डॉ. वाटमारे आणि ढेरपोट गोम्स
नमस्कार मंडळी. मी डॉ. वाटमारे. गेली कित्येक वर्षं मी साबुदाण्याच्या गोळ्यांमध्ये काय मिक्स करतो ह्याचं रहस्य मलाच काय, पण स्वतःला फार मोठा रहस्यसंशोधक, सत्यान्वेषी समजणार्या माझ्या मित्राला - म्हणजेच ढेरपोट गोम्सलासुद्धा उलगडलेलं नाही. त्याचं आडनाव तसं गोमासे, परंतु तो स्वतःला शेरलॉक होम्सच्या व्यवसायातला समजतो, म्हणून त्याने गोमासेचं गोम्स असं करून घेतलं. माझ्या मते हा माणूस सत्यान्वेषी नाही, तर सत्यविध्वंसक आहे. या माणसाला एकच सत्य माहीत आहे - 'पैसा' आणि पैसा देणारा जे सांगेल तेच याचं सत्य. एवढे पैसा पैसा करूनही हा माणूस मात्र भिकारडाच आहे. सुटलेलं पोट, खाली काळी हाफ पँट, वर कळकट बनियान या अशाच अवतारात असतो. या अवतारामुळे याला काही अक्कल आहे अशी कुणाला साधी शंकासुद्धा येत नाही. त्याचमुळे याचं फावतं, बस. हा माणूस ज्या काही उचापती करतो, ते कागदावर उतरवायची कुरापत मी करतो. त्याचसाठी मला या माणसासोबत फिरावं लागतं. त्याच्यासोबत फिरल्यामुळे इथले लोक मला त्याचा साहाय्यक समजतात. उलट या ढेरपोट गोम्सचा सर्वात जास्त द्वेष करणारी कुणी व्यक्ती या जगात असेल तर ती मी आहे. जेव्हा कुणी या ढेरपोट गोम्सची चांगली जिरवतो, तेव्हा मला सर्वात जास्त आनंद होतो.
या ढेरपोट्याची जिरवणारी एक भेटली होती... हो 'भेटला होता' नाही, तर 'भेटली होती'. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी आणि ढेरपोट्या बकरी गल्लीतल्या त्याच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. ऑफिस कसलं, अंधारकोठडी. ना धड हवा येत होती तिथे, ना धड उजेड. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे जरा जास्तच उकडत होतं. कुणीतरी भेटायला येणार आहे असा फोन आला होता. आम्ही दोघेही त्याची वाट बघत होतो. एक गाडी आमच्या ऑफिससमोर येऊन उभी राहिली. अंगात शेरवानी, खाली जीन्स आणि पायात कोल्हापुरी असं एक ध्यान त्या गाडीतून उतरलं. त्या ध्यानाला मी तिथे असलेलं आवडलं नाही, परंतु गोम्सने "याच्याशिवाय माझं पान हलत नाही" (कारण शेवटी पानं मीच लिहितो ना!) असं सांगितल्याने त्याने मला तिथे राहू दिलं.
"नमस्कार. मीच मेसेज केला होता.”
"नमस्कार, तुम्ही कुण्या संस्थानाचे राजे वाटता.”
"अगदी बरोबर, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील भोरनळी संस्थानाचा मी राजा. तुम्ही कसं ओळखलं?”
"सोपं आहे. तुमचं फेसबुक अकाउंट चेक केलं. एकतर तुम्ही फालतू गणिताच्या पोस्टला लाइक करता, उत्तरं देता पण ती चुकीची देता. याचा अर्थ तुम्हाला काहीही अक्कल नाही. तुम्ही तुषारपासून टायगरपर्यंत सार्या स्टारपुत्रांना फॉलो करता, त्यांचे पिक्चर बघता, तारीफ करता.. म्हणजे तुमचा घराणेशाहीवर पक्का विश्वास आहे. काहीही अक्कल नाही आहे, पण बुडाखाली मात्र मोठी गाडी आहे, हातात आयफोन आहे. बापजाद्यांची इस्टेट असल्याशिवाय ते शक्यच नाही.”
"वॉ! हुश्शार आहात तुम्ही."
त्याच्या फेसबुक अकाउंटची सुरुवातच आहे 'राजे' अशी आणि फोटोसुद्धा राजासारखा. ते सोडून ढेरपोट मात्र कशाचा संबंध कशाशीही जोडतो. लोकांना त्यातच हुशारी वाटते.
"बोला, काय काम आहे?”
"माझं लग्न ठरलंय.”
"हूं... म्हणजे होणार्या राणीची चौकशी करायची आहे तर?”
"नाही. जुनी गोष्ट आहे. मी कॉलेजात होतो, तेव्हा आमच्या इथे एक तमाशाचा फड आला होता. इरावतीबाई आढले यांचा तमाशा. बाई खूप सुंदर होती, एकदम नूराणी चेहरा. गात तर काय होती, नाचणं विचारूच नका.”
"आलं लक्षात. तुम्हा श्रीमंतांच्या सवयीनुसार तुम्ही तिच्या नादाला लागला.”
"काहीसं तसंच झालं, भुरळच पडली होती. ती सांगेन ते करत गेलो.”
"मग पकडले गेलात?”
"छे.”
"कुठल्या हॉस्पिटलचं पेमेंट करावं लागलं, तेही क्रेडिट कार्ड वापरून...”
"नाही नाही. तशी पाळी नाही आली.”
"मिळून फोटो वगैरे?"
"तो असला तरी त्याला कोण विचारतो? मॉर्फ केला असं सांगता येतं.”
"फेसबुक लाइक, व्हॉट्स अॅप चॅट, घाणरडे जोक्स....”
"नाही, तेही नाही."
"मग केलं काय असं?”
"पत्र, पत्र लिहिलं मी तिला.”
ढेरपोटला तर हसायला संधीच मिळाली. तो जोरजोरात हसायला लागला. जसं पत्र हा शब्द त्याने याआधी कधी ऐकलाच नव्हता.
"पत्र लिहिलं या काळात. मोबाइल, लॅपटॉपच्या जमान्यात जिथे पेन आणि पेन्सिलमध्ये काय फरक आहे ते कळत नाही, त्या काळात तुम्ही पत्र लिहिलं. ही चूक नव्हे घोडचूक. It's blunder.”
समोरच्यावर आपला शेवटचा वार करायला ढेरपोट नेहमी इंग्लिशचा वापर करतो.
"काय होतं पत्रात?”
"गाणं. तिच्या तमाशासाठी मी एक गाणं लिहिलं होतं.”
"अर्रर्रर्र, पत्र लिहिलं तर लिहिलं, त्यात गाणं लिहिलं. नक्कीच टाइप केल नसणार. स्वतःच्याच दुर्वाच्य, दुर्गम, दुर्बोध अजून कसले कसले दु अशा अक्षरात लिहिलं असणार.”
"हो मीच लिहिलं. जगात माझं अक्षर समजणारे जे मोजके लोक आहेत, त्यातली ती एक.”
"शिट, शिट, लेखी पुरावा, अक्षम्य गुन्हा. याला माफी नाही.”
"ते गाणं आता तिच्याजवळ आहे. मला भीती वाटते ती ते गाणं माझ्या होणार्या सासरच्या लोकांना दाखवून आमच्या लग्नात अडथळा आणेल. माझं राजघराण्यात लग्न ठरतंय.”
"तुम्ही पैसे फेकले असणार, पण तिने ऐकलं नाही, चोर पाठवले, त्यांना काही सापडलं नाही. धमकी दिली, तर तिनेच तुम्हाला धमकावलं. बरोबर?”
"अगदी बरोबर. तुम्ही खरच खूप हुशार आहात.”
"अस काही झालं नसतं, तर तुम्ही माझ्याकडे कशाला आला असता?"
"तुम्ही हुशार आहात, महान आहात, तुमची कीर्ती सर्वत्र आहे. मी संकटात आहे. मला मदत करा. मला आता त्या गाण्याची ओरिजिनल कॉपी हवी. काय करून बसलो मी.”
"एवढं काय घाबरायचं? गाणं लिहिलं म्हणून वॉरंट निघत नाही.”
"डॉक्टर, डॉक्टर, ते क्लायंट आहेत आपले. त्यांचं दुःख समजून घ्या, अडचणीत सापडलेत ते बिचारे. तुमची अडचण आम्ही अवश्य दूर करू, फक्त तुम्ही आमची अडचण समजून घ्या.”
"त्याची काळजी करू नका. हे घ्या पन्नास हजार."
"मी मानधन घेत नाही, फक्त समाजसेवा करतो. समाजसेवेचीसुद्ध किंमत असते. खातरी बाळगा, तुमचं काम नक्की होईल.”
तो निघून गेला. कसले राजे आणि कसलं राजघराणं, या लोकांची काय ती केस? मला तर असल्या फालतू केसमध्ये अजिबात रस नव्हता. पैसा मिळत असेल तिथे अर्थपूर्ण समाजसेवा करायचा या सत्यविध्वंसक ढेरपोटला भारी सोस आहे. मला "सकाळी सात वाजता ये" म्हणून सांगितलं. मी स्पष्ट नकार दिला. होमिओपॅथीचा असलो, तरी माझ्याकडे येणारी गिर्हाइकं काही कमी नाहीत. याच्यासारखे दोन दोन महिने बिड्या फुकत बसावं लागत नाही. आता तर उन्हाळा, लग्नाचा सीझन. फुकट मिळतं म्हणून लोक नको तिथे नको तेवढं खातात आणि मग डॉक्टरचं बिल भरतात. धंद्याचा टाइम, खोटी करून उगाचच त्या बाईच्या मागे या ढेरपोट्यासोबत फिरण्याचा मला अजिबात उत्साह नव्हता. मी माझा दवाखाना आटोपून चार वाजता बकरी गल्लीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. बुवा अजून यायचे होते. दोन-अडीच तास त्या अंधारकोठडीत काढल्यावर बुवा आले, आख्खी जीन्स आणि आख्खा टी शर्ट अंगावर चढवला होता. अशा कपड्यात बघायची मला सवय नव्हती. मी डोळे फाडून खालपासून वरपर्यंत बघत होतो.
"घाबरू नको डॉक्टर, घाबरू नको, आलोच बदलून.”
थोड्याच वेळात ढेरपोट त्याच्या नेहमीच्या अवतारात आला, हाफपँट, कळकट बनियान आणि हातात बिडी.
"किती उशीर? मी चार वाजल्यापासून येऊन बसलोय. कुठे गेला होता? अशी जीन्स-टी शर्ट घालून का फिरत होता?”
"कुठे गेलो असेल याचा अंदाज तुला आला असेलच."
"दुसरं काय, तू बाईच्या मागावर गेला असणार.”
"अगदी बरोबर. पण मी तिथे जे काही बघितलं, तिथे जे काही घडलं, ते मात्र चक्रावून सोडणारं होतं.”
"असं काय आभाळ फुटलं तिथे?”
"ऐक. मी त्या बाईंचा तमाशा ग्रूप ज्या लॉजवर उतरलाय, तिथे गेलो. त्या लॉजसमोरच्या पानटपरीवर उभा राहून कॉलेजात जाणार्या मुलांसारखा सिगरेट ओढत होतो. पाच रुपयाला एक सिगरेट मिळते. त्या पाच रुपयांत मी इरावतीबाईबद्दल इत्यंभूत माहिती मिळवली. हेच नाही, तर ग्रूपमधल्या इतर मुलींचीपण माहिती मिळवली.”
"यात काय असं चक्रावून सोडण्यासारखं?”
"सांगतो. Have patience. मला कळलं, बाईंचं बस्तान खालच्याच मजल्यावर आहे. मी लॉजमध्ये आत शिरलो. लपत छपत. कुणालाही दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत होतो. मला स्पष्ट दिसत होतं. बाईंनी चार खोल्यांची एक खोली केली होती. तिथेच आपला दरबार थाटला होता.”
"बरं, मग?"
"तेवढ्यात बाईंना कुणीतरी भेटायला आला. मी लॉजच्या बाहेर आलो, परंतु खिडकीतून सारं बघत होतो. मी नजर हटवली नाही. अं हं. तो मनुष्य रिसेप्शनला काहीही न विचारता सरळ बाईंच्या खोलीत गेला. म्हणजे नेहमीच येणारा असला पाहिजे.”
"कशावरून? सार्यांनी तुझ्यासारखं लपून छपूनच जायला पाहिजे काय?”
"मला प्रश्न पडला होता - हा मनुष्य बाईंचा वकील आहे की सीए? त्या मनुष्याला बघताच बाई बाहेर आल्या. डोक्याला टॉवेल बांधला होता, तेव्हा नुकतीच आंघोळ झाली असणार. ”
"हे कोणीही सांगेल.”
"माझी नजर बाईंवर पडली. मी बाईंना प्रथमच बघत होतो. वा! काय रूप होतं! सुंदर, अतिसुंदर. असं रूप बघून कुणीही पाघळेल. पण मी हा गोम्स असा पाघळणार्यातला नाही. मी मनावर कंट्रोल केला. फक्त खिडकीवर फोकस केला. तो मनुष्य सोफ्यावर जाऊन बसला, बाई त्याच्या बाजूला जाऊन बसल्या. बाईंनी डोक्यावरच्या टॉवेलने केस पुसायला सुरुवात केली. तो मनुष्य बाईंच्या खांद्यावर हात ठेवून होता. दोघे गुलुगुलु गोष्टी करीत होते. ते नक्कीच आपल्या अशीलाविषयी बोलत असणार. मग तो मनुष्य बाहेर आला, त्याने रिक्षा पकडली, रिक्षावाल्याला दहा रुपये आगाऊ देऊन लवकर निघायला सांगितलं. त्यापाठोपाठ बाई आल्या, बाई लाल रंगाची साडी नेसल्या होत्या. रिक्षावाला फुकट न्यायला तयार झाला. मीपण रिक्षा पकडली. त्या दोन रिक्षांच्या मागे जायला सांगितलं. त्याने मीटरच्या दुप्पट भाडं सांगितलं. रिक्षा जात होती शहरातल्या रस्त्यातून, गल्लीतून आणि अचानक एका पाठोपाठ एक असे सार्या रिक्षांना ब्रेक लागले. ते विवाह नोंदणीचं कार्यालय होतं. संध्याकाळचे पाच वाजायला दहा मिनिटं उरली होती. मी त्या कार्यालयाच्या दिशेने जात होतो, मला आता तो मघाचा मनुष्य आणि बाई दिसत होते. मी दरवाजाजवळ पोहोचलो, तर तिथला चपराशी माझ्यावर खेकसला, "आजका कोटा खतम, अब कल आना." मी वळलो, तितक्यात एक हात माझ्या खांद्यावर पडला. मी मागे वळून बघितलं, तर तो मघाचा मनुष्य होता. त्याने शांतपणे माझ्या टी शर्टचं पेन काढलं, एका कागदावर चालवून बघितलं. मला थँक्यू म्हणून तो निघून गेला. मी ऑफिसमध्ये बघितलं, तर तो क्लार्क मोडकं पेन हातात घेऊन त्या रजिस्टरवर सही करायची वाट बघत होता.”
"अच्छा, त्या तनू वेड्स मनूसारखं?”
"येक्झाटली. घड्याळात पाच वाजायला अजूनही तीन मिनिटं बाकी होती. सही करायला तितकी पुरेशी होती. मी नंतर कुठेही न बघता थेट घरी आलो. आता सांग, या सार्यातून तू काय निष्कर्ष काढला?”
"यात काय अस निष्कर्ष काढण्यासारखं?”
"हाच तर फरक आहे तुझ्यात नि माझ्यात. अरे, याचा अर्थ हा की तो मनुष्य बाईंचा ना वकील होता, ना सीए होता, तर तो बाईंचा प्रियकर होता आणि आता नवरा झाला.”
"हे तुला आता समजलं....”
"मी खातरीने सांगतो. तो कागद त्या बाईंजवळच आहे. कुठलीही हुशार स्त्री महत्त्वाचा कागद वकिलाला किंवा सीएला देऊ शकते, परंतु नवर्याला किंवा प्रियकराला कधीच नाही.”
"हे मात्र मान्य करावंच लागेल. मग तू आता तो कागद कसा शोधणार?”
"मी शोधणार नाही, बाई मला तो कागद दाखवतील.”
"वाट बघ.”
"माझा प्लॅन तर ऐक.”
असं म्हणून त्याने मला त्याचा संपूर्ण प्लॅन ऐकवला. अगदी फडतूस प्लॅन होता. उगाचच मार खाण्याचे धंदे, या पलीकडे त्या प्लॅनमधून फारसं निष्पन्न होणार नाही, याची मला खातरी होती. पाचशे पानाचं दा विंची कोड वाचलं, म्हणून आपण जगातला कुठलाही कोड क्रॅक करू शकतो असंच याला वाटतं.
दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी नऊ वाजता मी लॉजजवळ पोहोचलो. संपूर्ण प्लॅनमध्ये ढेरपोटला भरपूर मार खायचा असल्याने मला उत्साह होता. काही टारगट पोरं जीन्स-टी शर्ट घालून, पानटपरीवर उभे राहून खोलीतल्या पोरींशी दृकसंवाद साधत होते. बाई बाहेर आल्या, रिक्षा बाहेर उभीच होती. बाई रिक्षात बसल्या, तशी समोरून दोन पोरं बाइकवर आली, रिक्षातून बाईंची पर्स उचलून वेगात पळाली. रिक्षावाल्याने मग जोरात रिक्षा वळवली. रिक्षा आता वेगात त्यांचा पाठलाग करणार, तसा कुणीतरी रिक्षाला आडवा आला. रिक्षावाल्याने कचकन ब्रेक मारला, तरीही ती व्यक्ती "अगं आई गं, मेलो" असं ओरडली.
"अंधा है क्या? एवढी मोठी रिक्षा दिसत नाही का?” असं म्हणत त्या रिक्षावाल्याने त्या झोपलेल्या माणसाच्या कंबरड्यात एक लाथ हाणली.
"काय झालं, कोण आहे?” बाई आता बाहेर आल्या होत्या.
"कोणी हमाल दिसतो.”
"नाही, हा चांगला ढेरपोट्या दिसतो.”
"मिठाईच्या दुकानात असेल.”
तितक्यात मघाची मुलं हातात पर्स घेऊन परत आली, ठरल्याप्रमाणे मीसुद्धा त्यांच्यात सामील झालो.
"रिक्षावाल्याने ठोकला बघा गरिबाला.” मी आग लावली.
"ए, रिक्षा चालवतो का फेरारी? मारला ना त्याला? चल आता पोलिसात.”
"मला नका बोलू. बाईंनी मला वेगात घ्यायला सांगितलं."
"ओ बाई, तुमच्या पर्ससाठी गरिबाचा जीव घेता का?”
खाली चाललेला आवाज गोंधळ ऐकून सारं सृष्टिसौंदर्य लॉजच्या प्रत्येक खिडकीत जमा झालं होतं. ते बघताच टारगट पोरांना आणखीन चेव आला. प्रत्येक वाक्याला वर बघत होते.
"मेला का?”
"अजून नाही, पण त्याच मार्गावर आहे.”
"त्याला दवाखान्यात न्या आता."
"अॅम्ब्युलन्स बोलवा.”
"तिथपर्यंत टिकणार नाही. काहीतरी प्रथमोपचार केले पाहिजेत.” मी आणखी आग लावली.
"ए, तुझ्याकडे First Aid Kit आहे का?”
"नाही.”
"लॉजमध्ये असेल ना. हलवा याला लॉजमध्ये.”
"सरळ बाईंच्या खोलीतच हलवा. थोडी एसीची हवा खाऊ द्या, बरं वाटेल त्याला.”
"नाही नाही, माझ्या रूममध्ये कशाला? ओळख ना पाळख...”
"ओ बाई, दहा मिनिटं तुमच्या सोफ्यावर पडल्याने सोफा झिजनार आहे का? एसी गरम हवा फेकनार आहे? मेला तर पोलीस केस होईल.”
बाई काही म्हणायच्या आत आम्ही सार्यांनी उचलून त्याला लॉजमध्ये नेलं. बाईंच्या सोफ्यावर नेऊन झोपवलं. काय झालं म्हणून बघायला सारं सृष्टिसौंदर्य आता खाली जमा झालं होतं. मी लॉजमधलं First Aid Kit घेऊन मलमपट्टी केली. एसी लावायला सांगितला. त्याला काही काळ आराम करू द्या असं बजावलं. बाई आत गेल्या. सृष्टिसौंदर्य तिथेच घुटमळत होतं, म्हणून टारगट पोरंही रिसेप्शनजवळच उभी होती. थोडी गर्दीच झाली होती. मीही गर्दीत सामील झालो. ठरल्याप्रमाणे ढेरपोटला इशारा करून मी फायर अलार्मचं बटणं दाबलं. हल्ली हे बरं असतं. आग लागली असं सांगायला नुसतं फायर अलार्मचं बटण दाबायचं असतं. "आग, आग" असं ओरडत मी, सृष्टिसौदर्य, टारगट पोरं, लॉजचे कर्मचारी सारे लॉजच्या बाहेर आलो. काही वेळाने आमचा ढेरपोट्यासुद्धा बाहेर आला. आम्ही दोघेही चालतच बकरी गल्लीपर्यंत आलो. ढेरपोट्या खुशीत होता.
"डॉक्टर, काम फत्ते.”
"मिळालं पत्र?”
"नाही, पण पत्र कुठे आहे याचा सुगावा लागला.”
“कुठे आहे पत्र?”
"सोफ्यात.”
"सोफ्यात, कशावरून?”
"कुठल्याही संकटात मनुष्य आधी त्याची मूल्यवान वस्तू जपून ठेवतो. बरोबर?"
“बरोबर."
"उदाहरण द्यायचं झालं, तर कुठलाही पुरुष आग लागल्यावर काय शोधेल?”
"वॉलेट नाहीतर एटीएम कार्ड.”
"करेक्ट, आणि स्त्री?"
"मोबाइल किंवा पर्स."
"येक्झाटली. फायर अलार्म वाजला, आग आग करीत तुम्ही सारे बाहेर पळाला. बाईसुद्धा धावतच बाहेर आल्या. गुलाबी गाउनमध्ये. वा, काय रूप होतं. हॉलमध्ये येऊन बाईंनी ना मोबाइल शोधला, ना पर्स. बाई सरळ माझ्याजवळ सोफ्याकडे आल्या. मला तिथे बघताच बाहेर गेल्या. बाहेर पडेपर्यंत त्यांची नजर सोफ्यावरच होती. आग लागल्यावर गाउनमध्ये बाहेर येऊन माझ्याजवळ उभं राहावं इतका मी मूल्यवान नक्कीच नाही.”
"यात काही वाद नाही.”
"याचा अर्थ एकच - मोबाइल किंवा पर्सपेक्षाही मूल्यवान असं काहीतरी बाई शोधत होत्या. जे सोफ्यात होतं. ती मूल्यवान वस्तू म्हणजे ते पत्र.”
"काहीपण! मोबाइल फोन सोफ्यावर नसेल कशावरून? तुझ्या या ढेरीच्या खाली मोबाइल आला तर तुला कळेल तरी काय? त्याचा रिंगटोनसुद्धा व्हायब्रेटर मोडमध्ये असल्यासारखा वाजेल."
"No Doctor, She was looking for that letter only."
तितक्यात एका रिक्षातून एक टारगट पोरगा 'ए ढेरपोट्या' असा आवाज देऊन निघून गेला. आम्ही दोघेही त्या रिक्षाच्या धुरळ्याकडे बघत तिथेच उभे होतो.
दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत मी बकरी गल्लीतल्या ऑफिसमध्ये पोहोचलो. माझ्या मागेच तो भोरनळीच्या संस्थानवालासुद्धा आला. आल्या आल्या त्याने ढेरपोटला विचारलं,
"ते पत्र बघायला मी उतावीळ झालोय मि. गोम्स.”
"जरा धीर धरा, तुमच्या सुखाची किल्ली थोड्याच वेळात तुमच्या हातात असेल.”
"सरळ सांग ना. पत्र मिळालं नाही, फक्त कुठे आहे याचा पत्ता लागला.”
"मग चला, उशीर कशाला?”
"आसपास टॅक्सी दिसत नाही.” ढेरपोट मोबाइलमध्ये गढून सांगत होता. जसा काही खरंच टॅक्सी शोधत होता.
"टॅक्सी कशाला? माझी गाडी आहे.”
आम्ही सारे संस्थानाच्या गाडीत बसून लॉजवर आलो. लॉजवर पोहोचताच ढेरपोटने रिसेप्शनला स्वतःची ओळख दिली.
"मी गोम्स, मी मघाशी फोन केला होता.”
"ए, फोन आला होता कारे कुणाचा?”
“नाही.”
“कोणचाच फोन नाही आला.”
"मीच फोन केला होता. मला त्या इरावतीबाईंना भेटायचं होतं.”
"त्या बाई लॉज सोडून गेल्या.”
"अशा कशा जाऊ शकतात?”
"गाडीने गेल्या, पस्तीस सीटर बस होती."
"नक्की गेल्या?”
"बघा तिकडे. सारं सामान विस्कटून गेल्या. तीन महीण्यांची सोय केली होती, महीण्याभरातच पळाल्या.”
ढेरपोट हे ऐकायला थांबलाच नाही. तो थेट बाईंच्या खोलीतील सोफ्याजवळ गेला. त्याने सोफ्यात इकडे तिकडे शोध घेतला, त्याला त्यात एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी मग मी मोठ्याने वाचली.
"ए ढेरपोट्या, स्वतःला जास्त हुशार समजतो का रे? अरे, आम्ही कलाकार माणसं आपली कला दाखवतो. हा तुझा अशील आम्हाला काय समजतो? माझ्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाला होता. हा कसला राजा? कंगाल आहे. स्वतःची कंगाली दूर करायला दूरच्या संस्थानातल्या साठीतल्या म्हातारीशी लग्न लावतोय. त्याला पैसाही हवा आहे आणि .... जाऊ दे. तो खुळा नाही ढेरपोट्या, तू खुळा आहेस. विवाह नोंदणी कार्यालयातच मी तुला ओळखलं. त्यानंतर मी तुझ्यावर नजर ठेवून होते. तुझा प्लॅन माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तुला काय वाटलं, तू त्या ऑटोखाली आला तेव्हा मी तुला ओळखलं नाही? अरे, मी ओळखपण दिली 'ढेरपोट्या' अशी. तू आपल्याच मस्तीत होता. मी तुझ्या ऑफिसमध्ये येऊन तुला 'ढेरपोट्या' असा आवाज देऊन गेले. पण इशारा समजशील तर तू ढेरपोट्या कसला? अरे महामूर्खा, इतका महत्त्वाचा कागद लॉजच्या सोफ्यात ठेवायला मी येडी का खुळी? तो कागद माझ्याजवळ आहे आणि माझ्याचजवळ राहील माझ्या सेफ्टीसाठी. सांग तुझ्या त्या अशीलाला.'
त्यानंतर त्या भोरनळीच्या राजात आणि ढेरपोटमध्ये काय झालं असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. ढेरपोट मात्र अजूनही विचार करतोय त्याचा सारा प्लॅन बाईंना समजलाच कसा? खरं म्हणजे तेही फार मोठं रहस्य आहे. ते रहस्य फक्त दोनच व्यक्तींना माहीत आहे - एक त्या बाई आणि दुसरा..
मला तमाशा बघायला जायचं आहे. बाईंनी पास पाठवलाय. आसपास कुठेही तमाशा असला की बाई मला हमखास पास पाठवतात.
----------
.
.
---------
(रहस्यकथांचे महान लेखक आर्थर कॉनन डायल यांना साष्टांग दंडवत. शंभराच्या वर वर्षे झाली, पण त्यांच्या रहस्यकथा नव्या पिढीलाही वाचाव्याशा वाटतात. कित्येक डिटेक्टिव्ह आले नि गेले, पण मनातली शेरलॉक होम्सची प्रतिमा मात्र पुसली जात नाही.)
मित्रहो
https://mitraho.wordpress.com/