जी साधने आपण वापरतो. ती घेऊन आपण जसे सुस्साट धावत सुटतो तसेच कुठे थांबायचे याचेही भान हवे. कॉम्प्यूटर हा आज आवश्यक भाग बनला आहे. त्याचे अगणित उपयोग आहेत. आपल्या अनेक कामात आपण त्याचा वापर करून घेतो. त्याला इंटरनेटची जोड दिल्याने तर गाडी एकदम सुपरफास्ट धावू लागली आहे. पूर्वी एक निरोप देण्यासाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज पडायची. त्या ऐवजी ते काम एका एसएमएस ने होऊ लागले आहे. वेळ खूप वाचू लागला आहे. कंप्यूटर अनेक कार्यालयामधे वापरणे सुरु झाल्याने कामे सुकर झाली आहेत. लाईफ बीकेम ईझियर. मात्र गरजेसाठी ही साधने आहेत हे भान राहत नाही. नीड आणि ग्रीड यातला फरक बर्याच लोकांच्या लक्षात येत नाही. साधन हाताशी आहे म्हणून काहीतरी काम काढणे सुरु झाले आहे.
यामधे आता फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स अशा साईटसची भर पडली. अनेक जण या साइटसचा नियमित वापरही करू लागले. ते करताना आपण त्याच्या अधीन केव्हा झालो हेही अनेकांच्या लक्षात येत नाही. सतत कुणाचा एसएमएस, व्हॉट्स अॅप मेसेज आलाय का चेक करायचे. आपण फेसबुकवर टाकलेल्या पोस्टला दर दोन मिनिटांनी किती लाईक्स आले आहेत, किती कमेंट्स आले आहेत हे चेक करायचे ही अनेकांची सवय बनली आहे. अनेकांना हे आभासी जगच सोयीचे वाटू लागले आहे. इथे आपण खरे कसे आहोत याचा लोकांना पत्ता लागत नाही. कधी कधी नेहमीच्या जगात होत नाही ते कौतुक आपल्या पोस्टवर मिळू शकते. मग माणूस याच जगात रमतो. इथे त्याला सुरक्षित वाटू लागते. वास्तव जगातली प्रत्येक गोष्ट अनुभवत असताना ती फेसबुकवर कशी मांडायची याचा नकळत विचार सुरु असतो.
मनुष्य समोर असला तर आपण विचार करून प्रतिक्रिया देतो पण इथे कुठल्याही पोस्टवर झटकन प्रतिक्रिया देण्याची सवय लागते. यातून माणसे तुटतात, त्यांच्या भावना दुखावतात याचे भान राहत नाही. हीच सवय वास्तविक जीवनात झिरपते.
पेपरही कंप्यूटरवर वाचता येतो. त्यातही मोठमोठे लेख असतात. ते वाचण्याची अनेकांची आवड असते. पण एका बाजूला पेपर, ब्लॉग मधील लेखांचे वाचन सुरु असले तरी फेसबुक, व्हॉट्स अॅप सुरुच असते. एक लेख मनापासून वाचता वाचता फेसबुक, व्हॉट्स अॅप ची नोटीफिकेशन्स खुणावतात. मग लक्ष तिकडे वळते. कंप्यूटर करतो तसेच माणूसही आजकाल मल्टिटास्किंग करू लागला आहे. एकाच वेळी दहा विन्डो ओपन. खरंच याचा फायदा होतो का...
एक काम मन लावून करत असताना दुसरीकडे लक्ष वळते. काही वेळ दुसर्या कामात दिल्यावर पुन्हा पहिल्या कामाकडे आल्यावर ते काम पूर्वीच्या एकाग्रतेने करता येत नाही. लक्ष विचलित व्हायला काही सेकंद पुरतात. पण पुन्हा एकाग्रता साधायला अर्धा तासही जाऊ शकतो.
मोठ्या माणसांचे वैशिष्ट्य हेच असते की ते एका वेळी एका कामावर फोकस करु शकतात. इकडून तिकडे उड्या मारत बसत नाहीत. यालाच कंप्यूटरच्या भाषेत स्विचिंग असे म्हणतात.
यामुळे सतत नवे नोटिफिकेशन काही आले आहे का, नव्या मेल्स, मेसेज आले आहेत का याचा शोध सुरु होतो. आज २ मेल्सनी समाधान झाले तरी उद्या दोन ने होत नाही. उद्या अधिकचा डोस घ्यावा लागतो. परिणाम इतर व्यसनांसारखाच असतो. अशा काही लोकांना व्यसन मुक्ती केंद्रातही दाखल करावे लागले आहे म्हणे.
या सगळ्यामधे मोठे लेख, पुस्तके वाचण्याची सवय हरवून जाते. फार काळ एका जागी मन एकाग्र करणे अशक्य होवून बसते. ज्या लोकांना पूर्वी प्रचंड वाचायची, त्यावर मनन चिन्तन करायची, पुस्तकातल्या गोष्टी विज्युवलाईझ करायची सवय होती त्यांनाही आता मोठे लेख वाचणे संकट वाटते. अगदी छोटीशी चौकट ते वाचू शकतात. कुठल्याही विषयात खोलवर जाण्यास मन धजत नाही. चुकून पुस्तक हाती पडले तरी अकारण सतत मोबाईल तपासावासा वाटतो. आता कंप्यूटरच्या जोडीला मोबाईल आला आहे. तोही बहुतेक सर्व सुविधा देतो. पुन्हा आकार छोटा, वापरायला फार सोपा. त्यामुळे कुठेही बसून कनेक्टेड राहण्याची सोय उपलब्ध झालेली आहे.
म्हणूनच आपली गरज किती हे आपणच ओळखायला शिकले पाहीजे. छान गाडी मिळाली तरी थांबायचे कुठे कळले पाहीजे. अन्यथा अपघात अटळ !