विज्ञान लेखमाला समारोप

नमस्कार मंडळी,

शशक आणि श्री गणेश लेखमालेनंतर आलेली विज्ञान लेखमाला देखील मिपा वरच्या सिद्धहस्त लेखकांनी आणि उत्साही वाचकांनी यशस्वी केली. बघता बघता विज्ञान लेखमालेचा शेवटचा लेख देखील काल प्रकाशित झाला. आलेले लेख निवडताना आणि प्रकाशित करताना लेखकांच्या आणि विषयाच्या निवडीवर आमचा विश्वास तुमच्या प्रतिसादांनी सार्थ ठरवला.

तसं म्हणलं तर विज्ञान हा एक किचकट , बोजड आणि अनेकदा सर्वसामान्यांच्या कक्षेपलिकडील विषय. राजकारण आणि खेळ-जगता इतक्या; या दुनियेतील घडामोडी, बातम्या नेहमीच लोकांपर्यंत पोहोचतातच असं नाही. या दुनियेत घडणारा प्रवास, लागणारे शोध यांची आपली एक गती असते. लांबुन बघणार्‍या निरिक्षकाला त्या हत्तीची कधी शेपटी कधी सोंड तेवढी अधुन मधुन दिसणार. पण या लेखमालेच्या निमित्ताने अनेक लेखकांनी वेळ काढुन अतिशय अभ्यासपूर्ण लेख सादर केले. त्यांची विषयाची निवड , त्यातला सखोल अभ्यास, जिज्ञासू नजर यांनी तो हत्ती आपल्यासमोर साकार केला. कक्षेपलिकडचं हे विज्ञान आज आपल्या दैनंदिन जीवनाच एक अत्यावश्यक भाग आहे. येता जाता वापरात असणारं उद्वाहन (लिफ्ट) असो किंवा गुन्हे अन्वेषण विभागातलं डिजिटल फोरेन्सिक असो किंवा सरहद्दीवर आपल्या साठी ठाकलेल्या सक्षम सेनेची शक्ती असो .. अनेक रुपानी, अनेकविध अंगांनी हा विज्ञान बटु आपलं विश्व व्यापुन दशांगुळं उरला आहे. या सर्वच विषयांवर आणि कल्पनाही नव्हती अशा प्राण्यांचं वागणुक शास्त्र, स्पायडर गोट, पाण्याचे संवर्धन अशा पैलुंवर देखील या लेखकांनी प्रकाश टाकला.
एक बोजड , किचकट ठरु शकणारा साहित्य प्रकार अतिशय रंजक रित्या आपल्यासमोर सादर केला गेला. या लेखकांचे आभार न मानता त्यांच्या ऋणात च आम्ही राहु इच्छितो.

आवाहनाचा धागा आल्यापासून मिपाकरांनी नेहमीप्रमाणेच खुल्या मनाने दाद आणि प्रोत्साहन देऊन आमचा आणि सहभागी लेखकांचा उत्साह वाढवला त्याबद्दल त्यांचे ही आभार. मिपा जितकं लेखकांचं तितकंच दर्दी, जाणकार वाचकांचं देखील आहे. लेखमालेतील धाग्यांवर येणारे प्रतिसाद, जिज्ञासू प्रश्न याची साक्ष देतात. काही जणांनी या उपक्रमाच्या स्वरुपाबद्दल, त्याच्या विषय निवडीबद्दल आणि असलेल्या व्यापकतेबद्दल साशंकता व्यक्त केली होती. लेखमालेतील एकाहुन एक सरस लेखांनी या सर्व शंकांचं निरसन केलं असेल असं आम्ही मानतो. त्या शंकांचा विचार करुन, त्यानुसार लेखमालेचं स्वरुप अजुन प्रगल्भ करण्यास आम्हाला मदतच झाली. अजुनही काही शंका असतील तर ती जबाबदारी आमच्या आयोजनाची, लेखकांनी त्यांचं २०० % योगदान दिलेलं आहे.

या लेखमालेच्या निमित्ताने आम्ही प्रवेशिका फॉर्म प्रथम च वापरात आणला. हा फॉर्म बनवुन, त्यातल्या त्रुटी वेळोवेळी तत्परतेने सुधारुन देण्याबद्दल श्रीरंग जोशी यांचे आभार. मिपाच्या कुठल्याही उपक्रमातले लेख, नूलकर काकांची अनुभवी नजर फिरल्याशिवाय प्रकाशित होत नाहीत. एक हाती एवढ्या लेखांच मुद्रित शोधन करुन देणं त्यांना त्यांच्या व्यस्त दिनक्रमात कसं जमतं कोण जाणे, पण आम्ही त्यांना हक्काने गृहित धरतो आणि ते ही दर वेळी आमचं मन राखतात. लेखमालेचं अनुरुप मुखपृष्ठ हेमांगी के आणि आपल्या स्पेस जंक लेखाचे लेखक Keanu या दोघांनी मिळुन बनवुन दिले. त्या मुखपृष्ठाने लेखमालेला शोभा आली. या कल्पक मुपृबद्दल त्या दोघांचे आभार मानावे तितके कमीच.
ही लेखमाला प्रसिद्ध व्हायच्या एक दिवस आधी व्यवस्थापनात बदल झाले आणि प्रशांत च्या मागे आम्ही व्यनिंचा लकडा लावला. लेखमालेचा अ‍ॅक्सेस द्या, लेखांचा द्या, हे करा ते करा असं सतत पहिले काही दिवस त्यांच्या मागे लागुन झालं. त्यानी देखील न कंटाळता लागतील ते बदल करुन दिले. एक्का काकांना पण पहिले २-३ दिवस रात्री बेरात्री " अर्जंट" नावाखाली व्यनि पाठवुन दचकावुन झालं. पै ताई आणि अजया ताई तर घरच्याच. त्या रोज रात्री आळीपाळीने गजर लावुन उठत होत्या आणि लेख प्रकाशित करत होत्या. या आणि अशाच अनेक पडद्यामागच्या हातांनी लेखमाला आकारास आली, आणि तुम्ही तिला साजिरं करुन घेतलंत .

मिपकरांच्या जीवावर अजुन एक यशस्वी उपक्रम राबवल्याचं समाधान पदरी घेऊन आज लेखमालेचा समारोप करतो. पुन्हा लवकरच येऊ, मराठी दिनाची मेजवानी घेऊन !!