पाठलाग करणारे पुस्तक (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

Header

पुस्तक दिनाचा विषय निघाला आणि मला एक पुस्तक परिचय तरी लिहावासा वाटू लागला. कोणत्या पुस्तकावर लिहावं असा विचार करताना सतत एकच पुस्तक समोर दिसू लागलं, ते म्हणजे मारा अँड डॅन.

आता यात गोम अशी होती की मी हे पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेलं असल्याने तपशील काहीच आठवत नव्हते. पण अगदी मनापासून तर त्यावरच लिहावंसं वाटत होतं. मग पुस्तकशोध सुरू झाला. ‘शोधात असलेलं पुस्तक न सापडणं’ हा एक प्रकार घडल्याशिवाय पुस्तकांची जिज्ञासा कायम नाही राहणार असं काहीसं माझ्या दैवाला वाटतं. असो. तात्पर्य, पुस्तक मिळालं नाही, तपशील आठवत नाहीत, आणि लिहायचं त्याबद्दलच आहे. एकदा त्याचा विचार आल्यावर दुसरं काहीच खरंच लिहावंसं वाटत नव्हतं, सुचत नव्हतं. पण मग इतक्या वर्षांनीही हेच पुस्तक मनात पिंगा का घालत होतं? बस, या किड्यानेच माझी पेचातून सुटका केली.

पुस्तकं असतातच का? कागदावरून उतरून मनाच्या कोपऱ्यात दडी मारून अशी कधीतरी, कुठेतरी उगवण्यासाठीच ना? निर्जीव वाटणाऱ्या पुस्तकांना आपण खरंच निर्जीव मानू शकतो का? वाटेवाटेवर भेटणारी पुस्तकं कुठच्या रस्त्यावर कधी हात दाखवतील, कुठच्या वडावर कधी पाय सोडून बसलेली दिसतील आणि कधी कुठच्या विहिरीतून आवाज देतील, याचा काही नेम नसतोच. पुस्तकांना आत्मा असतो, आणि तो झपाटतो तो आयुष्यभरासाठी.

आता हेच पुस्तक बघा, तसं तर फिक्शन आहे. ३००० वर्षानंतर अजून एका आईस एजने आपली आजची संस्कृती नष्ट केली आहे. ‘इफ्रिक’ मधे पाण्याच्या वाढत जाणाऱ्या दुर्भीक्ष्यातून आणि राजकीय यादवीतून एका टोळीची ७ वर्षांची राजकन्या, आणि ५ वर्षांचा राजपुत्र यांना वाचवलं जातं. त्यांची खरी नावे त्यांना संकटात ढकलतील म्हणून त्यांना नावे विसरायला लावली जातात. आणि अशा पद्धतीने मारा आणि डॅनचा ‘अप नॉर्थ’ प्रवास सुरू होतो. का, त्यांनाही माहीत नाही. पण ‘गेलं पाहिजे’ या एकाच ध्यासाने ते पुढे जातात. ‘व्हॉट डिड यू सी टुडे’ हा पारंपारिक खेळ खेळत.

मला एक आठवतं, की हे पुस्तक वाचताना मला फार तहान लागायची. मोकळा वाहणारा नळ पाहून कसंतरी व्हायचं. माराचे पाण्याच्या थेंबासाठीचे हाल, जीव वाचवण्याचे प्रयत्न माझ्यासोबत फिरायचे. पण, तेव्हाच नाही, हल्लीच होळीचे रंग टाकीमधे टाकून खोडसाळ पोरांनी पाणी वाया घालवलं, तेव्हाही मला अस्थिपंजर मारा त्या पाण्यात परत दिसली. तसाच डॅन. धाडसी, पण आधी कृती व मग विचार करणारा, बहिणीला टाकून पुढे जाऊन परत तिच्यासाठी म्हणून येणारा, तिला सर्वस्व मानूनही तिला जुगारात पणाला लावणारा डॅन अनेक ठिकाणी दिसतच राहिला. पण हे दोघं दिसले, पण भेटले कुठेच नाहीत. डोरिस लेसिंगचं हे लिखाण असं वाचकाला दूर दूर ठेवणारं आहे. त्यात प्रवाहीपण नाही, बरंच अडखळायला होतं. त्यातली ही दोन पात्रे वैचारिकरित्या गुंतवतात, भावनिकरित्या नाही. त्यांना ‘आवडती’ म्हणावंसं वाटत नाही.

मग असं काय आहे जें इतक्या वर्षानंतर मनाला खेचतं? काहीसं दुर्बोध, गूढ, चेहरा नसलेलं बनून हे पुस्तक टोचत का राहतं?

मारा आणि डॅन यांचं ‘माणूस’ असणं हेच कदाचित.. हे दोघं पुस्तकातही आणि खऱ्या जगातही तुकड्या-तुकड्यांनी सापडत राहतात. एक स्त्री आणि एक पुरुष म्हणून. पुस्तकाचं मुखपृष्ठ असंच काहीसं. दुष्काळी भेगाळलेल्या जमिनीवर एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या पळणाऱ्या सावल्या. अगदी लहान वयापासून आपली सगळी ओळख पुसून टाकून हे दोघं धडपडतात, निरनिराळ्या अनुभवांमध्ये फेकले जातात, केवळ २ माणसं म्हणून जगात आपला मार्ग शोधतात. एक आदिम काहीतरी या दोघांमध्ये जाणवत राहतं. पण त्याचसोबत पुढे पुढे जात राहण्याची, काहीतरी ध्येय घेऊन झपाटून घेण्याची आधुनिक वृत्तीही त्यांच्यात दिसते. ज्ञानतृष्णा आणि खरी तहान आणि त्यासोबत जगण्याचा संघर्ष, अशी काहीशी गुंफण या पुस्तकात आढळते. अतिशय विस्कळितपणे या पात्रांचं बाईपण, पुरुषपण आणि माणूसपण दिसत राहतं. आणि म्हणूनच ते पाठलाग करणं सोडत नाही.

मुळात एकसंध नसलेल्या या कथेला आठवणींच्या तुकड्यांमधून शोधणं माझ्यासाठी कठीण आहे. पण एक मात्र आहे, या पुस्तकाने जुन्यात नवीन भर घातली नसेल कदाचित, पण नव्यात सतत जुनी भर ते अजूनही घालत आहे.
Footer