विडंबन स्पर्धा प्रवेशिका - नीलमोहर - प्रेम ३

मिपा विडंबन स्पर्धेसाठी अजून एक प्रवेशिका पाठवत आहे, विषय = प्रेम
इथेही अजून नीट फॉर्मॅटिंग कृपया जमल्यास करावे ही विनंती. विडंबनातील काही शब्दांबाबत तेवढी शुअर नाही आहे, त्यावर अजून विचार करत आहे, तरी हे विडंबन शक्य असल्यास थोडे उशिरा प्रकाशित करावे ही विनंती. धन्यवाद.

मूळ रचना: प्रेम कर भिल्लासारखं - कुसुमाग्रज

पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा,

मोरासारखा छाती काढून उभा रहा,
जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा,
सांग तिला,
तुझ्याच मिठीत स्वर्ग आहे सारा...

शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय ?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय ?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत,
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांचा भातुकलीचा खेळ,
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत राहणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं..

प्रेम कर भिल्लासारखं,
बाणावरती खोचलेलं...
मातीमध्ये उगवून सुध्दा,
मेघापर्यंत पोचलेलं.

शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्या सारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं...

विडंबनः प्रेम कर हरणीसारखं

पुरे झाले रमेश सुरेश, पुरे झाला पशा,
पुरे झाले अभ्या जब्या, पुरे झाला किशा,

नागिणीसारखी कात टाकून उभी रहा,
ज्योतीसारखी नजरेस नजर मिळवून पहा,
सांग त्याला,
तुझ्या मनी एक त्यालाच थारा...

खोटी वचनं अन फसवे वायदे करतील काय ?
ईएमायवरती मजनू थ्री बीएचके बांधील काय ?
सावरीच्या कापसासारखी गावभर राहशील भिरभिरत,
जास्तीत जास्त काही आठवडे काढेल बाब्या प्रतीक्षेत,
नंतर तुला ब्रेकपचा मेसेज आल्याशिवाय राहील काय ?

म्हणून म्हणतो, सावर अजूनी जाण्याआधी वेळ,
प्रेम नाही लुटूपुटूचा उंदीर मांजराचा खेळ,
प्रेम म्हणजे शिकारी होऊन छळत राहणं,
प्रेम म्हणजे शिकार होऊन छळले जाणं...

प्रेम कर हरणीसारखं,
कपाळावरती गोंदलेलं...
धन्यापासून सुरू होऊन,
त्याच्यापाशी संपलेलं.

टवाळांच्या त्या भूलथापांना फसू नकोस,
जत्रेतील पिपाणीसारखी पँ पँ वाजू नकोस,
झटकून दे कन्फ्यूजन सारं मनामध्ये साठलेलं,
प्रेम कर हरणीसारखं कपाळावरती गोंदलेलं...