"रस्ता" - चित्रलेख

'रस्ता' या विषयावर चालू असलेल्या स्पर्धेच्या निमित्ताने काही चित्रे संबंधित धाग्यावर प्रकाशित केली होती त्याच्या संबंधित अधिक माहितीसाठी हा लेख काही मिपाकरांच्या प्रोत्साहनामुळे प्रकाशित करत आहे. सोबत त्या प्रवासातील वैशिष्ट्ये अधोरेखित करणारी काही अधिक चित्रे... एक वेगळा प्रयत्न…

पाऊलवाटा:
पहिले चित्र हे अनुक्रमे मणिपूर, आसाम व त्रिपुरा येथील जंगल वाटांचे आहे. या प्रवासाचे मुख्य ध्येय तेथील अनोखा निसर्ग अनुभवण्याचे होते, आणि या तीनही वाटा मला तीन अविस्मरणीय अनुभवांकडे नेणाऱ्या ठरल्या. पट्टेरी वाघांपेक्षाही दुर्मिळ प्राणी याच वाटांवर पहावयास मिळाले…

मणिपूर मध्ये अगदी मध्यभागी लोकताक नावाचे सरोवर आहे, इथे पाण्यावर तरंगणारी गवताची एक प्रजाती वाढते. हा प्रदेश 'कैबुल लामजाव' राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत येतो व 'सांगाई' (Panolia eldii eldi) या दुर्मिळ हरणाच्या प्रजातीचे हे अभय स्थान आहे. केवळ येथेच आढळणारी ही प्रजाती केवळ २०० च्या आसपास शिल्लक आहे.
आसाम मधील ब्रह्मपुत्रेच्या पात्रात एका बेटावरील दुसरी पायवाट, इथे 'सुवर्णकपि' (Golden Langur) कुटुंब वास्तव्यास आहे. भूतान व भारत मिळुन संख्या २००० च्या आसपास, भारतात केवळ आसाम व त्रिपुरा मध्ये आश्रय.

त्रिपुरा मधील तिसरी पायवाट, दोन डौलदार हत्ती दिसत आहेतच, पण हे जंगल खास आहे ते येथील एका बिडाल प्रजातीमुळे. 'अभ्रांकित बिबळ्या' (Clouded Leopard) ही भारतातील अतिदुर्मिळ प्रजाती केवळ येथेच पहावयास मिळते. हि प्रजाती 'बिग-कॅट' कुटुंबातील सर्वात लहान व झाडावर चढण्यात सर्वात तरबेज! आग्नेय आशियामध्ये काही ठिकाणी अजूनही हे अस्तित्व टिकवून आहेत, परंतु भारतीय जंगलात यांची संख्या केवळ २० ते ३० च्या दरम्यान. इतक्या दुर्मिळ प्राण्याचा असा फोटो मिळणे हे महाभाग्य निश्चये!! या सगळ्यासाठी अर्थात जंगलात ठिय्या देऊन बसणे आवश्यक, पण सर्व श्रमाचे सार्थक!

चौथी पायवाट ब्रह्मदेशातील इरावतीच्या काठी, एका शांत संध्याकाळी, विशाल वटवृक्षाखाली येऊ पाहणाऱ्या तिरकस किरणांनी उजळलेली…

दुर्मिळ वन्य प्राण्यांचा विषय निघालाच आहे त्यामुळे वाटेवरचा नसला तरी या प्रदेशाशी निगडीत एक सुंदर पक्षी, 'हरितमयूर' (Green Peafowl) आपल्याकडील मोरापेक्षा थोडा बेढब व रानटी दिसणारा हा पक्षी. मुख्यतः मान व तुरा यात वेगळेपण लगेच समजते.

हवाई चित्रण:
पहिला रस्ता नायगारा जवळील कॅनडा आंतरराष्ट्रीय सीमा. जलप्रपात पाहणे हा मुख्य हेतू, त्याचाही एक फोटो.

दुसरा रस्ता कोलोरॅडो राज्यातील ॲस्पेन शहराजवळ टिपलेला आहे, शरदातील रंगबदल हा एक अनुपम नैसर्गिक सोहळा आहे. त्याचे काही हवाई चित्रण. (मागे 'मानवी स्थापत्य' या विषयावरील स्पर्धेत एक चित्र टाकले होते)



शरदरंग :

वरील विषयावरूनच पुढे हि दोन्ही चित्रे कोलोरॅडो येथील. फार वाहतूक नसणाऱ्या रस्त्यांच्या शोधात गेलो असता असे सुंदर प्रदेश पहावयास मिळाले …

लाल खडीचा रस्ता:
हा रस्ता झायॉन नॅशनल पार्क मधील आहे. पूर्ण परिसरात असेच लाल खाडीचे गुलाबी झाक असलेले रस्ते, पहिल्यांदाच पहिले. बाकी सर्व फोटो हे माझ्या एकल प्रवासातील आहेत परंतु हा एकमात्र अपवाद.

पर्वतीय व वाळवंटी रस्ते:
हे पेरूमधील रस्ते. १० ते १४ हजार फुट उंचीवरील पठारावरून जात असतानाचे हे फोटो. विरळ हवा व धुळीचा अभाव यामुळे अशा ठिकाणी फोटो नेहमीच स्वच्छ येतात. तिसरे चित्र पॅराकास किनारी वाळवंट, अटाकामा वाळवंटाचा एक भाग (पेरू मालिकेत पूर्वप्रकाशित)


रस्ते व हिरवाई:
पहिला रस्ता थायलंड येथील उत्तर सीमावर्ती महामार्ग. इथे लाओस, ब्रह्मदेश व थायलंड यांच्या सीमा एकत्र येतात. मेकाँग नदीच्या खोऱ्यातील संपन्न प्रदेश. (आग्नेय आशिया मालिकेत या भागावर लेखन)

दुसरा रस्ता दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे येथील. जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प 'ईताईपु' ब्राझील व पॅराग्वे यांच्या सीमेवर पराना नदीवर बांधण्यात आला आहे त्या परिसरातील हे चित्र. अशी अभियांत्रिकी आश्चर्य ही आधुनिक तीर्थक्षेत्रे!!

ईताईपु प्रकल्प, जिथून पाणी बाहेर पडताना दिसत आहे, त्याच्या पलीकडे ब्राझील, अलीकडे पॅराग्वे. एकूण क्षमता १४,००० मेगावॉट.

शहरी रस्ते:
पहिला रस्ता ग्वाटेमाला येथील, काही वादक, विक्रेते चित्रामध्ये दिसत आहेत, शहराचा अतिशय उत्साही भाग (ग्वाटेमाला धाग्यावर पूर्वप्रकाशित)

दुसरा रस्ता मेक्सिको मधील पुएब्ला या शहरातील. मेक्सिको सिटी च्या दक्षिणेकडे वसलेले टुमदार शहर, येथेही स्पेनच्या स्थापत्य पद्धतीचा प्रभाव.

लोहमार्ग:
उटीला जाणाऱ्या वाफेवरच्या आगगाडीचे रूळ. अजून एक चित्र.

पुरातन बांधणीचे रस्ते:

पहिला भुवनगिरि किल्ल्याचा मार्ग. हा किल्ला तेलंगणात हैदराबादेपासून अगदी तासाभारावर आहे.

दुसरा कांची च्या कैलासनाथ मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग, माझे दक्षिणेतील सर्वात आवडत्या मंदिरांपैकी एक. आश्चर्य म्हणजे पर्यटक अथवा भाविक कोणाचीही अजिबात गर्दी नाही.

मंदिराचा दर्शनी भाग:

शेवटी आसाम मधील एकाकी वाट, माझे आवडते चित्र. सॉलकुची या रेशीम उत्पादन व विणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या खेडेगावाजवळ, ब्रह्मपुत्रेच्या किनारी.