" गोष्ट तशी.. " ची व्याप्ती इतकी प्रचंड होती की तिला मुपृमध्ये बसवताना धांदल उडणार हे सरळ होतं. अशा वेळी सरळ तज्ज्ञांकडे गोष्टी सोपवून आपण हरी - हरी करणे हा मार्ग स्वीकारणे इष्ट. त्यात ही तज्ज्ञ एस भाऊ आणि वेल्ला सारखे असतील तर जॅकपॉटच हो ! एस भाऊंनी लेख दिल्यावर आम्ही त्यांच्याकडे मुपृसाठी लकडा लावला. त्यांनी आधीच या उपक्रमाला " आपला" मानलेला असल्याने एक स्केच करून पाठवलं देखील. एक कॅलिडोस्कोप आणि त्यातून पलीकडचं बघणारा एक लहान मुलगा... "अहो प्रेक्षक सुद्धा महत्त्वाचा, गोष्ट आणि प्रेक्षक एकमेकांशिवाय अधुरे" म्हणत त्यांनी स्केच मध्ये बांधलेली "गोष्ट..." ची थीम उलगडायला सुरुवात केली आणि आम्ही दोघी थक्क झालो ! एक साधं स्केच ज्यात सुलेखन लाल हिरवा आणि निळा रंग घेऊन केलं होतं. या तीन रंगांतून पूर्ण स्पेक्ट्रम तयार होतो.. हेच ते तीन शिलेदार जे अख्खी रंगीबेरंगी दुनिया आपल्या शिरावर पेलतात. दृकश्राव्य माध्यमाचा प्रवास ही असाच ... तो लीलया त्यांनी त्या चित्रात पकडला. त्यांचं मोठेपण हे की ते एका कौटुंबिक परिस्थितीमध्ये व्यस्त असताना मिळेल तो वेळ या चित्राला देत होते. असे लोकं जेव्हा तुम्हाला येऊन सामील होतात तेव्हा प्रवास मुक्कामापेक्षा ही अधिक रंगतदार होतो.
तोपर्यंत मिपाची नवी थीम आली होती. पांढर्या रंगाचा अधिक वापर बघून एस भाऊंनी आम्हाला अजून एक मोलाची सूचना केली. या स्केचला रंगांमध्ये बसवा , नवीन थीम वर ते अधिक खुलेल. वेल्लाभटने ती जबाबदारी स्वीकारली आणि आज दिसणारं मुपृ साकार झालं. वेल्लाची विचारप्रक्रिया त्याच्याच शब्दांतः
"मुखपृष्ठ. एका इतक्या महत्त्वाच्या गोष्टीला आकार देताना चांगलंच दडपण आलं होतं. आकार नव्हे, मी केवळ रंग दिले. एका कॅलिडोस्कोप बघणार्या मुलाचं स्केच एस भाऊंनी अप्रतिम काढलं होतं. परंतु काही निमित्ताने त्यावर रंगांचा साज चढवण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. गोष्ट तशी छोटी च्या थीमशी सुयोग्य ताळमेळ साधणारं, चित्रपट-नाट्य विश्वाचा माहोल निर्माण करणारं, असं मुखपृष्ठ असावं हे मनात तेव्हाच पक्कं केलं. शाळेपासून चित्रकला म्हटलं की चित्र'काला'च केलेला आठवतो मला. तो पंथच नाही आपला. पण कॉम्प्युटर आल्यापासून तो पंथ नसल्याची खंत तितकी जाणवली नाही. फोटोशॉप, कोरल ड्रॉ इत्यादी सॉफ्टवेअर्सनी क्रांतीच केली म्हणायची. मला ही दोनही सॉफ्टवेअर बर्यापैकी वापरता येत असल्याने, मुखपृष्ठ बनवण्याचं काम आनंदाने हातात घेतलं.
तर एक अतिशय बोलकं, बरंच काही सांगून जाणारं, तरीही कॅलिडोस्कोपच्या स्लाइड्सप्रमाणे एक उत्सुकता कायम ठेवणारं एस भाऊंनी काढलेलं स्केच घेऊन विचाराला सुरुवात केली. रंगीबेरंगी विश्व म्हणजे रंग हवेत, चित्र, नाट्य म्हणजे त्या विश्वातल्या लाक्षणिक गोष्टी हव्यात जसं की कॅमेरा, नृत्य, संगीत म्हणता त्याला अनुसरून येणारी काही चित्र आकृत्या हव्यात अशी एक एक एन्ट्री करत गेलो. शेवटी वाणिज्य शाखेचा असल्याने एंट्रीवरच येतो मी, आणि ती करायला चुकत नाही. असो; तर या एक एक गोष्टी मूळ चित्रासोबत जोडत गेलो. कॅलिडोस्कोपच्या आतलं जे रंगीबेरंगी चित्र असतं, तसं काहीसं ते चित्र दिसायला लागलं. थोडे कलात्मक आकार, नक्षी त्यात जोडल्या. आता अपेक्षित प्रभाव येत होता. आता शीर्षकाची उणीव होती. एस भाऊंच्याच कल्पक डोक्यातून आलेलं लाल-हिरवा-निळा किंवा आर जी बी रंगात रंगलेलं शीर्षक, 'गोष्ट तशी छोटी' जेव्हा त्या पटावर आणलं, तेव्हा पूर्णपणा आल्याचं समाधान वाटलं. हे मुखपृष्ठ बनवताना मला एक मुख्य गोष्ट अभिप्रेत होती ती म्हणजे मनातले रंग. मग कॅलिडोस्कोप बघताना त्या मुलाच्या मनात उमटणार्या रंगछटा असतील, किंवा चित्रपट बघताना प्रेक्षकाच्या मनावर खुलणारे रंग असतील, किंवा 'गोष्ट तशी छोटी' चा आस्वाद घेऊ तेंव्हा तुमच्या आमच्या मनांत खुलणारे रंग असतील; मुखपृष्ठ बघितल्यावर त्या रंगछटा बघणार्यापर्यंत पोचायला हव्यात. हे लिहिताना कदाचित त्रोटक होतंय, पण मला आशा आहे की 'गोष्ट तशी छोटी' चं मुखपृष्ठ उर्वरित गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवेल."
एस भाऊ आणि वेल्ला दोघांनी क्रिएटिव टीमवर्क चा एक सुंदर वस्तुपाठ आमच्यासमोर ठेवला होता... दोघांची निष्ठा आणि १००% योगदान देण्याची कळकळ यातून बनलेलं हे मुखपृष्ठ ! गोष्टीचा चेहरामोहरा या दोन सच्च्या कलाकारांनी बनवला याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि यात आमचा गौरव देखील !!