही अशी व्हावी, हा कोणता योग म्हणावा?!
ह्या गुणी आणि अत्यंत प्रांजळ माणसाची मुलाखत घ्यायला मिळणं हा ह्या उपक्रमातला सर्वात आनंददायी अनुभव होता. सारंगने ह्या मुलाखतीसाठी मिसळपावला वेळ दिला, ह्यासाठी त्याचे अनेक आभार!
(तळटीपः- मायबाप रसिक प्रेक्षकांनी व्हिडिओची क्वालिटी समजून घ्यावी. कितीही म्हटलं तरी मोबाइलचा फ्रंट कॅमेरा आहे. आणि डेटा प्लानवाल्यांसाठी कमी साइझमध्ये फाइल्स बसवल्या आहेत.)