*/
सिनेमा नावाचे हत्यार
A
आपली मांड पक्की बसवण्यासाठी अमेरिकेने आपल्या 'सॉफ्ट पॉवर'चा पुरेपूर वापर केला आहे. 'सॉफ्ट पॉवर' ही संकल्पना सर्वप्रथम जोसेफ नॉय या अमेरिकन अभ्यासकाने मांडली. कोणतीही आर्थिक आणि लष्करी ताकद न वापरता राजकारणातली उद्दिष्टे साध्य करण्याची एखाद्या देशाची क्षमता म्हणजे 'सॉफ्ट पॉवर. एखाद्या देशाची 'सॉफ्ट पॉवर' म्हणजे त्या देशाची सांस्कृतिक मूल्ये, त्या देशाची कला आणि संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि यासारखे अनेक घटक. आपल्या आजूबाजूच्या परिघाचे जाणीवपूर्वक निरीक्षण केले, तरी अमेरिकेचा या बाबतीतला वरचश्मा सहज लक्षात येईल. केएफसी, कोकाकोला-पेप्सी, मॅकडोनाल्ड यांच्याबरोबरीनेच हॉलीवूड हासुद्धा अनेक भारतीयांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेक अमेरिकन सिरियल्सना भारतात प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. त्यातूनच 'पृथ्वीवरचे नंदनवन ' अशी अमेरिकेची प्रतिमा बनली आहे. हॉलीवूडने कायमच आपल्या चित्रपटांतून आक्रमक उजव्या अमेरिकन राष्ट्रवादाचा प्रचार केला आहे. जगावर आलेले प्रत्येक संकट निवारण्याची जबाबदारी या जगाचा स्वघोषित नेता म्हणून आमचीच आहे, अशी भूमिका अमेरिकन चित्रपट मांडत आलेले आहेत. 'इंडिपेंडन्स डे'सारख्या चित्रपटात अमेरिका कशी इतर देशांची तोंडदेखली मदत घेऊन अतिशय शक्तिशाली परग्रहवासीयांचा पराभव करते, हे दाखवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय शांततेला धोका असणाऱ्या 'इस्लामिक' दहशतवाद्यांचा बीमोड धीरोदत्त अमेरिकन नायक एकटाकी कसा करतो, हे अनेक चित्रपटातून पाहता येते. हॉलीवूड चित्रपट अमेरिकन सरकारचे परराष्ट्र धोरण कसे पुढे रेटतात याचा ज्याला अभ्यास करायचा आहे, त्याने अमेरिकन चित्रपटातील खलनायकांचा अभ्यास करावा. ह्या खलनायकांच्या चरित्रनिर्मितीवर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा ठसा स्पष्ट उमटलेला दिसतो. ८०च्या दशकातला खलनायक हा क्रूर, आडदांड असा रशियन असायचा. शीतयुद्धकाळात रशियन लोकांची जी विशिष्ट नकारात्मक प्रतिमा अमेरिकन माध्यमांनी बनवली, त्यातून रशिया अजूनही पुरतेपणी सावरला नाही. १९९० सालानंतर अमेरिकन चित्रपटात खलनायक हा दाढीवाला आणि कट्टर इस्लामिक बनत गेला. ९/११च्या अमेरिकन भूमीवर झालेल्या हल्ल्यानंतर तर जवळपास प्रत्येक चित्रपटातला खलनायक हा आशियाई मुस्लीम दाखवण्याची चढाओढ अमेरिकन निर्मात्यांमध्ये सुरू झाली. गेल्या काही वर्षांत मात्र चिनी किंवा कोरियन खलनायक त्यांची जागा घेत आहेत. अमेरिकन संरक्षण विभाग 'पेंटागॉन'ची स्वतःच्या मालकीची चित्रपट निर्मिती संस्था आहे, यावरून काय अर्थ घ्यायचा तो समजून घ्यावा.
तर अशा या अमेरिकेला आणि हॉलीवूडला पहिल्यांदाच तोडीस तोड उत्तर देणारा प्रतिस्पर्धी तयार होत आहे, तो प्रतिस्पर्धी म्हणजे चीन. चिनी खाद्यसंस्कृती अगोदरच जगभरात लोकप्रिय झाली आहे. आता चिनी चित्रपटही अमेरिकन आणि युरोपियन मार्केटवर चढाई करण्यास सिद्ध झाले आहेत. सध्या चिनी चित्रपट अमेरिकेत भरपूर गल्ला गोळा करत आहेत. 'कुंग फू पांडा'सारखा अमेरिकन निर्मिती असणारा पण चिनी जीवनशैलीभोवती फिरणारा चित्रपट अमेरिकेत उत्पन्नाचे उच्चांक तोडतो, हे प्रतीकात्मक आहे. जॅकी चॅन, दिग्दर्शक आंग ली यासारखे चिनी वंशाचे बरेच दिग्गज अमेरिकेत चिनी संस्कृतीचा प्रसार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलत आहेत. ऑस्कर्स पुरस्कारांमध्येसुद्धा चिनी चित्रपट आपली उपस्थिती दाखवून देत आहेत. २००८च्या भव्यदिव्य ऑलिम्पिकपासून चीनने आपल्या 'सॉफ्ट पॉवर'च्या आक्रमक प्रचाराची मुहूर्तमेढ रोवली. तर 'सॉफ्ट पॉवर'च्या आक्रमक युद्धाची युद्धभूमी तयार झाली आहे. ही लढाई जो जिंकेल, त्याचे जगावर वर्चस्व राहील हे निश्चित.
अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर अतिशय मर्यादा असणारा चीन भारतासारख्या लोकशाही देशाच्या या बाबतीत अनेक योजने पुढे आहे, ही बाब वेदनादायक आहे. चित्रपट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर 'प्रपोगंडा'चे साधन होऊ शकते यावर आपल्या राज्यकर्त्यांनी आणि देशातल्या इतर लोकशाही संस्थांनी कधी विचारच केला नाही, ही बाब खेदजनक आहे. काहीही विशेष प्रयत्न न करता अनेक आशियाई आणि मध्यपूर्वेच्या देशात भारतीय चित्रपट लोकप्रिय आहेत. अनेक देशात भारतीय चित्रपट हीच आपली ओळख आणि 'सांस्कृतिक राजदूत' आहेत. भारत-चीन संबंध, भारत-पाकिस्तान संबंध आणि एकूणच भारत देशाची प्रतिमा यात सिनेमाने मोठी भूमिका बजावली आहे. पण तो एका स्वतंत्र आणि मोठ्या लेखाचा विषय आहे.
दोन देशांमधील संबंधांमध्येसुद्धा ही ‘सॉफ्ट पॉवर’ महत्त्वाची भूमिका बजावत असते. भारत-पाकिस्तान संबंधही त्याला अपवाद नाहीत. भारतीय चित्रपटांची पाकिस्तानमधली लोकप्रियता सर्वविदित आहे. इतकी की, बॉलीवूडपुढे लॉलीवूड (पाकिस्तानी चित्रपटसृष्टी) पूर्णपणे झाकोळून गेली आहे. सध्या पाकिस्तानी चित्रपटसृष्टी काही चांगले चित्रपट तयार करत असली, तरी तिची परिस्थिती चिंताजनक म्हणावी अशीच आहे. आपल्याकडे ‘खुदा के लिये’, ‘बोल’, ‘रामचंद पाकिस्तानी’ असे काही चांगले पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण, ज्याप्रमाणे आपल्याकडे पाकिस्तानी गायकांना आणि अभिनेत्यांना विरोध करणारे घटक आहेत, तसेच ते पाकिस्तानमध्येही आहेत. भारतीय चित्रपटांची लोकप्रियता त्यांना सहन होत नाही. नुकताच दिग्दर्शक कबीर खानला या उपद्रवी लोकांचा फटका बसला. एका कॉन्फरन्ससाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या कबीर खानला विमानतळावरच उग्र निदर्शनांचा सामना करावा लागला. कारण काय, तर ‘फॅण्टम’ हा त्याने दिग्दर्शित केलेला सिनेमा पाकिस्तानविरोधी होता. पाकिस्तानमध्ये ‘आर्मी’ ही ‘अल्ला’ किंवा ‘अमेरिका’ यांच्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे, हे एक उघड गुपित आहे. याच धर्तीवर पाकिस्तानी सैन्याचा ‘I S P R’ (Inter Services Public Relations) नावाचा एक विभाग कार्यरत आहे. आपण त्याला पाकिस्तानी सैन्याची मीडिया विंग म्हणू शकतो. तर हा विभाग पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये (ज्यात सिनेमाही आला) भारतविरोधी प्रचाराची राळ उडवण्यासाठी सढळ हातांनी खर्च करतो. ‘वार’ चित्रपट निर्मितीमागे त्यांचाच हात होता. त्याचबरोबर पाकिस्तानी सैन्याबद्दल कुठे काही वेडेवाकडे छापून किंवा पडद्यावर येत तर नाही ना, हेही हा विभाग तपासतो. पाकिस्तानमधला इंग्रजी मीडिया तसा बऱ्यापैकी स्वतंत्र बाण्याचा आहे. त्यामुळे आपला ‘बनियाविरोधी’ (भारताला पाकिस्तानी लष्करी अधिकारी ‘बनिया देश’ असे कुचेष्टेने म्हणतात.) अजेंडा पसरवण्यासाठी त्यांनी उर्दू माध्यमांना हाताशी धरले आहे.
उरी इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नटांवर आणि गायकांवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली चालू आहेत. पाकिस्तानी कलावंतांना देशातून हाकलून लावा अशी उच्चरवातली मागणी जोर धरत आहे. पण ह्या सगळ्यांमुळे पाकिस्तानप्रेरित दहशतवाद थांबणार आहे का? सगळीच युद्धे बंदुकीने लढता येत नाहीत. अमेरिका जगावर वर्चस्व राखून आहे ते मॅक डी, पेप्सी आणि मुख्य म्हणजे हॉलिवूड यांच्यामुळे. शीतयुद्धाच्या काळात रशियावर वर्चस्व मिळवण्यासाठी अमेरिकेने हॉलिवूडचा वापर कसा केला याचे किस्से रोचक आहेत. रशिया शस्त्रबळात कधीही कमी नव्हता. ते सॉफ्ट पॉवरच्या बाबतीत कमी पडले. आपला सॉफ्ट पॉवरच्या बाबतीत पाकिस्तानवर वरचश्मा आहे. आपल्या सीरियल्स, सिनेमे तिथे तुफान लोकप्रिय आहेत. सांस्कृतिक देवाणघेवाण बंद करून आपण आपले नुकसान करून घेत आहोत. आपण जिंकत आलेले सांस्कृतिक युद्ध मध्येच थांबवून आपलेच नुकसान करून घेत आहोत. कुस्ती जिंकत आलेल्या मल्लाने मध्येच रिंग सोडून जाण्यासारखा हा प्रकार आहे. जनतेने भावनिक होणे समजू शकतो. राज्यकर्त्यांनी भावनिक होऊ नये.
आपल्याकडे 'प्रपोगंडा' म्हणजे काही तरी वाईट गोष्ट अशी प्रतिमा जनमानसात विनाकारण आहे. यापूर्वीसुद्धा 'भांडवलशाही 'म्हणजे अतिशय वाईट गोष्ट असा एक देश म्हणून आपला समज होता. 'प्रपोगंडा' म्हणजे आंतरराष्ट्रीय संबधात उद्दिष्ट साध्य करून घेण्याचे एक साधन आहे, हे प्रथम अमेरिकेने आणि आता चीनने सिद्ध केले आहे. आपले याविषयीचे पूर्वग्रह बाजूला सारून आपण त्यासाठी एक देश म्हणून कधी वाटचाल सुरू करणार, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.