
लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. जसा आकार द्यावा तसा घडत जातो. मुलांच्या वाढत्या वयात पालक तसंच शिक्षक या दोघांचा ही त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो. वाचन, श्रवण, निरिक्षण व लेखन अशा विविध माध्यमातून मुलं सतत शिकत असतात. यापै़की 'वाचन' मुलांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा. विविध विषयातील वाचन फक्त आनंदच देत नाही तर त्यामुळे स्वविकासही साधता येतो. मुलांमधे वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी वाचनाची गोडी लहानपणी लागलेली उत्तम. मुलांमधे वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खालील काही गोष्टी करता येतील -
- अगदी लहान, लिहीता - वाचता न येणार्या वयात चित्ररूपी गोष्टींची पुस्तकं आणावीत. अशा पुस्तकांमधे भरपूर चित्रं असतात. मोठी व रंगीबेरंगी चित्रांची पुस्तकं मुलांचं लक्ष पटकन आकर्षून घेतात. चित्रांच्या माध्यमातून सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवणं अधिक सोपं जातं.
- छोट्या छोट्या गोष्टी असलेली पुस्तकं मुलांना झोपतांना नियमीत वाचून दाखवावीत. गोष्टी वाचतांना पुस्तकातला मजकूर मोठ्याने वाचल्याने शब्दातील चढ-उतार, योग्य उच्चार, शब्दार्थ समजून घेणं सोपं होतं. तसंच, पुस्तक वाचतांना एक-एक शब्दावर बोट ठेऊन वाचावे. पुस्तकातली छोटीशी गोष्ट पुन्हा पुन्हा वाचून मुलांना पाठ होते. अशावेळी गोष्टीचा थोडासा भाग वाचून दाखवून उर्वरीत भाग मुलांना पूर्ण करायला सांगावा.
- पुस्तकातला एखादा नाट्यप्रसंग, थोरांची चरित्र दमदार आवाजात, साभिनय वाचून दाखवल्यास मुलांनाही उत्सुकता वाटते.
- घरात मुबलक प्रमाणात पुस्तकं असावीतच पण पुस्तकं मुलांच्या चटकन हाताशी लागतील अशा ठिकाणी ठेवावीत. घरातच मुलांचं स्वतःचं असं वाचनालय तयार करता येईल. यामुळे मुलांचा पुस्तक विकत घेण्याकडे कल वाढेलच परंतु पुस्तकांबाबत आत्मीयताही वाढीला लागेल. सणवार अथवा वाढदिवस अशा प्रसंगी पुस्तकं जरुर विकत घ्यावं.
- मुलांसाठी पुस्तक विकत घेतांना त्यांची आवड निवड बघून विकत घ्यावं. न कळत्या वयात मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी वयानुरुप पुस्तकं वाचायला द्यावीत. नक्की कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचावीत यावर पालक व शिक्षक योग्य ते मार्गदर्शन मुलांना करावं. आपलं मुलं कशा प्रकारची पुस्तकं वाचत आहे याकडे ही लक्ष असावं.
- अनेकदा पालकांमधेच वाचनाबाबत औदासिन्य आढळतं. मुलांना वेळ घालवण्यासाठी बरेचदा पुस्तकांऐवजी व्हिडीयो गेम्स, निरनिराळ्या प्रकारचे खेळ आणून देण्यात पालकांचा कल दिसून येतो. नविन खेळण्याच्या जोडीला पुस्तकंही विकत घेऊन देता येईल.
- शाळेत जाणार्या मुलांच्या वयातल्या मुलांना लहान मुलांची पुस्तक असलेलं वाचनालयाच सभासत्व घेऊन देता येईल.
- जेवणाच्या टेबलावर पुस्तकांबाबत चर्चा करावी. यात मुलांनाही सहभागी करुन घ्यावं. अशा प्रकारच्या चर्चेतून मुलांची आवड समजून घेता येते. आपण वाचलेल्या एखाद्या पुस्तकातला आवडता भाग, प्रसंग यावर मुलांसोबत चर्चा जरूर करावी. मुलांनी वाचलेल्या पुस्तकाबाबत त्यांचं मत जाणून घ्यावं.
- आपल्या शहरात भरणार्या पुस्तक - प्रदर्शनांना मुलांसोबत भेट जरुर भेट द्यावी. पुस्तक प्रदर्शनाद्वारे बाजारात येणारी नविन पुस्तकं, लेखक यांची ओळख होते. अशा प्रदर्शनात बरेचदा सवलतीत पुस्तक उपलब्ध असतात. त्याचाही फायदा घेता येईल.
- उत्तम संभाषणकला अवगत होण्यासाठी भरपूर वाचनाची गरज असते. मुलांच्या पुस्तक खजिन्यात दंतकथा, सुभाषितांची पुस्तकं, थोरांची चरित्रं विविध प्रकारच्या पुस्तकांचा भरणा असला पाहिजे.
- रोजच्या वर्तमापरत्र वाचनातून बरंच भरपूर माहिती , सामान्यज्ञान मिळतं. महिनाअखेर वर्तमानपत्रं फक्त रद्दी न बनता क्रिडाजगत, राजकारण, आंतराष्ट्रीय घडामोडी यांचं रोजचं वाचन मुलांनी करावं. वर्तमानपत्रातल्या आवडत्या रकान्याची कात्रणं कापून वहीत चिकटवून छानसा संग्रह करता येईल.
- सखोल वाचनासाठी मुलांना आवडती वाक्य, उतारे अधोरेखित करायला सांगवेत. अर्थ समजून न घेता वरवर केलेलं वाचन लगेच विसरलंही जातं. अस्थिर मनाने, घाईघाईत केलेल्या वाचनापेक्षा एकाग्रतेने, सावकाश, अर्थ समजून घेत केलेलं वाचन केव्हाही फायद्याचं ठरतं.
- पुस्तक वाचनासोबतच पुस्तकाची योग्य ती काळजी कशी घ्यावी याबाबत मुलांना लहानपणापासूनच मार्गदर्शन करायला हवं. पुस्तक योग्य रीतीने कसं हाताळावं, वाचून झाल्यावर जागेवर लावणं, पुस्तकाला कव्हर घालणं अशा छोट्या छोट्या सवयी लहानपणापासून अंगी बाणायला हव्या.
- पुस्तक वाचनासाठी वेळ मिळत नाही ही पालकांची नेहमीची तक्रार. आजच्या धकाधकीच्या युगात वाचनासाठी वेळ काढणं हे थोडं आव्हानच आहे. पण त्याचवेळी आपण टि.व्ही. , इंटरनेट यामागे बराच वेळ वाया घालवतो. रोज दिनक्रमातून दहा-पंधरा मिनीटं फक्त वाचनासाठी बाजूला काढली तरी आठवड्यात एखादं छोटंसं पुस्तक वाचून संपवणं सहज शक्य आहे. दिवसातला अर्धा -एक तास टि.व्ही पूर्णपणे बंद करुन फक्त आणि फक्त पुस्तक वाचनासाठी ठेवावा.
- आजकाल ऑडीयो बुक्सच्या माध्यमातून अनेक चांगली पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. प्रवासात अशा पुस्तकांचा करमणुकीसाठी चांगला वापर होतो. बाजारात नविन आलेले खास लहान मुलांसाठी बनवलेले 'किंडल' सारखे इ-रीडर प्रवासात नेण्यास व वाचनासाठी उत्तम!
- मुलांच्या मित्रमैत्रीणींचा ग्रुप बनवून बुक-डेट किंवा बुक क्लबसाराखा एखादा प्रकल्प राबवता येईल. महिन्यातून एकदा सर्व मित्र-मैत्रीणी एकत्र येऊन पुस्तक वाचन करुन शकतात.
- मुलांनी पुस्तक वाचावीत म्हणून पालक भरपूर पुस्तकं आणून देतात परंतु त्यातली नक्की किती पुस्तकं मुलं वाचतात याकडे बरेचदा लक्ष दिलं जात नाही. काही पानं चाळल्यावर मुलांचं कुतूहल संपतं आणि पुस्तक कोपर्यात ढकलली जातात. नविन काहीतरी सुरू करुन अर्धवट सोडणं हा मुलांचा स्वभावधर्मच आहे. मुलांना 'आरंभशूर' बनवू नका. त्यांच्या आवडीचं पुस्तक आणून देऊन वाचनाबाबत मार्गदर्शन करावं. एक पुस्तक वाचून झाल्यवरच दुसरं पुस्तक द्यावं. वाचनाची गोडी हळूहळूच वाढत जाते.
लहान मुलांसाठी वाचनास योग्य अशी काही निवडक मराठी पुस्तकं -
- इसापनितीच्या ५०१ गोष्टी.
- शामची आई
- फास्टर फेणे
- अकबर-बिरबलाच्या गोष्टी
- हिंदू सण व उत्सव
- महाभारतातल्या कथा
- पंचतंत्र कथा
- अरेबियन नाईट्स कथा
- तेनालीरामा
- सिंहासन बत्तीशी
- हितोपदेश
- आकाशाशी जडले नाते.
- रामायणातल्या गोष्टी
- अमर चित्रकथा
- मालगुडी डेज
- खडकावरला अंकुर
- चिंगी
मराठी पुस्तकं मिळण्याची मुंबईतील काही निवडक दुकानं -
- आयडीयल बुक डेपो, छबिलदास शाळेमागे, छाबिलदास रोड, दादर (प) मुंबई ४०००२८)
- जगदिश बुक डेपो, सर्वोदय सुपर मार्केटच्यामागे, रानडे रोड, दादर (प) मुंबई ४०००२८
- क्रॉसवर्ड, कॅडेल रोड, शिवाजी पार्क, दादर (प), मुंबई ४०००२८)
- मॅजेस्टिक बूक डेपो, राममारूती रोड ,ठाणे
- आझाद बुक डेपो, सर्वोदय सुपर मार्केटच्यामागे, रानडे रोड, दादर (प) मुंबई ४०००२८
- मनोहर पुस्तक भांडार, दामोदर हॉलजवळ, परेल
- जनता बुकस्टॉल, सिद्धीविनायक मंदीराजवळ, दादर (प)
- राजहंस प्रकाशन, गोखले रोड, दादर (प)
- बागडे बुक स्टोअर, मानपाडा रोड, डोंबिवली (पू)
- ज्ञानदा ग्रंथसंग्रहालय, मानपाडा रोड, डोंबिवली (पू)
***
(प्रस्तुत लेख माझी आई - हर्षदा राणे हिने पुस्तक दिन विशेष लेखमालिकेसाठी लिहून दिलेला आहे.)
