
body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/…");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round ;
}
शुभास्ते पंथानः संतु!
बरोब्बर एक वर्षापूर्वी याच दिवशी, म्हणजे ८ मार्चला अनाहिताचा पहिला विशेषांक प्रकाशित झाला. देशोदेशीच्या अनाहिता कधी अंक दिसतोय याची वाट बघत होत्या. प्रत्येकीलाच उत्सुकता होती की गेले ३-४ महिने ज्या अंकाबद्दल चर्चा होत आहेत तो अंक प्रत्यक्षात कसा असेल? कुणी काय लिहिलं असेल? वाचकांना आवडेल का? असे अनेक प्रश्न. अखेर मुखपृष्ठ दिसू लागले, एकेक लेख दिसू लागले आणि मूर्त स्वरुपात पहिला अंक प्रकाशित झाला. विविध विषयांवर लेख, कविता यातून वाचक म्हणून अनेकांना आनंद मिळालाच, पण या सगळ्यासोबत त्यापेक्षाही महत्वाचा होता तो या अंकाने दिलेला आत्मविश्वास! सर्वजणी आयुष्यभर जतन करतील असा तो अनमोल क्षण होता. या अंकानंतर आता पुढचा अंकही इतकाच प्रभावी व्हायला हवा यातून पुन्हा काही महिन्यातच चर्चा सुरू झाल्या. विशिष्ट विषय घेऊन काहीतरी करायला हवे यातून रुची अंकाची निर्मिती झाली आणि पुन्हा एक वैविध्यपूर्ण अंक 'जागतिक अन्न दिवसा'च्या निमित्ताने प्रकाशित झाला. केवळ मिसळपावच नाही, तर इतरत्रही या अंकाचे कौतुक झाले आणि मग तेवढ्याच उत्साहाने अनाहिता सज्ज झाल्या वाचकांना 'अनाहिता' च्या पुढच्या विशेषांकाची सहल घडवायला! यावर्षीच्या जागतिक महिला दिनी तुमच्यासमोर अत्यंत आनंदाने सादर करत आहोत हा 'भटकंती विशेषांक'!
अगदी सुरूवातीच्या काळात जागोजागी भटकणारा मनुष्य पुढे स्थिरावला खरा, पण अनेक कारणांसाठी भटकंती हा प्रत्येकाच्या जीवनात आजही तेवढाच अविभाज्य घटक आहे, किंबहुना अनेक कारणांनी त्यात भर पडली आहे. हे सहलीचे अनुभव इतरांसोबत शेअर करणे हाही त्यातलाच एक भाग! पुलंपासून ते मीना प्रभुंपर्यंत दिग्गज लेखक-लेखिकांनी वाचकांना त्यांच्या प्रवासवर्णनातून सातासमुद्रापार फिरवून आणले. गेल्या काही वर्षात आंतरजालामुळे विविध ब्लॉग्स, लेख यामार्फत आपल्याला बसल्या जागेवर अनेकविध स्थळांचे दर्शन घडले. नवीन ठिकाणी जाताना माहिती शोधणे सोपे झाले. यातूनच विचारमंथन घडू लागले भटकंती विशेषांकाचे! कोण काय लिहिणार, काय असायला हवे यावर गप्पा रंगू लागल्या,चर्चा होऊ लागल्या. 'प्रवासवर्णन' हेच फक्त भटकंतीचे एकमेव स्वरुप नाही, हे लक्षात घेऊन भटकंती या विषयाशी निगडीत विविध पैलुंवर विचार केला गेला.
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार।
शास्त्रग्रंथविलोकेन मनुजा चातुर्य येतसे फार॥
अशा मनुजा फार चातुर्य येणार्या देशाटनात येणारे वेगवेगळे अनुभव, प्रवासासाठी करावी लागणारी तयारी, प्रवासात घ्यावी लागणारी काळजी, औषधे, साहसी सफरी अशा अनेक विषयांना स्पर्श करणारा हा अंक असावा या दृष्टीने अनाहितांनी आवडीप्रमाणे, त्यांच्या अनुभवांवर लिहायला सुरूवात केली. घर, मूल, करीअर या सर्वात गुरफटलेल्या असताना, अनेक जबबदार्या खांद्यावर झेलत असलेल्या या सगळ्या जणी अंकासाठी म्हणून विशेष वेळ काढून लिहित्या झाल्या आणि हेच विविध अनुभव एकत्रितपणे गुंफणारा हा अनाहिता भटकंती विशेषांक आज प्रत्यक्षात तुमच्यासमोर आहे.
तर काय काय आहे या अंकात? या सहलीत जंगलसफारी आहे आणि आनंदाने नाचणारा मनमोरही आहे. सरप्राइज सहलीची वेगळीच कल्पना, प्रवासात येणारे बरेवाईट अनुभव आहेत आणि अगदी ज्याला मनमुराद भटकंती म्हणता येईल असे ट्रेक्स, पायवाटा धुंडाळत जाणारे ट्रेल्स, ऐतिहासिक ठिकाणांची वर्णने, खेळवेड्यांसाठीची एक वेगळीच भटकंती आहे. आपल्या मातीतली रॉयल राजस्थानची सफर आणि अनवट अशा खेड्याची ओळख आहे. ग्रीसमधील शांत समुद्रातली सफर आहे, ग्वाटेमाला, ग्रोसग्लोकनर हाय अल्पाइनरोड सारख्या अनवट ठिकाणांची ओळख आहे आणि परदेशातल्या घरांमधलं आनंददायी वास्तव्यही आहे. प्रवासाला निघताना काय काळजी घ्याल? कोणती औषधे बरोबर ठेवाल ह्याचबरोबर अनेक ट्रॅव्हल टिप्सही आहेत. प्रवासात कंटाळा आला किंवा जरा विसावू या वळणावर..असे वाटले तर चित्रकोडे आहे आणि रंगवायला मंडलाचित्रंही आहेत. सातही खंडात पर्यटन केलेली आसावरी आणि पाच खंड कामा निमित्त फिरलेली विकी अशा काही मिसळपाव बाहेरच्या मैत्रिणीही आपल्याला गप्पांमधून भेटणार आहेत. प्रवासात भेटणारी माणसं कधी कधी जीवाचे मैत्रं कसे होतात हे सुध्दा खेड्यामधल्या कौलारु घरात उलगडले आहे आणि शेवटी परत जाताना आठवणींच्या खजिन्याबरोबरच स्मरणवस्तूंचा खजिनाही आहे. भटकंती म्हणजे छायाचित्रे हवीच, आणि प्रत्येक लेख अशा उत्तमोत्तम छायाचित्रांनी नटलेला आहे. शिवाय या अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल असा अजून एक मुद्दा असा की, फक्त विविध प्रकारचे लेख हा एकमेव केंद्रबिंदू न ठेवता त्यासोबतीने चित्र, ओरिगामी, क्रोशा अशा विविध कलांचे भटकंतीशी निगडीत स्वरुप देखील या संपूर्ण अंकात बघायला मिळेल आणि हे सगळं आहे 'मेड बाय अनाहिता'!! थोडक्यात एकाच ठिकाणी बसून या अंकाच्या निमित्ताने आपण आसेतुहिमाचल आणि विदेशातही शब्दरुपी, चित्ररुपी सफर करणार आहोत. अगदी सगळ्या खंडातून जगभर मनमुराद भटकंती करणार आहोत.
हा अंक तयार होऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात लागले आहेत. आसावरी, मुग्धा आणि विकी ह्या तिघींनी अनाहिता नसूनही, या अंकाबद्दल समजल्यावर त्यांचे अनुभव इथे मांडायला तयारी दाखवली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद! नीलकांत आणि प्रशांतने बंदिस्त दालन वेळेत खुले करून दिल्यामुळे तेथे काम करणे सुकर झाले. किलमाऊस्कीने सुरेख मुखपृष्ठ तर तयार केलेच, शिवाय वेगवेगळ्या कल्पनाही वेळोवेळी सांगितल्या. अंकाचे टीझरही तिनेच तयार केले आणि मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत अंकाची सजावटही केली. तिचे आभार मानून तिला परकं करत नाही पण कौतुक नक्कीच करतो. आवर्जून लेख देणार्या अनाहिता आणि पडद्यामागे राहून मदत करणार्या, प्रोत्साहन देणार्या सर्वच अनाहिता, या सगळ्या जणी अंकाच्या खर्या शिलेदार कारण त्यांच्याशिवाय हा अंक पूर्ण झाला नसता. त्यामुळे ह्या अंकाच्या निर्मितीसाठी ज्यांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य लाभले त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
चला तर मग, भटकंती अंकात फेरफटका मारून या. मुखपृष्ठावरचा इमिग्रेशन स्टॅम्प तुम्ही पाहिला असेलच, ही या सहलीची सुरूवात, त्यापुढील प्रत्येक स्थळवर्णन, अनुभव तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. आम्ही तुमच्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत आहोत. हा अंक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य सांगा, ह्यात अजून काय आवडले असते यासाठी तुमच्या सुचवण्याही सांगा. अनाहिताच्या प्रत्येक नवीन अंकाच्या निमित्ताने नवीन अनाहिता लिहित्या होतील आणि हे अंक प्रत्येक वेळी नवीन विषय घेऊन वाचकांना आनंद देतील याची आम्हाला खात्री आहे.
तेव्हा निघूयात 'अनाहिता ट्रॅव्हल कंपनी' तर्फे आयोजित या महिला दिन विशेष सहलीला...
आपला प्रवास सुखाचा होवो!! हॅप्पी जर्नी! बॉन व्हॉयेज!!
- स्वाती दिनेश, मधुरा देशपांडे
"मिसळपावच्या बाहेर असणार्या तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे फेसबुक पेज-अनाहिता भटकंती विशेषांक
चित्र : किलमाऊस्की
© या अंकातील लेखांचे सर्व हक्क संबंधित लेखिकेच्या स्वाधीन. या अंकातील कुठलाही भाग/चित्रे, कुठल्याही स्वरुपात पूर्वपरवानगीशिवाय वापरता येणार नाही.
