|| श्री गुरवे नम: ||
चला, शिकू या ओरिगामी – भाग ३ – कप, ट्रे, पेंग्विन
व्हिडिओ लेखमाला
चला, शिकू या ओरिगामी भाग १ - कागदपुराण, भाग २ - डोंगर-दरी, मूलभूत आकार
या मूलभूत घड्या आणि मूलभूत आकार वापरून पुढील भागांत काही सोप्या ओरि-कलाकृती बनवू या.
डिस्क्लेमर : या आणि यापुढील सर्व भागांमधल्या व्हिडिओंमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्व ओरि-कलाकृती अनेक शतकांपासून प्रचलित असलेल्या पारंपरिक (Traditional) कलाकृती असून त्यांचे अभिकल्पक (Designers) अज्ञात आहेत. या सर्व ओरि-कलाकृतींचे अभिकल्प (Design), त्या तयार करण्याचं आरेखन (Line Diagramming) आणि ते बनवण्याचे व्हिडिओ बनवून ते कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध करणं संपूर्ण जगभर पूर्णत: स्वामित्व हक्कविहीन (प्रताधिकारमुक्त) आहेत. ज्या कलाकृती तयार करण्याचे व्हिडिओ बनवून ते मिपावर वा महाजालावर वा अन्यत्र प्रकाशित केल्यामुळे कोणाचेही कसल्याही प्रकारचे स्वामित्व हक्क भंग होणार नाहीत, अशाच कलाकृती व्हिडिओ बनवण्यासाठी निवडल्या आहेत. अर्थातच, या लेखमालेसाठी मी बनवलेले सर्व व्हिडिओसुद्धा प्रताधिकारमुक्त आहेत. (माझेच व्हिडिओ अन्यत्र वापरून माझ्यावरच वाङमयचौर्याचा आरोप होऊ शकतो, म्हणून माझ्या बाजूने हे स्पष्टीकरण.)
या भागात अगदी सोप्या तीन कलाकृती करू या. तीन-चार घड्या घालून तयार होणार्या या कलाकृती आहेत.
कप आणि ट्रे तर कमीत कमी एकदा तरी उपयोगातही आणता येतील. ओरिगामीच्या या प्रकाराला ‘युटिलिटी ओरिगामी’ असं म्हणतात.
कप - फक्त दोन-तीन घड्या घालून हा कप तयार होतो. ड्युओ किंवा बायकलर कागद वापरूनही हा तयार करता येईल.
ट्रे - आयताकार कागद वापरून चौरसाकार ट्रे तयार होतो. मग चौरसाकार कागद वापरून आयताकार ट्रे तयार होईल... करून पाहा.
कबर्ड फोल्डपासून सुरुवात करून हा ट्रे तयार होतो.
पेंग्विन – मी काळ्या रंगाचा कामी वापरला आहे, पण तुम्ही कोणत्याही रंगाचा कागद वापरा. आपला पेंग्विन आपल्याला हव्या त्या कोणत्याही रंगाचा असू शकतो!
काइट बेसपासून सुरुवात करून हा सोपा पेंग्विन तयार होतो.
अगदी सोपी कला आहे की नाही ही? कोणालाही सहज जोपासता येईल अशी! ना वयाचं बंधन, ना शिक्षणाचं.. ही कला जन्मजात, उपजत असायची पूर्वअट नाही. कोणीही अगदी सहज शिकू शकेल, फक्त थोडी चिकाटी (Perseverance) हवी.
आता तुम्हाला आत्मविश्वास आला असेल, तीन-चार घड्यांपेक्षाही थोड्या जास्त घड्या घालून कलाकृती बनवायला तयार आणि उत्सुक असाल. मग पुढील भागात प्रिलिमिनरी आणि वॉटरबाँब या बेसपासून काही कलाकृती बनवू या.
आणि हो! हा व्हिडिओ बघून तुम्ही बनवलेले कप, ट्रे आणि पेंग्विन याचे फोटो प्रतिसादामध्ये जरूर दाखवा. (म्हणजे मी हे व्हिडिओज बरोबर तयार केले आहेत की नाही, ते मला कळेल.)
(क्रमश:)