पाडस (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

Header

पाडस- राम पटवर्धन यांनी मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या द येर्लिंग चा केलेला हा नितांतसुंदर अनुवाद! अत्यंत समर्थ अनुवादांपैकी एक! आपल्याला आवडत्या पुस्तकातला आवडलेला परिच्छेद निवडायचा ठरवल्यावर नक्की कोणते वेचे घ्यायचे आणि किती घ्यायचे हे ठरवता येणं फार कठिण झालं. मग आपण अनुवादित पुस्तक वाचतो आहोत हे विसरायला लावण्याची ताकद असलेली भाषा दाखवणारे या पुस्तकातील काही परिच्छेद उद्धृत करावे असं ठरवलं.

नदीशी समांतर अशा एका रस्त्यानं ते उत्तरेकडे वळले. रस्त्याच्या कडेला मॅग्नोलियाचे ताटवे बहरले होते. नंतर त्यांना दोन्ही बाजूलाफुललेल्या कण्हेरी असलेली एक पाणंद लागली. त्यांच्या पुढंच पाणंदीतून लाल पक्षी उडत गेले. अणीदार,पांढर्‍या रिपांच्या एका कुंपणापाशी पाणंद थबकली. रिपांच्या पलिकडे रंगीबेरंगी तुकड्यांची दुलई जमिनीवर फेकल्यासारखी हुतोआजीची बाग चमकत होती. तिचं पांढरंशुभ्र टुमदार घर हनीसकल आणी जाई यांच्या वेलींनी जमिनीशी घट्ट बांधून ठेवलं होतं. तिथली प्रत्येक गोष्ट ज्योडीच्या आवडीची आणि ओळखीची होती. ज्योडी बागेतल्या पाऊलवाटेनं धावत गेला. वाटेच्या दोन्ही बाजूंना भुरभुरत्या निळ्या गुलाबी तुर्‍यांनी झाकलेले निळीचे वाफे होते.

ह्या वर्णनातून हुतोआजीचं घर डोळ्यासमोर उभं राहतं. अशा चित्रदर्शी वर्णनांनी नटलेल्या ह्या पुस्तकातला हा अजून एक परिच्छेद - अगदी ते नृत्य डोळ्यासमोर उभं करणारा..

त्यानं करकोचे किती आहेत ते मोजले. सोळा होते एकंदर. हॉल्युशिया शहरात त्यानं एकदा 'कोटिल्यन नाच' बघितला होता, तसंच हे करकोचे सहीसही नाचत होते. दोन पांढरेधोप करकोचे बाजूला ताठ उभे होते. ओरडणं आणि गाणं यांचं मिश्रण त्यांच्या विचित्र संगीतात झालं होतं. नाचातल्या सारखीच त्यांची आड लय होती. इतर पक्षी मंडलाकार फिरत होते. त्या मंडलात आणखी एक मंडल होतं आणि ते उलट्या दिशेनं, उजवीकडून डावीकडे फिरत होते. गायक गात होते. नर्तक पंख उभारत होते. प्रथम एक पाय आणि नंतर दुसरा पाय उचलीत होते. आपल्या हिमशुभ्र वक्षभागात चोची लपवीत होते, मग माना वर करीत होते आणि चोची पुन्हा खाली बुडत होत्या. लांब केलेल्या हातांप्रमाणे पंख वरखाली होत फडफडत होते. बाहेरचं मंडल संथ लयीत सरकत होतं. मग आतल्या मंडलानं किंचित वेग घेतला.

अकस्मात सारे थांबले.ज्योडीला वाटलं की नृत्य संपलं असेल किवा आपली चाहूल करकोच्यांना लागली असेल. पण तेवढ्यात ते दोन गवई नर्तकांमध्ये सामील झाले, नर्तकातले दोन पक्षी गायकांच्या जागी उभे राहिले. सर्वजण क्षणभर सज्ज उभे राहिले आणि नाच पुन्हा सुरू झाला. दलदलीच्या नितळ पाण्यात त्यांच्या पडछाया दिसत होत्या. पाण्यातही सोळा करकोचे गोल फिरत होते. संध्याकाळच्या झुळुका गवतावरून वाहत गेल्या. ते झुकू लागलं, सळसळू लागलं, पाण्यावर तरंग उठले. मावळत्या उन्हानं नर्तकांच्या शुभ्र पंखांवर गुलाबी छटा चढवली. एका जादूच्या प्रदेशात जादूचे पक्षी नाचत होते. गवत त्यांच्याबरोबर हलू लागलं, जमीन थरारू लागली. करकोच्यांबरोबर जमीन, मावळता सूर्य, वारा, आभाळ सारी नाचात रंगली. करकोच्यांच्या पंखांप्रमाणंच ज्योडीचेही हात वरखाली होऊ लागले. सूर्य गवतात बुडत होता. सारी दलदल सोन्याने मढली होती. लिलीच्या पानांवर अंधार उतरला आणि पाणी काळवंडलं. मग अकस्मात सारे पक्षी आकाशात उडाले. सूर्यास्ताच्या वेळच्या उर्वरित उजेडाभोवती आभाळात त्यांची माळ तयार झाली.

किती चित्रदर्शी! तो सोळा करकोच्यांचा नाच आपल्यासमोर घडतो आहे असं वाटायला लावणारा..
असे परत परत वाचावेसे वाटणारे किती तरी वेचे ह्या पुस्तकात आहेत. अनुवादापलिकडे जाणार्‍या राम पटवर्धनांच्या समर्थ लेखणीतून उतरलेलं पाडस !
मौज प्रकाशन -प्रथमावृत्ती १९६७ !
५० वर्ष होतं आली पहिल्या आवृत्तीला तरीही पाडस चा ताजेपणा आणि टवटवीतपणा आपल्याला ह्या वेच्यांतून अजुनही जाणवतो.

Footer