*/
आपल्या पैकी बरेचजण एखाद आठवड्यासाठी का होईना थायलंड देशात नक्कीच येऊन गेला असाल. एक बजेट फॉरेन टूर म्हणून पूर्वेकडील या निसर्गरम्य छोट्याश्या देशाला थोडे थोडके नव्हे तब्बल ६० लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. पटायातला एक बीच आयलँड, एक कॅबरे शो, रेड लाइट एरियाची व्हिजिट, झालंच तर एक जंगल सफारी आणि बँकॉकच्या मॉल्समधे शॉपिंग, हि मुख्यत्वे भारतीय पर्यटन कंपन्यांची स्टॅंडर्ड आयटीनरी. दुर्दैवाने यामुळे बरेच भारतीय पर्यटक थायलंड हा एक मॉडर्न, जास्तच पुढारलेला आणि "सबकुछ चलता है" टाईपचा देश आहे अशी प्रतिमा घेऊन मायदेशी जातात.
पण तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर आश्चर्य वाटेल. ती म्हणजे थायलंड हा जगातील नंबर एकचा "धार्मिक" असलेला देश आहे. इथली जनता दिसायला मॉडर्न असली तरी इथला प्रत्येक व्यक्ती हा "पूजा-अर्चा, दानधर्म, वडील माणसांचा आदर" करणारा व प्रचंड देशाभिमानी असतो. इतर विकसित देशांप्रमाणेच दिसायला खूप मॉडर्न वाटणाऱ्या आणि बऱ्यापैकी व्यक्ती स्वातंत्र्य असणाऱ्या थाई देशात "धार्मिक चौकट" इतकी मजबूत कशी याचं माझ्यासारख्या या देशात कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या भारतीयास नेहमीच कुतूहल वाटत असे.
थाई संस्कृती, थाई मंडळींचा स्वभाव, आस्था, दैवी संकल्पना, त्यांच्या धार्मिक श्रद्धा/अंध श्रद्धा यांचा अभ्यास जस जसा वाढत गेला तस तसा काही गोष्टींचा उलगडा होत गेला. थाई जनमानसात धार्मिक भावना रुजवण्यासाठी बरेच कार्यक्रम धार्मिक संस्थांतर्फे आणि सरकार तर्फेही राबवले जातात. हि धार्मिक शिकवणूक तुम्हाला इथल्या पाठ्यपुस्तकांत सापडेल. आईवडीलांच्या संस्कारात सापडेल, स्वेच्छेने असलेलल्या तीन महिन्यांच्या बौद्ध धर्माचे दीक्षेत सापडेल कथा-कादंबऱ्यांत आणि इथल्या परंपरागत लोक नृत्यातही सापडेल. "लीके" हा त्यापैकीच एक.
गोष्ट तशी छोटीच्या निमित्ताने आज आपण थायलंडच्या "लीके" या नाट्य संगीत प्रकाराची माहिती घेणार आहोत.
लिके!
आपल्या भारत देशाला जसा संगीत, नाट्य, नृत्य आणि लोककलेचा वारसा लाभलेला आहे तसाच किंबहुना त्याच तोलामोलाचा वारसा आपल्या शेजारील “थायलंड” या देशाचा देखील आहे. या कलेचा उगम शोधायचा झाला तर आपल्याला पार पर्शिया (आताचा इराण) पासून सुरवात करावी लागेल. फारसी भाषेतील "सिकिर" किंवा अरेबिक भाषेत "सिकरु" अर्थात "मुस्लिम देवतेचे स्तवन" हे मूळ स्वरूप असलेला हा प्रकार व्हाया इंडोनिशिया आणि मलेशियामधून थायलंड देशात दाखल झाला. गाणी म्हणत, कथा सांगत, हावभावातून मनोरंजन करत धार्मिक संदेश देणे हा या कलेचा मूळ ढाचा आणि उद्देश.
इंडोनिशियामधे सादर होणारा लीके हा साधारण असा दिसतो.

या नाट्यसंगीताच्या कलेने खरं बाळसं धरलं ते इसवीसन १७६७ साली "चक्री" साम्राज्याच्या राजा "रामा-द्वितीय" यांच्या राजाश्रयाने. १८९० पर्यंत फक्त राज प्रासादामधे बंदिस्त असलेला आणि नंतर जनतेसाठी खुला झालेला मनोरंजनाचा हा प्रकार त्या काळी सामान्य जनतेनेही उचलून धरला. डिके, यिके आणि सरतेशेवटी "लिके" अशी फक्त नावांचीच कात न टाकता नाट्यसंगीतासाठी लागणारे नेपथ्य, पोशाख, कथा, वाद्ये यातही काळानुरूप बदल होत गेले. "रामा-पाचवे" यांच्या कालखंडात मूळ मुस्लिम पद्धतीने साकारली जाणारी ही कला पूर्णपणे थाई संस्कृतीला साजेशी बदलण्यात आली. सत्याचा विजय, दुष्टांचे निर्दालन, दुष्कर्माचे भोग हे दाखवत, सद्य परिस्थितीवर कोपरखळ्या मारत धार्मिक, सामाजिक संदेश देण्याचा मुख्य उद्देश मात्र तसाच ठेवण्यात आला. ग्रामीण भागांत कधी कधी बॅकग्राऊंडला केवळ साधा पडदा एवढंच नेपथ्य असलं तरी भरजरी पोशाख, नजरेत भरणारे दाग-दागिने, भडक मेकअप, आकर्षक मुखवटे हे "लिके" चे मुख्य आकर्षण. हे असे :



ऑफिसमध्ये एखादा स्टाफ झगमगीत कपडे घालून आला तर त्याला "लिके" असं उपहासाने देखील बोललं जातं.
भरजरी पोशाखांच्या कोंदणात बसवलेल्या "कथा" याही लिकेचं मुख्य आकर्षण. विविध दंत कथा, परिकथा, ऐतिहासिक गोष्टी, प्रेमाचा त्रिकोण, अगदी आपल्या रामायणातल्या गोष्टी देखील यात नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून सादर केल्या जातात. सर्वदूर लीकेचा एकूण फॉरमॅट सेम असला तरी विविध राज्यांत तो विविध कथा घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने सादर केला जातो. भरपूर भरणा असलेल्या कलाकारांमध्ये "फ्रा" म्हणजे नायक, नांग (नायिका), कोंग (खलनायक), इटचा (खलनायिका) आणि एक विदूषक हि मंडळी एकूण कथेतील मुख्य पात्रे. सादर करण्याच्या एकूण पद्धतीमुळे आपल्यासारख्या अनभिज्ञ मंडळींना हा एखादा "कॉमेडी शो" वाटू शकतो. (फक्त मिपाकर सोडून). आपल्या नाट्यसंगीताच्या कर्णमधुर संगीताची बरोबरी हा शो नक्कीच करू शकत नाही. शो बघताना बरेचदा कलाकारांमध्ये सिंकरोनाइज़ेशनचा अभाव यासारख्या गोष्टी या शोची मधुरता कमी करतात हेही तितकंच खरं.







आताच्या तरुण पिढीची बदलेली आवड, कमी होत चाललेला प्रेक्षक वर्ग, आटत चाललेली सरकारी मदत या सगळ्यांचा परिणाम या कलेवरही झालेला दिसतोय. मात्र शहरांतून हद्दपार होत चाललेली हि कला सेंट्रल थायलंडच्या २२ राज्यांत अजूनही तग धरून आहे. "लीके" कलाकारांना मिळणारं प्रसिद्धीचं वलय, ग्लॅमर आताशा कमी होत चाललेलं असलं तरी अजूनही काही लीके कलाकारांना सेलिब्रिटींचा दर्जा दिला जातो. शहरांमध्ये आता फक्त DVD च्या रूपात शिल्लक राहिलेली या कलेची भव्यता मात्र प्रत्यक्ष पाहण्यातच खरी मजा.


