हे आणखी एका सुंदर अवीट मराठी गाण्याचे फक्त 'मिपा' (मिसळपाव.कॉम) संदर्भात केलेले विडंबन!
मूळ गाण्याविषयी:
गीत : शांता शेळके
संगीत : राम-लक्ष्मण
स्वर : उषा मंगेशकर , महेंद्र कपूर
चित्रपट : आपली माणसं
जीवनगाणे गातच रहावे
जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !
सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्यामाझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे !
चिमणाबाई हिरमुसली, गाल फुगवुनी का बसली ?
सान बाहुली ही इवली, लटकीलटकी का रुसली ?
रुसलीरुसली, खुदकन हसली, पापे किति घ्यावे !
जीवनगाणे गातच रहावे !
मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला, या प्रीतिला हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे !
तुणतुणे!
आपलेच तुणतुणे वाजवीत रहावे!
गाडले मुद्दे, न विसरावे, पुन्हा पुन्हा उकरावे!
आपलेच तुणतुणे वाजवीत रहावे!
मेगाबायटि प्रतिसादांचा चाळा, व्यापून उरला 'मिपा'ला
धागे हलता वरखाली, चाल मिळे या खेळाला
तुमच्यामाझ्या प्रतिसादामधुनि स्वीकारा व्हावे !
आपलेच तुणतुणे वाजवीत रहावे !
'आयडी'बाई हिरमुसली, डुआयडीमागे लपुनी का बसली?
काळतोंडी आयडी ही नवली, लटकी लटकी का रुसली?
रुसली रुसली, तरी परतली, चावे किती घ्यावे !
आपलेच तुणतुणे वाजवीत रहावे !
धाग्यामधुनि अंकुरली लावालावीची 'काडी'कळी
रागाने फुरफुरली कधी फुसकुली तिची झाली
या काडीला, या कळीला प्रतिउत्तर त्वरे सांगावे!
आपलेच तुणतुणे वाजवीत रहावे !