दिवाळी अंक २०१६ - मागे वळून बघताना

नमस्कार!

दिवाळी अंक येऊन महिन्यापेक्षाही जास्त काळ लोटला. बर्‍या-वाईट प्रतिक्रियांचा धुरळाही आता खाली बसला आहे. 'माझा / आपला दिवाळी अंक' या अभिमानापासून सुरू झालेला प्रवास आता जवळजवळ 'एक दिवाळी अंक' या तटस्थतेपर्यंत येऊन पोहोचतो आहे. हीच वेळ आहे शांतपणे मागे वळून पाहायची, आढावा घ्यायची. जमलेल्या गोष्टींबाबत स्वतःची पाठ थोपटायची, चुकलेल्या गोष्टींतून धडा घ्यायची.

मी दिवाळी अंकाचा संपादक या नात्याने लिहीत असलो, तरी या प्रक्रियेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपापले अनुभव / सूचना या प्रतिसादांत नक्की लिहाव्यात. या निमित्ताने 'मिपाचा दिवाळी अंक कसा बनतो'" याचं डॉक्युमेंटेशन तयार होईल, आणि ते भविष्यातल्या संपादकांना उपयोगी पडेल.

----**----

ठरल्याप्रमाणे चांगल्या जमलेल्या गोष्टी (Planned and went well)
- प्रोजेक्ट मॅनेजमेंट
- मुद्रितशोधन (पूर्ण श्रेय नूलकरकाकांना! पण खाली 'सक्सेशन प्लॅनिंग' पाहा.)
- मुखपृष्ठ (अभ्या, आभार!)
- अंकपूर्व प्रसिद्धी (पुन्हा - अभ्या, आभार! त्या सीआयडीच्या चित्रामुळे हापिसात एक अनावस्था प्रसंग ओढवला होता. ते नंतर कधीतरी सांगेन.)
- सर्वांमधला समन्वय

न ठरवता चांगल्या जमलेल्या गोष्टी (Unplanned but went well)
- विशेषांकाच्या विषयाला आलेला प्रतिसाद
- मुलाखती
- पिरा यांनी केलेली मदत

ठरवूनही नीट न जमलेल्या गोष्टी (Planned but did not go well)
- नेहमी उत्तम लिहिणार्‍यांना दिवाळी अंकासाठी लिहायला उद्युक्त करणे (उदा० सूड, आत्मूगुरुजी)
- मिपाबाह्य प्रसिद्धी (ट्विटर आदी उपक्रमांमुळे हे आता सुधारेल.)
- चित्रं आणि सजावट (खाली 'सक्सेशन प्लॅनिंग' पहा.)

न ठरवल्यामुळे न जमलेल्या गोष्टी (Unplanned and did not go well)
- विशेषांकाच्या विषयाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणे (खाली 'संपादन' पाहा.)
- जुन्या मिपाकरांना दिवाळी अंकात लिहायला उद्युक्त करणे

----**----
काही विचार

१. उत्तराधिकारी नियोजन (सक्सेशन प्लॅनिंग)
दिवाळी अंकाच्या एकूण प्रक्रियेमध्ये 'विशिष्ट स्किल्स' असलेले तीन प्रकारचे लोक लागतात: (अ) मुद्रितशोधन (आ) चित्रं/सजावट (इ) तांत्रिक ज्ञान (द्रुपलचे वगैरे.) आपल्याकडे यासाठी अनुक्रमे नूलकरकाका, अभ्या आणि प्रशांत असे खंदे वीर आहेत. पैसाताईंसारखे लोक तिन्ही गोष्टी करू शकतात.

पण काही कारणाने हे वीर नेमक्या वेळेला व्यग्र/व्यस्त* असले, तर त्याचा अंक वेळेवर प्रकाशित होण्यावर परिणाम होऊ शकतो. उदा० नूलकरकाका अन्य अंकांचं मुद्रितशोधनही करतात, अभ्यासाठी व्यवसायाचा दिवाळीपूर्व हॉट पीरिएड आणि मिपा यात ब्यालन्स करणं अवघड होतं, प्रशांत व्यावसायिक आणि दिवाळीअंकेतर मिपाची कामं यात बिज्जी असतो, वगैरे.

तर हे टाळण्यासाठी या तिघांचं सक्सेशन प्लॅनिंग होणं जरूरी आहे. (ही बर्‍याच अंशी संपादक म्हणून माझी चूक आहे. हे मला आधी सुचायला हवं होतं. असो.) तर पुढच्या वेळी या तिघांनी स्वतःबरोबर आपला/ली सक्सेसर / डेप्युटी / साहाय्यक ही नियुक्त केल्यास बरं होईल.

२. संपादन
ऋषिकेशने मिपा दिवाळी अंकाच्या परीक्षणात यावर बोट ठेवलं आहे. हीदेखील स्वच्छपणे माझी चूक आहे. प्रोजेक्ट मॅनेजर होण्याच्या नादात मी संपादकाचे कपडे चढवण्याचं विसरलो. म्हणजे संपादकीय अधिकारात काही लेखनावर काट मारली (उदा० नॉर्वेवरचा लेख); पण ही कातरी आणखी चालवायला हवी होती.

यासाठी....

३. चमूमधले बदल
पुढच्या दिवाळी अंकांसाठी 'प्रोजेक्ट मॅनेजर' आणि 'संपादक' या भूमिका वेगळ्या कराव्यात असं सुचवतो. 'संपादक' ही एक व्यक्ती न असता टीमही असू शकते, पण कोणाला तरी त्यात 'शेवटचा शब्द' हवा (व्हेटोचा अधिकार.) अंकाच्या प्रसिद्धीसाठी कोणीतरी पाहिजे (शक्यतो पत्रकारितेत काम करणारं किंवा त्या जगाशी जवळून परिचित.)

_________
*मी नेहेमी यापैकी एक शब्द लिहितो आणि नूलकरकाका चूक सुधारतात. म्हणून आत्ता दोन्ही लिहीत आहे ;)