सर्व वाचकांना पुस्तकदिनाच्या शुभेच्छा!
पुर्वीच्या काळी पोथ्या ,पुस्तके तयार करण्यासाठी लिथोग्राफी तंत्राचा वापर करत असत. हे अत्यंत किचकट व वेळखाऊ काम असे .तसेच कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक असे. या तंत्राने पुस्तक निर्मितीला अनेक मर्यादा येत.चित्रशाळा प्रेस ,निर्णयसागर प्रेस तसेच राजा रवीवर्मांची मळवली येथील प्रेस ही काही उदाहरणे आहेत.
नंतरच्या काळात शिसाच्या अक्षरांचे टाईप तयार करून अक्षरजुळणी केली जात असे. यात अनेक सुबक वळणदार छापाची अक्षरे तयार होऊ लागली.यात देखील अनुभवी टाईपसेटर्सची गरज असे . तासन् तास अत्यंत बारकाईने शुद्धलेखनाचा विचार करून काम केल्यावर ही पुस्तके तयार होत.दिवसाकाठी ४ते८ पाने तयार होत असत. या दोन्ही प्रकारांत चुकीला माफी नव्हती. अत्यंत काळजीपुर्वक पुस्तक निर्मिती केली जात असे. त्यावरच पुस्तकाचा ,अनुषंगाने प्रकाशकाचा दर्जा सिद्ध होत असे.
संगणकायुगात इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणे या व्यवसायात देखील आमूलाग्र बदल झालेत.
डीटीपीच्या उदयाबरोबर काम कमी माणसांत होऊ लागले. तसेच प्रिंटींग, बाईंडिंगच्या तंत्रात सुधारणा झाली . पुस्तक निर्मिती जलद होऊ लागली.आतातर प्रिंट ऑन डिमांड( pod) ने अगदी कमीतकमी ५ -२५ प्रती देखील छापु शकता येते.स्पेलचेकच्या सुविधेमुळे मुद्रितशोधन देखील कमी कष्टाचे झाले आहे.
पुस्तक निर्मितीतले महत्वाचे टप्पे-
● लेखकांकडून पुस्तकाचे हस्तलिखीत फुलस्केप कागदावर स्वच्छ लिहून घ्यावे.
● डीटीपी करीता पूर्ण सुचना लिहीलेल्या असाव्यात. टाईप (फॉंट) ,साईज यांचा विचार केला असावा. एक प्रकरण टाईप करून त्याचा लेआऊट , लेखनात आकृत्या असल्यास त्यांचा विचार करून पुस्तक अधिकाधिक आकर्षक ,सुटसुटीत व ग्राहकाभिमुख करण्याचा प्रयत्न करावा.पुस्तकाच्या विषयानुरुप त्याला साजेसे मुखपृष्ठ तयार करणे. हल्ली संगणकाच्या मदतीने व अनेक नवनवीन प्रोग्रॅम्समुळे मुखपृष्ठ रचना ,रंगसंगतीत नावीन्य आले आहे.
● डीटीपी व मुद्रित शोधन पूर्ण झाल्यावर महत्वाचा टप्पा म्हणजे पुस्तकछपाई.छपाईसाठी सर्वात महत्वाचा कच्चा माल हा कागद - तो स्वच्छ ,उत्तम दर्जाचा ,टिकाऊ असेल यावर भर दिला गेला पाहीजे. अर्थातच हे पुस्तकाच्या उपयुक्ततेवर अवलंबून असते. मोठमोठे संदर्भग्रंथ, कोश यांचे निर्मितीमुल्य हे कायमच उच्च दर्जाचे असते .त्यासाठी उत्तम कागदाची निवड केली जाते.पुस्तकाच्या आकारानुसार कागदाच्या आकाराची निवड केली जाते ,त्यानंतर पुस्तक छपाईसाठी जाते.
● या नंतर येतो तो बाईंडिंगचा टप्पा पृष्ठसंख्येवर कोणत्या प्रकारचे बाईंडिग करायचे ते अवलंबून असते. बाईंडिंग करत असतानाच पुस्तकाला त्याचा चेहरा म्हणजे अर्थातच त्याचे मुखपृष्ठ लावले जाते. अश्या प्रकारे लेखकाच्या मनातले विचार पुस्तकरुपाने मूर्त स्वरूपात येतात.
पण प्रक्रिया इथेच थांबत नाही . तयार झालेले पुस्तक प्रकाशित करून कधीकधी प्रकाशन संमारभ करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते . हल्ली वेबसाईटच्या माध्यमातून प्रकाशक आपली नवी पुस्तके बाजारात प्रदर्शित करतात. योग्य वितरकाकडे पुस्तक सुपुर्द करून सर्वत्र पुस्तक उपलब्ध करून दिले जाते.
सध्या बाजारात अनेक प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. त्यात फंक्शनल पुस्तके आणि नॉन फंक्शनल पुस्तके असे साधारण प्रकार असतात. फंक्शनल पुस्तकांत शैक्षणिक , पाककला बागकाम इ. कलाकौशल्यांवर आधारीत पुस्तके येतात ज्यायोगे ग्राहक काहीतरी शिकू शकतो. नॉन फंक्शनल पुस्तके - ज्यात ललीत, कथा कादंबऱ्या, आत्मचरित्रे अशी मनोरंजन व माहितीपर पुस्तके येतात.
साधारणपणे पुस्तकांचे प्रकार-
● धार्मिक पुस्तके- यात अचूकता हवी , किंमत माफक हवी .
● कथा कादंबऱ्या - दर्जा चांगला व लेखन चांगले असेल तर किंमतीचा विचार न करता वाचक खरेदी करतो. काहीजण नवीन लेखकांना मिळणाऱ्या अनुदानाचा फायदा घेऊन पुस्तके छापतात पण त्याचा दर्जा चांगला असेलच असे नाही.
● दिवाळी अंक - दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत जवळ जवळ १५०० अंक निघतात. त्यामध्ये किंमती जास्त परंतु जास्तीतजास्त जाहिराती मिळवून त्याचा खर्च नियंत्रित करता येतो.
● सगळ्यात अवघड काम शालेय अभ्यासक्रमावर आधारीत शैक्षणिक पुस्तके छापणे. यात शासनाच्या धोरणानुसार वेळोवेळी बदलणाऱ्या अभ्यासक्रमाचा विचार करावा लागतो. भाषा शहरी व ग्रामीण भागातले विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून निवडावी लागते.तसेच पुस्तकाची किंमत वाजवी ठेवावी लागते जेणेकरून ती सर्वच स्तरातील लोकांना परवडेल.तारेवरची कसरत करून पुस्तक छपाई करावी लागते.
पाऊस ,वाळवी, उंदीरघुशी या सारख्या संकटांना सामोरे जावे लागते. कधीकधी यामध्ये फायद्यापेक्षा तोटा जास्त अशी परीस्थिती देखील येते. परंतु समाजासाठी काही चांगल्या गोष्टी करतो हे समाधान आणि निर्मितीचा आनंद महत्त्वाचा ठरतो. हा ज्ञानाचा वसा आहे. नवीन पिढी घडवण्यात पुस्तकांचा खूप मोठा वाटा आहे.
चला तर मग या पुस्तकदिनाच्या निमीत्ताने आपण सुद्धा नियमित वाचनाचा संकल्प करू!
