विडंबन स्पर्धा प्रवेशिका - नीलमोहर - फजिती ४

मिपा विडंबन स्पर्धेसाठी ही प्रवेशिका पाठवत आहे,
मूळ रचना, त्यानंतर विडंबन असे लिहीले आहे.
मूळ कविता आणि विडंबनामध्ये बरीच स्पेस हवी आहे, अजून नीट फॉर्मॅटिंग जमल्यास कृपया करावे ही विनंती. धन्यवाद :)

मूळ रचना:
कणा - कुसुमाग्रज

'ओळखलंत का सर मला ?' पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून,
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून.'

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे, सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा !

विडंबनः चणा

'ओळखलंत का अ‍ॅडमिन मला ?’ दारात आला कोणी,
कपडे होते विस्कटलेले, डोळां साचले पाणी.

संकोचून बसला, ओशाळे हसला, बोलला खाली मान घालून,
'मिजासखोरी अंगाशी आली, गेली आयडी घेऊन.'

नागिणीसारखी काळी जिव्हा मिपाभर नाचली,
आयडी न घेता जाईल कशी, अब्रू कशीबशी वाचली.

फजिती उडाली, दणकून हेटाई झाली, आयडीनेही राम म्हटले,
आठवण म्हणून मिपाकरांनी दिलेले शालजोडीतले तेवढे राहिले.

हरलेले मन घेऊन संगे, सर आता सावरतो आहे,
खचलेली हिंमत सांधतो आहे, तुकडे हृदयाचे जोडतो आहे.

चपलेकडे नजर जाताच झटकन दचकून उठला,
'चपला नकोत सर', जरा शर्मिंधेपणा वाटला.

मोडून पडला माज सारा बसलो खात चणा,
आधाराचा हात देऊन फक्त परत ये म्हणा !