
body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/…");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round ;
}
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात सगळ्यात रंगीला, लोभसवाणा वाटणारा प्रदेश म्हणजे राजस्थान. रखरखीत उन आणि ओसाड वाळवंटात काहीसे भडक रंगीबेरंगी पोषाख, भव्य राजवाडे, प्रचंड मोठे किल्ले, गोष्टीतल्या राजा राणीचे नकळत मनाला तिथे जाणवणारे अस्तित्व, सजवलेले उंट, उत्सव, लोककला, नृत्य सगळेच मनोहारी!
यात पर्यट़कांचे खास आकर्षण असते ते म्हणजे तिथले भव्य राजवाडे. रजपूत कलाकुसरीने सजलेले हे राजवाडे अजूनही सुस्थितीत आहेत हे विशेष! पर्यटकांसाठी खुल्या असणार्या या राजवाड्यांची नीट जपणूक केली गेली आहे शासनाकडून हे सुदैवच. शूर राजपुती राजांच्या नंतरच्या पिढ्यांनी विरोधकांचे सामर्थ्य बघून अस्तित्वासाठी त्यांच्याशी जुळवुन घेतले. आधी मुघल आणि नंतर इंग्रजी राजवटीशी जुळवून घेतल्याने एकूणच त्यांचे नुकसान कमी झाले. वास्तुंची नासधूस न होता ठिकठाक राहिल्या. पुढेही स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या विलिनीकरणामुळे या राजवाड्यांचा देखभालीचा खर्च अशक्य होउन बसला. मग काही भाग स्वत:कडे ठेवून बाकी पर्यटकांसाठी बघायला मोकळा केला. हेच राजवाडे बघायची प्रचंड उत्सुकता होती.
उदयपूरमधील सिटी पॅलेस, चित्तोडगड बघुन आता आमची गाडी जयपूरकडे निघाली. जयपूर, गुलाबी शहर! पाहण्याची उत्सुकता असतानाच लक्षात आले की आता हे शहर गुलाबी न रहाता विविधरंगी झालंय. त्यादिवशी पोहोचेपर्यंत उशीर झाल्याने राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घेण्यासाठी चोखिधाणीला मंडळ जाउन आले.
दुसर्या दिवशी जयपूर शहरदर्शनाचा कार्यक्रम आखण्यात आला होता. हाताशी वेळ कमी असल्याने त्या एका दिवसातच सगळी ठिकाणं, खरेदी आटोपायची होती. भराभर आवरुन कुटुंब गाडीत बसलही वेळेत. पहिले ठिकाण होते ते जयपूर पासून ११ किमी. लांब असलेला प्रसिद्ध अमेर फोर्ट अर्थात अंबर किल्ला. (तोच तो जगप्रसिद्ध सिनेमा बाजीराव मस्तानी मध्ये बुंदेलखंडचा म्हणून दाखवलेला किल्ला)

(जालावरून साभार - http://theholidayshoppe.in)
वाटेत जाताना एक फोटो स्टॉप प्रसिद्ध हवामहलसाठी झालाच. जसा फोटोत आधी पाहिला होता तितकाच देखणा प्रत्यक्षातही दिसत होता. महालाचे सौंदर्य असलेल्या अप्रतिम कलाकुसरीच्या खिडक्या अत्यंत मोहक. रस्त्यावरच्या मिरवणुका राणीवशाला सहज पाहता याव्यात म्हणुन असलेल्या अनेक जाळीदार कोरीव खिडक्या महालाचे सौंदर्य व्दिगुणित करतात. आणि या खिड्क्यांमुळे हवाही खेळती राहते.

हा शहराचा जुना भाग असल्याने इथे मात्र गुलाबी लालसर इमारती दिसत होत्या. फोटो काढून गाडीत बसल्यावरही बराच वेळ त्याचे दर्शन होत राहिले. कारण आख्खे जयपूर रस्त्यावर उतरल्यासारखे दिसत होते. एकुणच हॉर्न वाजवण्याची स्पर्धा, गोंगाट यामुळे गाडीतील जनता आता चुळबुळ करू लागली. मग ड्रायव्हर महाशयांनी, 'यहां तो ऐसा होता है, दुसरे रास्तेसे जाते तो जरा कम ट्रॅफिक होती' अशी मौलिक माहिती दिली. मग बाबारे इकडून आणलंसंच का? तर म्हणे 'सोचा आपको सहर घुमाए.' नशीबाने थोड्यावेळात रस्ता थोडा मोकळा झाला आणि गाडी थेट किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचली.
किल्ला बराच उंचीवर असल्याने त्याची भव्यता नजरेस भरत होती. गाडीने वरपर्यंत जाता येते पण हत्तीवर बसुन राजेशाही थाटात जायचे असल्यास खालीच पैसे भरून जावे लागते. पण मी म्हणणारे उन, हत्तीच्या संथ गतीमुळे लागणारा वेळ, शिवाय हत्ती किती वजन पेलु शकेल असा नवर्याने मला विचारलेला कुत्सित प्रश्न दुर्लक्षून गाडीनेच वर जायचा निर्णय अस्मादिकांनी घेतला. लाल झूल घातलेले रांगेत डुलत जाणारे हत्ती दिसत मात्र छान होते. बहुतांशी परदेशी पर्यटकच रांगेत अन हत्तीवर दिसले. त्यांच्या चेहर्यावरही महाराजा असल्याचा भाव दिसत होता.
आता त्या हत्तींना आणि गाड्या जायला वेगवेगळे रस्ते असल्याने आम्ही त्या महाराजांपेक्षा फारच चटकन गड सर केला. किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार नजरेस पडले. सूर्याकडे तोंड करून असल्याने याचे नाव सुरजपोल आहे. हे प्रवेशद्वार ओल्यांडल्यावर मोठ्या पटांगणासारखा दिसणारा "जलेब चौक" लागला. गडाचे एकूण चार भाग आणि चार द्वारं आहेत पैकी हा पहिला भाग म्हणजे सैनिकांनी एकत्र येण्याची जागा. आता हत्ती दुसर्या दाराने इथे येताना दिसत होते.

जयपूरमधील प्रमुख आकर्षण असलेला हा किल्ला मुघल आणि रजपुत स्थापत्यकलेचा सुंदर मिलाप आहे. अकबर बादशहाच्या नवरत्नांमधे जागा मिळवलेला राजा मानसिंग (पहिला) याने हा किल्ला २१ डिसेंबर १५५० मधे बांधायला सुरूवात केली. अकबराची रजपुत राणी जोधाबाई हिचा हा भाऊ. पांढर्या आणि लाल पत्थरांनी बांधलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५९२ मधे पूर्ण झाले. जलेब चौकातून पुढचा भाग पहायला वेगळे प्रवेशद्वार आहे. मोघली पद्धतीचे बांधकाम, अप्रतिम कलाकुसर, रंगीत चित्रं असलेल्या या गेटवर गणपतीचे चित्र असल्याने हा गणेश पोल या नावाने ओळखला जातो. राजाच्या स्वागतासाठी हे विशेष द्वार. वरच्या जाळीदार खिडक्यांतून राण्या फुलांचा वर्षाव करीत.

(जालावरून साभार - Reference - https://upload.wikimedia.org/wikipedia)
यात प्रवेश केल्यावर लागला तो दिवान-ए-आम. कोरीव खांबांवर असलेला हा भाग तीन बाजूंनी मोकळाच ठेवलाय.

(जालावरून साभार - http://amberfort.org/wp-content)
त्याला लागून असलेल्या दैनंदिन कामकाजाच्या कचेर्या देखील सुंदर आहेत.
त्यानंतर लागतो तो दिवान-ए-खास. सुरेख मोझाइक टाइलने सजवलेला हा भाग खास पाहुण्यांसाठी असे. राजेसरकार खास पाहुण्यांना इथे भेटत असत..

(जालावरून साभार - http://www.pinkcity.com)
या दिवान-ए-खासच्या समोर असलेला भाग म्हणजे "सुखनिवास". चंदनी दार आणि खेळत्या हवेसाठी विशेष योजना असलेल्या या भागात राजा आपल्या आवडत्या राण्यांबरोबर सुखाचा वेळ व्यतीत करायचा. किल्ल्याचा पुढचा आतील भाग हा किल्ल्याची खरी शान आहे. सगळ्यात सुंदर आणि प्रसिद्ध भाग आरसे महाल अर्थात "शिशामहल". तिथल्या आरशांनी केलेली छ्तं आणि भिंतीवरील डिझाइन्स डोळ्यांचे पारणे फेडतात. आजही तो भाग तितकाच झगमगता आहे. गाईडने तत्परतेने तिथली जादू दाखवली. एक काडी पेटवताच अवतीभवतीच्या आरशात हजारो प्रतिबिंब पडून चांदण्या चमकण्याचा भास निर्माण झाला. निव्वळ अप्रतिम! परदानशीन राणीला मो़कळ्या आकाशातील चांदण्याचा आभास निर्माण करण्याची ही खास सोय भलतीच सुंदर. फुलांना वेगवेगळ्या किटकांचा आकार बेमालुमपणे देऊन कलाकुसरीची वैशिष्ठ्यपूर्ण आकर्षक रचना केली आहे.

या महालासमोरची हिरवीगार बाग अजुनही टवट्वीत आहे. ही आराम बाग नावाने ओळखली जाते. छान गारवा जाणवत होता तिथे. उन्हाळ्यात खरंच आराम वाटत असेल तिथे.
तशीच एक चांदणीच्या आकार असलेली बाग किल्ल्याच्या मागे असलेल्या माओटा तलावात दिसते. राजाने काबुल युद्धाहुन परतताना केशर लागवडीसाठी बिया आणल्या होत्या. त्या लावायला ही बाग.

किल्ल्यावर राण्यांसाठी बसायला एक खास जागाही आहे. राजाच्या अनेक राण्यांमधे संवाद व्हावा यासाठी नाव मात्र चुगली खाना.
या शिवाय अनेक सुंदर कलाकुसरीची पेंटिंग्ज, चित्रं लक्ष वेधून घेतात. सगळं रंगकाम भाज्यांपासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरून केलं आहे हे विशेष. आता सगळा किल्ला बघून झाला होता. मुख्य म्हणजे मुलांनाही आवडला. निघावे लागणार होते. २-३ तास फिरून अप्रतिम कलाकारी, कोरीवकाम बघितले तरी समाधान होईना. मनात किल्ल्याचे जे भव्य स्वरूप कल्पित केले होते त्यापेक्षा बराच मोठा, सुंदर आणि सुस्थितीतला किल्ला पहायला मिळाला. युनेस्कोने हा किल्ला जागतिक वारसा म्हणून घोषित केला आहे..

सगळा किल्ला बघून परत बाहेर आलो. आता अजून गर्दी जमली होती. शाळांच्या सहली आलेल्या दिसत होत्या. ती मुलं मोठ्या आनंदात रांगेत उभी होती. आता किल्ला निवांत बघणं अवघड झालं असतं. त्याआधी बाहेर पडलो ते बरं झालं.
मुघलांचा अंकित असलेल्या व त्याच्या नवरत्नात स्थान मिळवलेल्या मानसिंग राजाचा इतिहास कितपत आदर्श असेल माहित नाही. (स्वाभिमानी राणा प्रतापसिंगशी हल्दि घाटीचे युद्धात हाच राजा अकबराचा सेनापती होता) मात्र त्याने बांधलेला हा किल्ला भव्य, उत्कृष्ट कारागिरीचा नमुना म्हणून बघायलाच हवा!

(जालावरून साभार - Reference - http://www.travel2india.com/monthly_newsletters)
Note: Some photos are from Internet and the purpose is only for Reference. We sincerely thank the sources mentioned above for these photos.
(चित्र- किलमाऊस्की)
