गोठान (वर्‍हाडी) (मराठी भाषा दिन २०१६)

माया गावाचं गोठानं
हाये किती शानदारं
मोठ्ठं झाळं पिपयाचं
त्याची सावली भर्दारं

माया गावाचं गोठानं
थंड हवेचं ठिकानं
ढोरं, मान्सं उनायातं
झोपं घेतातं सुखानं

माया गावाचं गोठानं
हौदं भरला पान्यानं
ढोरं, वासरं पेतातं
पानी मोकाट मनानं

माया गावाचं गोठानं
काई लोकाचं मायेरं
ऊभा दिवसं तथीसा
सारे हायेतं तयारं

उनं चित्याले कोनाचं
नाई दुसरं ठिकानं
मनं मोकयं पनानं
माया गावाचं गोठानं

खोळ्या कर्याले कोनाच्या
नाई दुसरं ठिकानं
चिट्या चिकोर्या कर्याले
माया गावाचं गोठानं

तंटे भांडन कर्याले
नाई दुसरं ठिकानं
मायं बहिनं काळ्याले
माया गावाचं गोठानं

माया गावाचं गोठान
आक्क्या बनलं मोकाटं
सज्जनाईले ते आता
नाई टोचू देतं नाथं