(या कंसांमधले शब्द केवळ वर्णनासाठी आहेत, आणि ते प्रत्यक्ष एंट्रीमध्ये येऊ नयेत अशी इच्छा आहे. या विडंबनात माध्यमं कशी वेश्येप्रमाणे वागतात याचं चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृष्णाने लपवलेल्या चोळी-लुगड्यांनी हैराण होणाऱ्या गौळणी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपली चोळी लुगडी भिरकावून देऊन जो बघेल त्याच्यासाठी, ज्याला हवं त्याच्याशी जुगणाऱ्या मीडियाचं चित्रण दुसऱ्या बाजूला करून विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न आहे. तसंच मूळ गाण्यातले काही शब्द लता मंगेशकरने म्हटलेले आणि काही शब्द कोरसमध्ये आहेत त्यामुळे ते वेगळे दाखवण्यासाठी इटालिक्स वापरले आहेत. ते तसेच राहू द्यावे ही विनंती.)
मीडिया बटकिणी
अहो ऐका चतुर राज्कार्नाची कहाणी
किस्नाने भुलविल्या जेनयुवर बटकिणी
ऐन दुपारी मीडिया बटकी आल्या जेनयुवरी
खुशाल सोडून दिले जनांवर व्हिडियोंची डॉक्टरी
लज्जा सुटली अलगद पडली ट्यार्पीच्या पदरी
'देशद्रोही गळात धरला' उठली ललकारी
मीडिया बोंबलण्यात दंग
धरला मग सखा श्रीरंग
कोर्टाबाहेर गर्दी जमुनी
मारला त्याला काळ्याडगल्यांनी
बटकीण दावी नितळ क्लिव्हेजी, खोल अन् उघडी
घे रे कान्हा चोळी लुगडी
पूर्वीपासुनी अशीच माझी
विक्रीसाठी काया माझी
सवंग चर्चा, कर्कश भाषा, अर्णबी बडबडी
घे रे कान्हा चोळी लुगडी
फक्त ट्यार्पीची मी भूकेली
निर्लज्जा अन् देहलिलावी
जो देइल मज प्रेक्षकडोळे, त्याची मी जुगडी
घे रे कान्हा चोळी लुगडी
काल तुला मी काळे केले
कृष्णा तुज ते पालिश झाले
झळाळ उठली काया तुझिही, चमके अन् छबडी
घे रे कान्हा चोळी लुगडी
तुला कवळता मिटले सारे
इतरजनांसम तूही यार रे
झालेगेले विसरुन सारे, मिठित मज पकडी
घे रे कान्हा चोळी लुगडी
मूळ गाणं
अहो ऐका चतुर अध्यात्माची कहाणी
किस्नाने भुलविल्या यमुनेवर गौळणी
ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी
वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी
ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिर्शिरी
गोपी न्हाण्यात होत्या दंग
तोच आला सखा श्रीरंग
गोळा करुन वस्त्रं सारी
बसला चढून कळंबावरी
नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी
दे रे कान्हा, चोळी अन् लुगडी
बालपणीची अल्लड नाती
मला कवळिले तू एकांती
अजून का तुज त्या खेळाच्या, छंदाची आवडी ?
ऐन वयाची किमया सारी
लाजवंति मी भोळि बावरी
कशि येऊ मी काठावरती मदनाची लालडी ?
तूच दिली ही यौवनकांती
कशी लोचने आतुर होती
देहाहुन ही मुक्त भावना शरणागत बापुडी !
हात जोडिता बंधन तुटले
अता जीवाला मीपण कुठले ?
आत्म्याने जणु परमात्म्याला अर्पण केली कुडी !
कवी - जगदीश खेबुडकर
सिनेमा - पिंजरा