दिवाळी म्हटली की घरोघरी रांगोळ्या ह्या हव्यातच. स्वतःचे घर, वाडा बंगला वगैरे असलेले भाग्यवान आपल्या अंगणात रांगोळ्या काढतात तर चाळ वा सहनिवासात राहणारे वरांडा वा सामायिक जागेत रांगोळी काढतात. चकचकित संगमरवरी वा आधुनिक फरसबंद जमिनीवर गेरु सारवायचा उपदव्याप करण्यापेक्षा विटकरी रंगाच्या सिरॅमिक टाईल वर रांगोळी काढणे उत्तम. याचे दोन फायदे. एकतर गेरुकाम करावे लागत नाही आणि दुसरे महत्वाचे म्हणजे ज्यांना बराच वेळ जमिनीवर बसणे शक्य नाही त्यांना मस्त टाईल टेबलावर ठेवून समोर खुर्चीत बसून आरामात रांगोळी काढता येते.
पाडव्याची ओवाळणी झाली, जेवण झाले, आता मस्त ताणुन द्यावी असा विचार मनात आला मात्र, लग्गेच आदेश आला की आज नवी रांगोळी काढायची आहे सबब कसलीही सबब न सांगता ताबडतोब फरशीवरची काढलेली रांगोळी कागदावर जमा करुन व टाईल साफ करुन आत आणावी. आम्ही हुकुमाचे ताबेदार. गपचुप वर्तमानपत्राचा कागद घेतला. ( ते वर्तमानपत्र नवे नाही याची खातरजमा करुन घेतली - होतोय तेवढा उद्धार पुरेसा आहे). टाईल कागदावर अलगद तिरकी करताच रांगोळी व रंग घसरगुंडीसारखे हळुवार घसरत कागदावर जमा झाले. टाईलच्या रुंदीच्या आकाराचा तो रंगप्रवाह मला रंगीत आकाशगंगेसारखा भासला. टाईल उचलुन आणली आणि कागद उचलण्यापूर्वी एक प्रतिमा टिपली. रात्री अचानक डोक्यात किडा आला. मी तो फोटो बारकाईने पाहिला तर गुलमोहर अॅस्टर तेरडा गुलाब बोगनवेल अशा भरगच्च बहरलेल्या आणि दाटीवाटीने लावलेल्या ताटव्याचा खूप उंचावरुन फोटो काढलेला असावा असा वाटला. मी तात्काळ माझ्या हस्तसंचाच्या पटलावर तो भित्तीचित्र म्हणून उतरवला. बरा वाटला.
दुसर्या दिवशी मी हुकुम होताच मोठा पांढरा कागद एका मोठ्या वर्तमानपत्रावर अंथरला. टाइल अलगद कलती करत पांढर्या कागदावर रांगोळी घसरवली. आज योजुन रंग घसरवल्याने कलत्या टाईलची थोडी हालचाल करत रंगकण विस्ताराने पसरवले. एकाच वेळी परस्पर विरोधी रंग दिवाळीनिमित्त एकमेकात मिसळुन गेले होते. ते दृश्य मला बर्फात रुतलेली पानगळीचे रंग धारण केलेली झाडे आणि त्यात काही आपली हिरवाई टिकवुन असलेली झाडे असे काहीसे भासले. सगळा कल्पनेचा खेळ.
लाल मातीचा दूरवर पसरलेला चढ उताराचा आणि समुद्राच्या निळ्या पाण्यात, हिरव्या कांजळात उतरलेला डोंगर जर आकाशातून ऊंचावरुन टिपला तर असाच दिसेल
खवळलेल्या समुद्राशी झुंजणार्या आयवा मारुच्या डेकवरचा फ्लॅग पोल उचकटुन नेणारी लाट अशीच असावी
हा आकार नक्की कसला असावा? कुठल्याश्या किल्ल्यावरच्या एखाद्या देवळातला दगडात कोरलेल्या देवतेचा की बाहेरुन गर्द हिरव्या झाडीने झाकलेल्या पण आत लावा रस ठासुन भरलेल्या पर्वताच्या छेदासारखा?
ओहोटीवर माघार घेण्यापूर्वी आलेली एखादी लाट जाता जाता किनार्यावर हिरे, माणके, पाचू भिरकावुन गेली असावी