नमस्कार सासंमं,
एबीपी माझा आयोजित ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल नुकताच लागला. यात तीन विजेते आणि पाच उत्तेजनार्थ अशी पारितोषिकं देण्यात आली आहेत. मिपातर्फे या विजेत्यांचं अभिनंदन करून सोबत त्यांना मिपाच्या व्यासपिठावर येण्याचं आमंत्रण द्यावं असा विचार मनात आहे. आपली सगळ्यांची, आणि अर्थात मिपासंचालकांची अनुमती असेल, हरकत नसेल तर त्यांना पाठवण्यासाठीचा संदेश खाली देत आहे. मिपाबाह्य उत्तम लेखनाचं मिपाकडून कौतुक व्हावं, आणि त्यानिमित्ताने मिपावर अजून दर्जेदार लेखकांची भर पडावी हा एकमेव उद्देश.
कृपया हा संदेश कुणीतरी नीलकांतपर्यंत पोचवून त्याची अनुमती घ्यावी ही विनंती आहे.
वेल्लाभट.
नमस्कार ..ब्लॉगरचं नाव..
एबीपी माझा आयोजित 'ब्लॉग माझा' या स्पर्धेत आपण उज्ज्वल यश संपादित केलंत. मराठी ब्लॉगविश्वात उत्तमोत्तम लेखन करून साहित्याची ई-कक्षा आपण रुंदावत आहात ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. याच ई-साहित्याच्या क्षितिजावर गेल्या दहा वर्षात आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं संस्थळ म्हणजे मिसळपाव.कॉम. मिसळपाव.कॉमच्या सर्व सदस्यांच्या वतीने आम्ही साहित्य संपादक मंडळ्, मिसळपाव, आपल्या ब्लॉगच्या यशाबद्दल आपलं कौतुक करतो, अभिनंदन करतो.
या निमित्ताने आम्ही आपल्याला आमच्या संस्थळाचे सदस्य होण्याचं, व आपलं दर्जेदार लेखन मिसळपावच्या व्यासपिठावर मांडण्याचं सस्नेह आमंत्रण करत आहोत. मराठी अभिव्यक्तीचा गौरव करण्याचा वसा घेतलेल्या आमच्या संस्थळावर आपल्यासारखे प्रतिभावंत लेखक आल्यास आमच्या संस्थळासाठी ती मोठ्या आनंदाची गोष्ट असेल. आमच्या आमंत्रणाचा आपण स्वीकार कराल अशी आशा करतो. सदस्यत्वासाठी http://www.misalpav.com/user/register या दुव्यावर क्लिक करा किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर ईमेल करा.
पुन्हा एकदा आपलं, आपल्या ब्लॉगचं मनापासून कौतुक. असंच उत्तमोत्तम लिखाण करत रहा!
साहित्य संपादक मंडळ,
मिसळपाव.कॉम