निळा ग्रह!
निळ्या ग्रहावर होता एक निळा राजा.
निळ्या राजाची प्रजाही निळी.
निळ्या प्रजेची होती निळी निळी घरे.
निळ्या निळ्या घरात निळे निळे पडदे.
पाणीही निळे. झाडेही निळी.
आकाशही निळे. तळीच तळी.
Blue...
बाटेला शहर
बाटेला शहरात एक अवाढव्य मंदीर.
अवाढव्य मंदीराचा झेंडाही निळाच.
उत्तुंग!
आभाळाला थडकलेला
तुफान वेगाने वाहणाऱ्या जेट वाऱ्यामध्येच तो फडकायचा
आणि तो आजपर्यंत कधीच विसावला नव्हता
वधस्तंभ!
प्राचीन अर्वाचीन वधस्तंभ उभा होता बाटेला शहराच्या मधोमध
झेंड्यापेक्षाही उंचच उंच
दगडी वधस्तंभात होत्या खुंट्याच खुंट्या
आणि त्यात अडकले होते मानवी सांगाडे
शुभ्र पांढरे आणि खिळखीळी हाडे
रिपब्लिकन ऑफ ब्लू नेशनचे राष्ट्रीय स्मारक
जागतिक वारसाहक्क!
बाटेला शहर
एक्झिमो!
उरल पर्वतरांगाच्या खाचखळग्यांतून चालत गेलेला एक भटका प्रवाशी
जो होता बंदुकांचा व्यापारी
ज्याने पाहिले होते निळ्या पाण्याचे विशाल डोह
ज्यात होते मासे, जलपऱ्या, आणि निळे दगड
ज्यावर होती कलाकुसर
कोरीव शिल्पे
निळ्या ग्रहाची साधनसंप्पती
निळ्या डोळ्यांचा एक्झिमो तुडवत गेला निळा चिखल
निळी दलदल
निळ्या फुलांचा सुपीक प्रदेश
निळ्या सुगंधाची निळी वाट
आणि कळ्याच कळ्या
Blue...
निळा चोर!
एक्झिमो भटकत जेव्हा बाटेला शहरात आला
तेव्हा
वधस्तंभावर लटकला होता एक निळा चोर
जो होता जिवंत
ज्याने केला होता गुन्हा
अज्ञात
ज्याला मिळाला होता मृत्यूदंड
आणि तो मेला
पूर्वजांच्या सांगाड्यात अजून एक मिसळला
एक्झिमोने वधस्तंभाकडे पाहिले
त्याला दिसले
सांगाड्यातून ओघळणारे रक्त
जे होते लाल
त्या लाल रक्तात त्याला दिसला एक पेटलेला वणवा
आगडोंब!
चिरपरीचीत झोळी!
चिरपरीचीत झोळी सांभाळत एक्झिमो चौथऱ्यावर चढला
बिडी शिलगवायला मात्र तो विसरला नाही
विशाल जनसमुदायाकडे बघत एकच वाक्य पोटतिडकीने बोलला
"निळ्या ग्रहावरच्या निळ्या लोकांना जगण्याचा अधिकार आहे"
टाळ्यांचे आवाज आलेच नाहीत
एक निळी शांतता
एक निळा आक्रोश
काही जणांनी त्याला भेटून धोक्याची जाणीव करून दिली
तर काहींनी सल्लेही दिले
एक्झिमो विचारचक्रात बुडाला
नंतर तो जंगलातच राहायला गेला
चिरपरीचीत झोळीतून त्याने ना ना प्रकारच्या बंदुका बाहेर काढल्या
भुमिगत चळवळ नावारुपाला येण्याचा हाच तो काळ
असंतुष्टांचा फौजफाटा तयार झाला.
बेसावध सैनिकांवर हल्ले करून त्यांनी राजाला आव्हान दिले
या आव्हानाची किनार लाल होती
शेकडो बंडखोर वधस्तंभावर लटकले
बंदुकांचा खप वाढला
लपूनछपून
उरल पर्वतांतून बंदूकांचा मोठा साठा बाटेला शहराकडे वळाला
Guerrilla War started...
निळ्या ग्रहावरची म्हटली तर ही एक निळी घटना होती
एक्झिमोची प्रमुख मागणी होती वधस्तंभाचा सर्वनाश
जी राजाला कधीच मान्य नव्हती.
जागतिक वारसाहक्क सांभाळने हे तर त्याचे कर्तव्य.
चिंताक्रांत राजाने निळा विचार केला
त्याला आपला हुकूमी एक्का काढावा लागला.
निळ्या सैनिकांची निळी व्यूहरचना
सशस्त्र फौजफाटा जंगलात गेला.
बेसावध क्षणी एक्झिमो पकडला गेला
बरेच बंडखोर चकमकीत मारले गेले
जे होते होते निळे
ज्यांनी पुकारला होता बंड
जो होता निळा
जो निळ्या राजाने चिरडून टाकला
अगदी सहज
निळे बंडखोर काळे-निळे झाले
आणि पुन्हा पडले शुभ्र पांढरे
जंगलभर उरले केवळ सांगाडेच सांगाडे
हे एवढ्या लवकर घडेल याची एक्झिमोला जाणीवही नव्हती.
वधस्तंभाजवळ अलोट गर्दी उसळली.
खुंटीवर एक देह टांगला गेला.
एक्झिमोचा.
ज्याने केला होता एक गुन्हा
बंडखोरीचा
ज्याला मिळाला होता मृत्यूदंड
आणि तो मेला
प्रचंड जनसमुदाय
निळ्या ग्रहावरच्या निळ्या लोकांना आता दिसत होतं सांगाड्यातून ओघळणारं लाल रक्त
आणि त्यांच्या हातातल्या बंदुका आता सरसावल्या होत्या
ज्या त्यांनी आजपर्यंत लपवल्या होत्या
बाटेला शहराच्या अवाढव्य मंदीराचा झेंडा आता लाल झाला आहे.
आणि हा ग्रहसुध्दा आता लाल ग्रह नावाने ओळखला जातो
-रिपब्लिकन ऑफ रेड नेशन