*/
मिसळपाव यूट्यूब चॅनलवर ‘पर्दाफाश’ ही माझी चित्रफीत आहे. त्यासोबतची माझी ही वैयक्तिक अनुभवांची काही टिपणे आहेत.
इंग्लिश व्यावसायिक रंगभूमीवर स्टेजसमोरचा पडदा आजकाल क्वचितच उघडतो, पडतो. या विषयावर मिसळपावकरिता ‘पर्दाफाश’ चित्रफितीचा पहिला मसुदा पाठवला, तेव्हा संपादक स्रुजा व पिलीयन रायडर यांनी विचारले, की पडदा असल्या-नसल्यामुळे काय फरक पडतो, याबाबत माझे वैयक्तिक अनुभवही सांगावेत. पण माझ्या आठवणीत गेल्या कित्येक वर्षांत असा पारंपरिक पडदाच नाही, तर मी कुठले तुलनात्मक अनुभव सांगणार असा मला प्रश्न पडला. आणि योगायोग असा, की नुकताच ‘Les Liaisons Dangerous’ नाटकाचा प्रयोग बघायला मी बाल्टिमोरच्या सेंटरस्टेज प्रेक्षागृहात आलो, तर समोर बघतो काय.... लाल मखमली पडदा!
या थिएटरचा नकाशा चित्रफितीत मी दाखवलेला आहे. स्टेजच्या समोर येणार्या भागाला छेद देणारी रेषा मी चितारली होती, नेमका त्याच रेषेवर पडदा लावलेला होता.

पण हा पारंपरिक पडदा नसणार, याची नेपथ्यकाराने आधीच कल्पना देऊन ठेवली होती, कारण पडद्याच्या समोर जुन्या फ्रेंच पद्धतीच्या टेबलखुर्च्या आधीच मांडून ठेवल्या होत्या. पडदा उघडला, आणि आतल्या जुन्या फ्रेंच दिवाणखान्यात पात्रे आधीपासून गप्पा सुरू असल्यासारखा संवाद म्हणू लागली. बोलता-बोलता पात्रे सहजच ठेवलेल्या टेबल-खुर्च्यांवर येऊन बसून पत्ते खेळू लागली. इतके हे पडद्यासमोरचे साहित्य दिवाणखान्याच्या सेटमध्ये पुरते मिसळलेले होते.

नंतरच्या प्रवेशांमध्ये समोरच्या पडद्याचा काही काही कल्पक उपयोग केला गेला. कधी फक्त उजवीकडचा अर्धाच, कधी डावीकडचा अर्धाच पडदा पडे, आणि सेटमध्ये प्रेक्षकांच्या समक्ष काही थोडाफार बदल करून वेगळेच स्थान बनवून काही प्रवेश वठवले गेले.
या नाटकाचा अपवाद सोडला, तर माझ्या आठवणीत गेल्या पाचेक वर्षांत रंगपटासमोर नाटकाआधी पडदा पाडलेला नसतोच. पहिला अंक सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकांची घटनास्थळाशी चांगली ओळख व्हावी, म्हणून स्टेज आधीपासून उघडे असण्याची पद्धतच माझ्या बघण्यात आहे. उदाहरणार्थ, बाल्टिमोरमधील एव्हरीमॅन थिएटरच्या ‘August, Osage County’ नाटकाकरिता मी प्रेक्षागृहात आलो, तर खालच्या-वरच्या मजल्यांवर अनेक खोल्या असलेल्या घराचा सेट माझ्या डोळ्यांसमोर होता. तो सेट थिएटरच्या संकेतस्थळावर पात्रांनी भरलेला दाखवलेला आहे, तरीही वाचकांना कल्पना येईल की प्रेक्षागृहात मी पोहोचलो, तेव्हा रिकामा रंगमंच किती गुंतागुंतीचा आणि भरगच्च दिसला होता. नाटक सुरू होण्यापूर्वी मी आणि बाकीचे प्रेक्षक त्या घराची रचना, घरातील वस्तू अनायासे टिपून घेत होतो. अनायासे त्यावरून कथानकाचा काळ, तिथे राहाणार्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक ठेवण वगैरेंबाबत आडाखे बांधत होतो.

पडद्याला नेपथ्याची सीमा नव्हे, तर कथानकातच ठिकाण देणारा उपयोग मी एकदा बघितलेला आहे. उदाहरणार्थ, बाल्टिमोर येथील एव्हरीमॅन थिएटरने सादर केल्या ‘Under the Skin’ नाटकातील नेपथ्य घ्या. यात एक वयस्कर आजारी गृहस्थाला आता रक्ताच्या नातेवाइकाकडून दान केलेल्या मूत्रपिंडाची आवश्यकता आहे. आजवर एकमेकांपासून गुप्त ठेवलेल्या, दोन वेगवेगळ्या बायकांपासून झालेल्या, त्याच्या मुलीची आणि मुलाची हॉस्पिटलात एकमेकांशी ओळख होते. हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डातल्यासारखे एक बेड स्टेजवर आहे, आणि आजारी पात्र त्या बेडवर असते.

त्या बेडभोवती हॉस्पिटलमध्ये असतो तसा हिरवा पडदा ओढायची नेपथ्यात सोय आहे. जेव्हा केव्हा तो दोन बायकांचा दादला धडधाकट होता असा भूतकाळातला फ्लॅशबॅक होता, तेव्हा खाटेभोवती पडदा ओढून उरलेला रंगमंच त्या भूतकाळात जायचा.

हा एकाप्रकारे पडद्याचा म्हणावे तर पारंपरिक, तरीही अतिशय वेगळा उपयोग होता.
या टिपणांपैकी शेवटचे आधी उल्लेखलेल्या ‘Les Liaisons Dangerous’ नाटकाच्या शेवटाकडच्या एका प्रवेशाबद्दल आहे. प्रवेश एक तलवार-द्वंद्वयुद्धाचा होता. ज्या जड तुळईला/फ्रेमला समोरचा पडदा बांधला असल्यासारखे दिसत होते, ती तुळईच तारांनी तेव्हा खाली आणली गेली. आणि लढता-लढता योद्धे त्या तुळईवर चढलेसुद्धा!

अर्थातच नाटक संपताना पडदा खाली पाडला नाही. त्या उद्ध्वस्त भासणार्या सेटवर पुढच्या प्रवेशात स्त्री पात्रांनी त्यांचे संवाद म्हटले, आणि सर्व दिवे बंद करून नाटक संपल्याचा संकेत दिला गेला. म्हणजे जे नाटक सुरुवातीला पारंपरिक पडदा असल्यासारखे भासले, त्या नाटकातसुद्धा शेवटी पडदा पडलाच नाही. कथानक असे आहे, की एक उमराव आणि त्याच्या ओळखीची एक पुरंध्री कधी एकमेकांच्या संगनमताने, कधी एकमेकांना शह देत आजूबाजूच्या कुटुंबांना फूस लावतात, लफडी घडवतात आणि मोडवतात. त्यांनी आजूबाजूच्या लोकांचा कठपुतलीचा खेळ मांडलेला असतो - म्हणजे नाटकच. परंतु खेळाचा विचका होऊन त्यांच्या स्वतःच्या नाजूक भावना गुंत्यात आडकतात. त्यांचे पाताळयंत्र त्यांनाच भोवते, आणि तलवार युद्धात त्या उमरावाच्या जिवावर बेतते, तेव्हा पडदा लावलेली चौकट खाली पडते. हे असे जिवावर बेतले, की सगळी नाटके संपतात - पडदा लावलेली चौकटच खाली पाडून दिग्दर्शकाने नेपथ्य वापरून कथेला सांकेतिक जोड दिली.
अशा प्रकारे परंपरा आहे, म्हणून रंगपटावरून पडदा सरतो किंवा पडतो, हा उपचार दिग्दर्शकांनी पूर्णपणे त्यागलेला आहे. जर नाटकात पडदा वापरलाच, तर अर्थ देणारा नेपथ्याचा भाग म्हणून वापरतात असा माझा अनुभव आहे.
----
तळटीप : या लेखामध्ये वापरलेली नटांची/नाटकाची स्थिरचित्रे नाट्यकंपन्यांनी प्रेससाठी उपलब्ध करून दिली आहेत, म्हणून त्यांचा उपयोग या लेखाकरिता कायदेशीर आहे. नकाशाचे चित्र वर्णनात्मक खरडीमुळे योग्य वापराचे आहे.