|| श्री गुरवे नम: ||
चला, शिकू या ओरिगामी – भाग १ – कागदपुराण
व्हिडिओ लेखमाला
तर मंडळी, खूप दिवसांपासूनची अनेक मिपाकरांची (आणि माझीही!) इच्छा पूर्ण करतोय. या डिसेंबर महिन्यात १८-२१ तारखेदरम्यान मुंबईत ओरिगामी प्रदर्शन आहे, त्यानिमित्त सोप्या ओरि-कलाकृती बनवायचे व्हिडिओ सादर करण्याचा हा प्रयत्न.... नेटप्याकवाल्यांची क्षमा मागून.
एकूण पाच (किंवा कदाचित सहा) व्हिडिओंच्या मालिकेतून ओरिगामीची तोंडओळख करून देण्याचा हा प्रयत्न सर्वांना नक्की आवडेल आणि ओरिगामी सहज शिकता येईल अशा प्रकारे ही व्हिडिओ लेखमाला बनवायचा प्रयत्न केला आहे. ओरिगामी ही अगदी सोपी कला आहे, हे या व्हिडिओ लेखमालेतून नक्की पटेल.
ओरिगामी म्हणजे कातरी आणि गोंद न वापरता, कागदाला फक्त घड्या घालून विविध वस्तू तयार करण्याची जपानी कला. कागदाचा जन्म चीनमध्ये झाला, त्यामुळे साहजिकच अगदी प्राथमिक स्तरावरची ओरिगामी चीनमध्ये जन्मली. मात्र कागद जपानमध्ये पोहोचल्यानंतर ही कला खर्या अर्थाने तिथे रुजली, वाढली, फोफावली आणि तिथून साधारणत: १९५०नंतर जगभर पसरली. जपानमध्येच या कलेला नाव मिळालं – ओरिगामी.. हा जपानी शब्द ‘ओरू’ + ‘कामी’ या शब्दांपासून तयार झालाय. ओरू म्हणजे घडी घालणं आणि कामी म्हणजे कागद. कागद हा या कलेचा कच्चा माल (Raw Material), म्हणून या पहिल्या भागात आपण कागदाच्या विविध प्रकारांची ओळख करून घेऊ.
ओरिगामीसाठी वापरल्या जाणार्या कागदाचे प्रकार -
कामी - एका बाजूने रंगीत, मागच्या बाजूला पांढरा.
ड्युओ - दोन्ही बाजूंना एकच रंग
बायकलर - दोन्ही बाजूंना दोन वेगळे रंग
नक्षीदार (डिझायनर) कागद
बनाना स्किन (हे नाव का पडलं? माहीत नाही.) कागद - पातळ आणि चिवट
हँडमेड कागद
सराव करायला पाठकोरा, वापरलेला कागद, जुन्या वहीचा वापरलेला कागदही चालतो. तर, प्रदर्शनात मांडण्यासाठी, दुसर्याला भेट देण्यासाठी ओरि-कलाकृती बनवायला चांगला कागद वापरावा. साधारणत: ७० ते ९० जी.एस.एम.चा कागद वापरा. मात्र ‘घोटीव’ कागद अजिबात वापरू नका, कारण त्याला घडी घातल्यावर त्याचे अक्षरशः तुकडे पडतात.
बहुतेक ओरि-कलाकृती मुख्यत: चौरस कागदापासून तयार करतात. आयताकृती, त्रिकोनी कागदापासूनही काही ओरि-कलाकृती बनवता येतात. हल्ली मोठ्या शहरांमध्ये स्टेशनरीच्या मोठ्या दुकानांत, मॉलमध्ये चौरसाकार ओरिगामी कागद (कामी – एका बाजूला रंगीत असलेले) मिळतात. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाजूने मुख्य पोस्ट ऑफिससमोरून बॅलार्ड पियरकडे जाणाऱ्या रस्त्याला काटकोनात बझारगेट स्ट्रीट (पेरिन नरिमन स्ट्रीट) आणि बोरा बझार स्ट्रीट या गल्ल्यांमध्ये, फिरोजशहा मेहता रस्त्याच्या गल्ल्यांमध्ये कागदाची अनेक दुकानं आहेत, तिथे बर्याच प्रकारचे कागद मिळतात. परदेशात तर कामीचे असंख्य प्रकार मिळतात.
इति कागदपुराणम संपूर्णम|
पुढच्या भागात ओरिगामीच्या मूलभूत घड्या (basic creases), खुणांची चित्रलिपी आणि मूलभूत आकार (base) शिकू या.
(क्रमशः)