नमस्कार मंडळी! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
काय, फराळ केलात? आता चार-आठ दिवस रोज फराळाचं खाऊन कंटाळलात की मग जोडीला काहितरी खमंग करून खा. त्यासाठीच देतेय हराभरा कबाब पाककृती.
साहित्य : पालक : १ मध्यम जुडी
बटाटे : २
मटार : १ वाटी
भाजलेलं बेसन : २ चमचे
मीठ : चवीनुसार
गरम मसाला : एक छोटा चमचा
आलं-लसूण पेस्ट : १ चमचा
पुदिना : मुठभर
कोथिंबीर : छोटी वाटी
हिरव्या मिरच्या : ३-४
चाट मसाला : १ चमचा
काजू : सजावटीसाठी
कृती : पालक पानं स्वच्छ निवडून, धुऊन घ्या. उकळत्या पाण्यात ५-७ मिनिटं उकळून बाजूला काढा. आता यातील जास्तीत जास्त पाणी काढून टाका. हवं तर कढईत थोडं परतून कोरडं करून घ्या.
कढईत चमचाभर तेल तापवा. त्यात गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, मिरची, पुदिना, कोथिंबिर टाका. जरा परतून घ्या.
त्यात पालक, मटार घालून जरा कोरडं होईपर्यंत परता. गार होऊ द्या. मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्या. त्या मिश्रणात बटाटा कुस्करून घाला. भाजलेलं बेसन गरजेपमाणे घाला.

आता या मिश्रणाचे लहान गोळे करून घ्या. त्यावर एक एक काजू पाकळी लावा आणि तव्यावर थोड्या तेलावर भाजून घ्या.
कबाब तयार आहेत! पुदिना चटणी, टॉमेटो केचपबरोबर खा.
