विडंबन स्पर्धा प्रवेशिका - स्वामी संकेतानंद - फजिती

मूळ कविता :- उषःकाल होता होता
कवी :- सुरेश भट

उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही न वाली !

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !

विडंबन :- ओल्ड मंक येता येता

ओल्ड मंक येता येता, ड्राय डेट आली!
अरे पुन्हा ठेक्यांवर त्या फेकवा मशाली!

आम्ही बार खुलण्याचीही वाट का पहावी?
ऐपतीत नव्हते त्याची आस का धरावी?
कशी एक हातातूनी बाटली पळाली!

दोन घोट पिउनी करती ते नवी हुशारी;
ओल्ड मंक म्हणुनी देती डुप्लिकेट सारी!
आम्ही मात्र पाजत असतो आय.बी.च खाली!

तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्कॉच सारे,
आम्हां घरी संत्रीचाही नसे थेंब का रे?
आम्ही ते उपाशी ज्यांना मोह ना मिळाली!

धुमसतात अजुनि नरडीतले हे निखारे!
अजून घोट मागत उठती यकृतात सारे!
बाटलीच थम्सपची ती अम्हाला मिळाली!

-- स्वामी संकेतानंद