सर्व मिपाकरांना ही दिवाळी आनंदाची जावो!!

नागपूरवारीत हमखास आणली जाणारी मिठाई म्हणजे संत्रा बर्फी!! पण आम्हा कोकणातल्या मंडळींना नागपूर फारच लांब! त्यामुळे आता घरी केल्याशिवाय काही संत्रा बर्फी मिळणार नाही. या दिवाळीसाठी घेऊन आलेय खास मिपाकरांसाठी!!!!!
साहित्य :
तीन वाट्या कोहळा,
दोन वाट्या खवा,
तीन वाट्या साखर,
अर्धा टीस्पून ऑरेंज इमर्शन (कलर+इसेन्स),
दोन वाट्या संत्र्याचा रस,
संत्र्याची साल किसून दोन टेबलस्पून,
वेलची पावडर.

कृती :
कोहळा किसून घ्या. संत्र्याची साल किसताना त्याचा पांढरा भाग किसायचा नाही. फक्त वरची केशरी साल किसून घ्या. मला तीन मोठी संत्री लागली. संत्र्याचा रस काढून घ्या. आता सर्व साहित्य मोजून एकत्र करा. कोहळ्याचा कीस, संत्र्याच्या सालीचा कीस, संत्र्याचा रस, साखर, खवा,इमर्शन आणि चिमूटभर वेलची पावडर हे सर्व कढईत एकत्र करून मंद गॅसवर ठेवा. गोळा होऊ लागला की ताटाला तूप लावून थापा. तुम्हाला वडी, बर्फी जे हवे असेल त्याप्रमाणे कमी-जास्त आटवा.

आता तुम्ही म्हणाल, संत्रा बर्फीत कोहळा का? तर मी जी प्रसिद्ध बर्फी खाल्ली, त्यात घातलेले घटक बॉक्सवर वाचून त्यात कोहळा असतो असे मलातरी वाटले. आणि मी प्रयोग केला तर परफेक्ट चव आली. बघा तुम्हीही प्रयोग करून!!
