'रफाल'

भारत आणि फ्रान्स यांच्यात ३६ रफाल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीचा तब्बल ५९,००० कोटी रुपयांचा करार झाला आहे. गेल्या २० वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाला लढाऊ विमाने पुरवण्यासाठी झालेला हा सर्वांत मोठा करार. लढाऊ विमानांचा अतिशय तुटवडा भासत असलेल्या भारतीय हवाईदलाला या करारामुळे किंचित आधार मिळणार आहे.

रफाल डेल्टा विंग बहुपयोगी मध्यम पल्ल्याचे ४++ श्रेणीतील लढाऊ विमान आहे. हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत हल्ले करण्यासाठी, टेहळणीसाठी, आकाशात वर्चस्व निर्माम करण्यासाठी, जमिनीवरील आपल्या सैन्याला हवाई छत्र पुरवण्यासाठी, जहाजविरोधी, शत्रुच्या प्रदेशात दूरवर हल्ला करण्यासाठी आणि अण्वस्त्रवाहक म्हणूनही भूमिका रफाल बजावू शकते. त्यामुळे या विमानावर मोहिमेच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. या विमानात डायरेक्ट व्हॉईस इनपुट बसवण्यात आलेला आहे. त्याच्या मदतीने वैमानिकाला विमानाच्या यंत्रणांना (शस्त्रास्त्रे डागण्याची सोडून) तोंडी सुचना देता येतात. त्यामुळे वैमानिकावरचा भार हलका होतो. त्याचबरोबर रफालमध्ये एईएसए रडार बसवलेला असणार आहे. त्यामुळे रफाल एकावेळी आकाशातील शत्रुच्या अनेक लक्ष्यांचा वेध घेऊन त्यांच्यावर हल्ला करू शकते. ही यंत्रणा भारतीय हवाईदलाच्या विमानांमध्ये पहिल्यांदाच बसवलेली असेल.

रफालमध्ये ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा बसवलेली आहे. भारतीय हवाईदलातील इतर लढाऊ विमानांमध्ये ती सध्या बसवण्यात येत आहे. रफालबरोबर आपल्याला ती इन-बिल्ट मिळणार आहे. या यंत्रणेमुळे रफालच्या कॉकपीटमध्ये ऑक्सिजन सिलिंडर बसवण्याची आवश्यकता नाही. परिणामी रफालचा उड्डाणाचा कालावधी जास्त झालेला आहे.

रफालवर मॅजिक-२, मायका, मेटिओर ही हवेतून हवेतली लक्ष्ये भेदणारी क्षेपणास्त्रे रफालवर बसवलेली आहेत. यापैकी मेटिओर मानवी दृष्टीपलीकडचे लक्ष्य भेदू शकणारे क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला १५० कि.मी. आहे. भारत रफालबरोबर ही क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे.