स्वल्पविराम... चित्रमालेचा.

नमस्कार मंडळी
अगदी साष्टांग दंडवतच म्हणा की, नुसते एक आवाहन करतो काय अन ह्ये दणकून चित्रे, फोटो, कविता येतात काय. जब्बरदस्तच काम आपल्या मिपाकरांचे. आभार त्या सार्‍या कलाकारांचे, प्रतिभावंताचे की आम्हाला इतक्या सुंदर कलाकृतींचे बॅनर बनवायची संधी मिळाली. कित्येक जण तर माहीतही नव्हते. अगदी मनापासून आभार.
तर मंडळी सांगायची गोष्ट अशी की ह्या सगळ्या प्रवेशिका आल्या कशा स्वरुपात याचे कुतुहल सर्वांनाच आहे. तर त्या आल्या अशा
a
मेलवर आलेल्या ह्या इमेजेसना आम्ही फक्त थोडे एडिटिंग केले, फ्रेममध्ये बसवले आणि पब्लिश केले. झाले. नंतर रोज एक बॅनर पब्लिश करायचे अन धागा अपडेट काम मात्र आपल्या प्रशांतरावांनी केले,
बाकी आल्या त्या तुमच्या स्तुतीपर प्रतिसादाच्या लाटा. मस्त वाटले वाचून. नेहमीच आमचे बॅनर असतात. सर्वांनी मिळून बनवलेल्या बॅनरची मज्जा वेगळीच. ते सजवायचे काम करायची मज्जा तर अधिकच. नूलकरकाकांचा ओरिगामी गणपती म्हणा की नूतनचा क्विलिंगबप्पा म्हणा, इतका देखणा दिसत होता आला त्याच वेळी की बस्स. सूडक्या, स्पावड्या, वल्ल्या, मंदार आणि स्वच्छंदी मनोज ह्या मित्रांकडून दर्जेदार काम येणारच ह्याची खात्री होती. सरप्राइज दिले ते यशोमैय्या, घासकडवी गुर्जी आणि झुमकुल्याने. मोक्षदांचा आणि अमोलगवळींचा बाप्पा, माधुरी विनायकांचा काव्यलेखनाने आणखी बहार आली. नीलमोहोरांनी एकाच चित्रात लुकच बदलला. हॉट कलरस्कीम मधला गणेश त्यांनी एकदम कूल माय फ्रेंड गणेशा केला. शिवकन्याताईंचे कोलाज वेळेअभावी बॅनरमध्ये नाही घेता आले पण ते आहेच इथे.
sk
तसेच आपला कलाकार मिपाकर जोशी_ले दरवर्षी थर्मोकोलचे मखर स्वतः बनवतो. इलेक्ट्रीकल इंजिनिअर असणार्‍या जोशी_ले ची कलाकारी पाह्यली की त्याचा देव कसा प्रसन्न दिसतो ते कळते.
sk2
काही मिपाकरांनी त्यांच्या पाल्यांची चित्रे पाठवली, पण त्यांना नाराज ना करता त्यांचे इथे कौतुक करुयात. न जाणो थोड्या वर्षांनी रंगभुषा मंडळात असतील ही बच्चे कंपनी. हे चित्र आहे मिपाकर पद्माक्षींच्या लाडक्या शुभंकराचे.
sk1
आणि हे बनवणारे चिमुकले हात आहेत हेमंत जकातेंच्या दिनेशचे.
sk3
आता ह्या सार्‍या कलाकारांच्या मेहनतीतून, कलासाधनेतून साकारली गेली यंदाची गणेशचित्रमाला. त्या सर्वांचे आभार. वाचकांचे, प्रतिसादकांचे आभार. असाच लोभ राहु द्या. शेवटी आपल्या अजून एका प्रतिभावंत मिपाकर संदीप चांदणे यांच्या सुंदर गणेशचित्राने अन तेवढ्याच प्रभावी काव्यपंक्तींनी ह्या चित्रमालेचा समारोप....अहं...स्वल्पविराम देतो.
sk4
बुर्‍या बुरसटल्या
सुटेनात चाली
केली ही मतीही
हव्यासाच्या हवाली
जना खेळविती
शहाणे मदारी
आणि काय सांगू
गणेशा तुला रे?

वाजत-गाजत
बाप्पा पुन्हा ये
जल्लोष-हर्ष
आसमंती भरू दे
उपचार नको
फक्त उत्सवाचा
सदाचार आचार
होवो जनांचा
इतुकेच मागणे हे
गणेशा तुला रे!
.
धन्यवाद