.inwrap {
border-style: solid transparent;
border-width: 40px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/v25latpucl7jnwEng0YhXPWvVS_mnnIoymOoQ…) 221 238 238 228 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/v25latpucl7jnwEng0YhXPWvVS_mnnIoymOoQ…) 221 238 238 228 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/v25latpucl7jnwEng0YhXPWvVS_mnnIoymOoQ…) 221 238 238 228 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/v25latpucl7jnwEng0YhXPWvVS_mnnIoymOoQ…) 221 238 238 228 repeat;
}
नमस्कार! सर्व मिपाकरांना, वाचकांना आणि हितचिंतकांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!
आपल्या मिपाचा पाचवा दिवाळी अंक आपल्या हाती देताना आज आम्हां सर्वांना अतिशय आनंद होत आहे. मिपाकरांच्याच डोक्यातून आलेला, मिपाकरांनीच लिहिलेला आणि मिपाकरांनीच सजवलेला असा हा दिवाळी अंक आहे.
मिपा आज मराठीतलं एक आघाडीचं संस्थळ आहे. विषयवैविध्य हे कायमच मिपाचं बलस्थान. गेल्या चार दिवाळी अंकांत त्याचं प्रतिबिंब उमटलेलं आहेच. यंदाच्या अनुक्रमणिकेकडे नजर टाकली तर मिपाने आपलं हे बलस्थान टिकवून ठेवल्याचं लक्षात येईल. ब्रह्मदेशातल्या दिवाळीपासून ऑस्ट्रेलियातल्या कांगारू बेटाच्या सफरीपर्यंत. पण हे इतक्यावरच संपत नाही.
मिपाच्या माध्यमातून नेहेमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आजवर केला आहे. छायाचित्र स्पर्धा, कथा स्पर्धा, भटकंती विशेषांक आदी अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. यंदाच्या दिवाळी अंकात 'रहस्यकथा विभाग' ठेवावा ही कल्पनाही 'काहीतरी वेगळं करू' याच प्रेरणेतून स्फुरली. रहस्यकथा हा प्रकार वाचायला जितका रसाळ, तितकाच लिहायला कठीण. रहस्याची बांधणी, त्यातली रोमहर्षकता, रहस्य उकलतानाचं चातुर्य या सर्व गोष्टी लिहायला कठीण, किचकट. रहस्यकथा लिहिणं ही जितकी कला (आर्ट) आहे, तितकीच, किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात ती कुसर (क्राफ्ट)देखील आहे.
पुन्हा रहस्यकथा या वाङ्मयप्रकाराचा आवाका प्रचंड मोठा असतो. गुप्तहेरकथांपासून ते पोलिसी चातुर्यकथांपर्यंत, आणि गूढकथांपासून विज्ञानकथांपर्यंत विविध प्रकार संभवतात. त्यातून दिवाळी अंकासारख्या माध्यमातून रहस्यकथा समोर आणताना काही मर्यादा आपसूकच पडतात. रक्तरंजित खूनसत्राच्या कथा दिवाळी अंकासारख्या व्यासपीठावर असणं योग्य नव्हे. बीभत्स रस, भयानक रस हे दिवाळीसारख्या सण साजरा करणार्या अंकात असू नयेत असा संकेत मिपाच्या दिवाळी अंकांनी कायमच पाळला आहे.
या सगळ्या मर्यादांचं भान ठेवूनच हा उपक्रम करायचं ठरवलं, आणि मिपाकर लेखकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. सुरुवात करताना 'पाच रहस्यकथा आल्या तरी बरं, सात आल्या तर डोक्यावरून पाणी...' वगैरे भाषा करणार्या आम्हाला, आलेल्या प्रतिसादाने अक्षरशः भुईसपाट केलं! तब्बल चौदा रहस्यकथा या अंकाची शोभा वाढवत आहेत. त्यात हेरकथा, पोलिसी चातुर्यकथा, गूढकथा याबरोबरच विनोदी रहस्यकथा आणि फॅन फिक्शन यासारखे तुलनेने अनवट प्रकारही हाताळले गेले आहेत. यासाठी मिपाकर लेखकांचे आभार मानावेत तितके कमीच आहेत.
याशिवाय विशेष उल्लेख करावासा वाटतो तो मुलाखतींचा. असा काही विभाग असावा असा कोणताही पूर्वनियोजित आडाखा नव्हता. तरी तीन मिपाकरांनी आपणहून मुलाखती घेतल्या. हा वेगळा विभाग सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. भविष्यात मुलाखतींना वाहिलेला वेगळा विशेषांक निघावा अशी इच्छा / आशा इथे व्यक्त करतो.
याबरोबरच मिपाकर लेखकांनी लिहिलेल्या कथा, कविता, पाककृती, प्रवासवर्णनं आणि लेख यांचाही आस्वाद या दिवाळी अंकात घेता येईल.
मिपाला यंदा दहा वर्षं पूर्ण होतील. दहा वर्षांत पुलाखालून किती पाणी (आणि कमानीखालून किती टेम्पो) गेले हे आपण सगळेच जाणतो. मिपाच्या या दशकपूर्ती वर्षात काही विशेष उपक्रम राबवून हे वर्ष संस्मरणीय व्हावं अशी इच्छा आहे. हे उपक्रम नेमके काय असावेत, त्याचं स्वरूप, व्याप्ती काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी एक वेगळा धागा संपादकीय विभागातच काढत आहोत. आपणांस विनंती करतो की आपल्या मनात असलेल्या कल्पना या धाग्यावर विस्ताराने लिहाव्यात. यातूनच भविष्यातल्या मिपाची पायाभरणी होईल. तसंच, दशकपूर्तीनिमित्त मिपाच्या माध्यमातून साकारणार्या शुभारंभाच्या एका दृक्-श्राव्य उपक्रमाची माहितीही स्वतंत्र धाग्यात आपणांस मिळेल.
...आणि शेवटी - ऋणनिर्देश.
सर्वात पहिलं, आणि सर्वात मोठं ऋण ते लेखकांचं. तब्बल पस्तीस लेखकांनी या अंकासाठी लेखन केलं. आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढून लेखन करणं आणि वेळेत ते आमच्यापर्यंत पोहोचवणं ही साधी कामगिरी नक्कीच नाही. आम्ही या लेखकमंडळींचे अत्यंत आभारी आहोत.
दिवाळी अंक आपल्या हाती देण्यासाठी मिपाकरांची एक आख्खी टीम गेले तीन महिने कार्यरत होती. संपादक, साहित्य संपादक, तंत्रज्ञ, रंगभूषा मंडळ, मुद्रितशोधक वगैरे लेबलं सोयीसाठी लावली खरी, पण 'आपल्या मिपाचा दिवाळी अंक झकास व्हावा' हीच अंतरीची तळमळ होती. 'गंगेत घोडं नहावं' असा पडेल दृष्टीकोन नव्हता, तर 'देऊ ते उत्तमच' असा चढेल बाणा होता. या सर्वांचे आभार मानणं म्हणजे स्वतःचीच पाठ थोपटून घेतल्यासारखं होईल, पण तरीही प्रत्येकाचा नावानिशी ऋणनिर्देश करणं ही जबाबदारीच. तर या दिवाळी अंक टीममध्ये खालील आयडींनी योगदान दिलं :
सुधांशुनूलकर, अभ्या.., पियुशा, पैसा, स्नेहांकिता, अजया, पिलियन रायडर, स्रुजा, प्रा. डॉ. दिलीप बिरूटे, नीलकांत, प्रशांत
आणि सर्वात महत्त्वाचं, वाचकहो, तुमचे अनेकानेक आभार.
| शुभ दीपावली |
---------
(रांगोळी: मिपाकर स्मिता चौगुले)