गजाल खरी काय? (बाणकोटी) (मराठी भाषा दिन २०१६)

गजाल खरी काय?'
कोकणी माणसाचा आवडता स्वभाव म्हणजे गप्पा छाटत बसणे. त्यात कोणी पळून वैगरे गेलं असेल तर मग काय सांगता! अशाच पळून गेलेल्या गुरवाच्या मुलीबद्दल गावातल्या घरात जी काही चर्चा रंगते त्याची थोडीशी झलक. चर्चा इतकी रंगते की मूळ कथानक अजूनही सुरु व्हायचंच आहे.
बरेच दिवस, खरंतर बरीच वर्ष ही भाषा कानावर न पडल्याने लिखाणात लहेजा तितकासा नीट उचलता आलेला नाहीये.
=======
''रं म्हाद्या… "
"ऊंssssssss"
"हाईस कुटं? कालपासना कुटं पायरव नाय तां?"
"कुटं मंजे? आमान्ला कामा हायत, तुमच्यासारं गावभर छकन्या मारीत फिराय येल नाय.. "
"तं !! आला मोटा कामा करनारा…. ता जाव दे, बातमी समाजली काय?"
"कंची ?"
"कंची? आरं गावातच -हाताईव ना? हिकडं सगला गाव ताच बोलतोय नि तुमान्ला म्हायत नाय ?"
"आता नाय म्हायत…. सांगताय्स? का जाव ?"
"ताच ता, ती गुरवाची पोर? ती पलून गेली !!"
"अरे कर्मा !!"
"तं… !! सांगताय काय मी !! "

"तरीच सकाल-सकाल गुरवाच्या घरातना कंदाल आयकू येयीत व्हती. मना वाटला ह्यांची रोजचीच नाटका आसतील. गुरवाची बायको, मेली, वस्साडी तशीव सासवंला डोल्याफ़ुडं धरीत नाय. मना वाटला दोगींचा रोजचाच काय चालला आसंल."

"रोजचा त्यांचा नाय, गुरवीनीच्या प्वोरीचा चालल्याला. काय म्येली फ़्याशनी करं !! म्हयन्या दीड म्हयन्यापासना रोज फ़ाटं फ़ाटं देवलाफ़ुडल्या बावीवं पानी आनाय जायाची. गो बाय जाव नुको, पानी व्हंड हाय म्हनंस्तवर बाय हांडं कलश्या घेऊन पसार…. ! कार्टी येयाची ती दीड दोन तासान. आयशीला काय, तेवडाच बरा… येक काम कमी व्हयीत व्हता. . सासवंन येक-दोन येलं गुरवीनीला सांगून बगतलान.. पर गुरवीन कशी ती म्हायत हाय ना? सासवंन सांगतल्याला आईकलान तं कान झडतील नाय तिजं? नि आयता मिलताय तं सोडील कशाला? येकदम कंडम बाई !! उंद्या न्हव-याला न्हेयाला यम आला तं जल्ली यमासंगाती कवड्या खेलीत बसंल. आशी आईस म्हनल्याव काय पोरीला रानंच मोकला मिल्ला. तं झाला काय !! गुरवीनीच्या भयनीच्या पोरीचा हाय फुडल्या म्हयन्यात लगीन!!"

"काय सांगतास? आमच्या पोरांसंगाती खेलाय येयाची, ही अशी नकावडी पोर…लगीन पन ठरला!!"

"ता -हाव दे, काय सांगताय ता आईक. तं ही गुरवीन म्हनली वायच काय बाय करु. कंदी नाय ती सासवंला हाताशी घ्येतलान, सासू सुना लाडू बांदीत बसलंल्या. रव्याचं लाडू काय जमताईत काय! उब्या जिंदगीत गुरवीनीन असला काय केलंला नाय. सासवंला आयता कारन मिल्ला सुनंला अद्दल घडवाय. सासू जरा लकाटतो सांगून ग्येली ती झोपली…. मंग हिनं ल्येकीला सांगतलान…बाय जरा सामनी जा नि कदमीनीला आवाज देस… "

"मंग ? म्होरं काय झाला? तिकडच्या तिकडं पलाली का काय?"

"च्च, मांगारी आली, आयशीला म्हनं, काकूस जेवाय बसली. ज्येवान झाला का मंग येयील. गुरवीन वाट बगत बसली ती तितच वायच लकाटली, तं तिचा लागला डोला!! मेली निजते पन अशी कुंभकरनासारी का ढोल वाजावलं तरी उटायची नाय. तं ही अशी आत लकाटल्याली. तेवड्यात झाला काय, दावनीला बांदल्याला रेडकू सुटला नि आला माजघरात. त्या लाडवाच्या टोपात घातलान तोंड!! सगला टोप खाली केलान तरी बायला सूद नाय"

"गुरवीनीच्या पोरीचा काय झाला?"

"ताच सांगताय… आईक !… "
-------
मूळ कथानक अजूनही सुरु व्हायचंच आहे!!