चिच्च्या वीस रुपियानी बे सांडश्या करीन राख. गिर्हाईक दुपारी आवशे.
सुक्कीने मुलाला साम्गितले.
हमणा तर जाळ पेटाड्यो. ईमा तु हवा मार. मग रुडो जाळ थशे. एकदा जाळ पेट्यो की मग लोखंड टाक. उप्परती जोरमा मार. नीट धर रे. सांडश्यो आगळथी चप्पटी पायजे. लोकोन हातमा सांडश्यो धरवा गोल करजे.
चिच्च्या ने जाण पेटवला. सुक्की भाता हलवून कोळसे फुलवू लागली.
ए सुक्क्ये . तीन चोरीली सळ्ळी क्या राखी सं? काले हितं हती सळ्ळी कुठे गयी?
नीट जो की रे..... तारा मागेच पडी सं. डोळा फुट्या का रे तारा? का सवारे सवारे भाड झोकीने आयो? नीट काम कर आन पैसो मळाव. घरमा धान लाव आन पसं जे करवु व्हय ते कर.
धान विकात लावु पडंसं...... हामज्यू का रं.
सुक्कीनं पोराला उगाचच दम भरला. पोरगा सळी आगीवर तापवू लागला. चांगली लालभडक तापल्यावर त्यानं सळई बाहेर काढली आणि चिमट्यात धरून लाल सळईवर घणाचे घाव घालू लागला.
आ जो गं नीट आकार आयो का? वीस रुपयानं बे सांडश्यो.... आटला कमी पैशामा बापनी दारू आवसे फकत. ए बी नौटाक. बार दारु पिशे आन आमे उपाशी बेसशु. व्हय ना? मन नाय करवू आवु काम? दिवसभर काम आन रीकामी शाम.... सगळू आवूच स.
चिच्च्या खरु बोलंस मा.चिच्च्याची बहीण "लकसुमी" म्हणाली. तीही बिचारी दिवसभर भात्याची काठी हलवून वैतागली होती.
तीच्या बरोबरीच्या मुली शाळेत तरी जायच्या नाहीतर खाउ तरी खायच्या.
मी कै करू? आपण घिसाडी लोखंडनु काम करवा हितं आया. बीजू कायीच जमतु नाय. शिकवानू आपणु काम नय. तनं शाळामा जावूसं? शिकवा माटे पैसा लागसं. रडी नखं ( नको) लकसुमी. काले मी घणी सळ्ळी चोरीन लावस . मग सळ्ळीनं ठोकीन सांडश्या बनाव बजारमा विकीन पैसा लाव . मगच शाळमा जावानु.
वीस रुपयात दोन सांडश्या विकून कितीसा पैसा मिळणार होता. पण पैसा मिळेल आणि आपल्याला शाळेत जायला मिळेल या विचाराने लकसुमी आनंदली. तिच्या डोळ्यात पुस्तकं वाचायचे स्वप्न मावत नव्हते.
हो रे भई तू घडी सांडश्या बनव , कोयता बनव. मी सगळी सांडश्या आन कोयता विकीस गामना बजारमा. आन घणा पैशा लाईस. मग पुसतक वाचवा शाळामा जाईस.
लकसुमीचे डोळे आनंदले ती जोरजोरात भाता मारू लागली.
घिसाड्याचे पाल हलू लागले. भाता हवा फुंकु लागला .विस्तवावर सळई तापू लागली. जळत्या विस्तवासोबत लकसुमीची स्वप्ने सुद्धा जळू लागली.